मागील काही लेखांमधून आपण मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेल्या हैदराबाद, बंगाल, अवध व कर्नाटक या वारसा राज्यांबाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण म्हैसूर राज्याबाबत जाणून घेऊया. १६ व्या शतकात बहमनी साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य यांच्यात गोदावरी, तुंगभद्राच्या भागावरून संघर्ष सुरू होता. याच संघर्षातून पुढे इ.स. १५६५ मध्ये दोघांत तालिकोटा येथे युद्ध झाले. या युद्धात बहमनी साम्राज्याचा विजय झाला. परिणामत: विजयनगर साम्राज्याचा अंत झाला आणि म्हैसूरची स्थापना झाली. सुरुवातीला म्हैसूरची सत्ता वाडियार वंशाच्या हातात होती.
१७ व्या शतकापर्यंत म्हैसूरच्या राज्याने आपले राज्य कसेबसे सांभाळले. मुघल साम्राज्यात त्यांचा समावेश हा केवळ नावापुरताच होता. चिक्काकृष्णराज राजा असताना संपूर्ण कारभार राज्यातील दोन मंत्री मन्सराज आणि देवराज यांच्याकडेच होता. पुढे मन्सराजच्या सैन्यातील अधिकारी हैदरअली याने इ.स. १७६१ मध्ये मन्सराज व देवराज यांचा पराभव करत त्यांना सत्तेतून पदच्युत केले आणि आधुनिक म्हैसूरची स्थापना केली.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ३
हैदरअलीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात सैन्यातील एक कनिष्ठ अधिकारी म्हणून केली. तो अतिशय हुशार, धाडसी, मुत्सद्दी होता. त्याने इ.स. १७५५ साली फ्रेंच अधिकाऱ्याच्या मदतीने दिंडीगल येथे आधुनिक युद्ध साहित्याचे केंद्र स्थापन केले होते. तसेच मन्सराज आणि देवराज यांच्याकडून सत्ता काबीज केल्यानंतर जमीनदारांना आपल्या नियंत्रणाखाली आणले. याशिवाय त्याने बिदनूर, सुंदा, सेरा व मलबार या प्रदेशांवरही ताबा मिळवला होता. त्याने आपल्या राज्यात मुघलांप्रमाणे महसूल व्यवस्था निर्माण केली. त्याने हिंदूंबाबतही सहिष्णू धोरण अवलंबले. इ.स. १७८२ मध्ये इंग्रजांशी झालेल्या युद्धात हैदरअलीचा मृत्यू झाला.
टिपू सुलतान
हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान गादीवर आला. टिपू सुलतान अतिशय हुशार व उत्तम प्रशासक होता. तो नेहमी नवनवे प्रयोग करत असे. महसूलवाढीसाठी त्याने प्रशासनात अनेक सुधारणा केल्या. त्याने नवीन कॅलेंडर (पंचांग), चलनी नाणे आणि वजनमापांच्या पद्धतीची अंमलबजावणी केली. तसेच श्रीरंगपट्टणम येथे ‘स्वातंत्र्याचा वृक्ष’ लावला. टिपू सुलतान फ्रेंच राज्यक्रांतीपासून प्रभावीत झाला होता. त्यामुळेच त्याने जॅकोबिन क्लबचे सदस्यत्वही स्वीकारले. त्याने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केला. हैदरअलीप्रमाणेच टिपू सुलताननेही हिंदूंबाबत सहिष्णू धोरण अवलंबले. त्याने शृंगेरी येथील एका मंदिरात देवी सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना केली. त्यासाठी त्याने निधीही दिला होता.
टिपू सुलतान नेहमीच ऐष-आरामापासून दूर राहिला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणाताही डाग नव्हता. ‘आयुष्यभर शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगणे केव्हाही बरे!’ ही म्हण टिपू सुलतानच्या आवडीची होती. त्याचप्रमाणे तो जीवनही जगला.
ॲंग्लो-म्हैसूर युद्ध
हैदरअलीने इ.स. १७६१ मध्ये आधुनिक म्हैसूरची स्थापना केली, त्यापूर्वी ब्रिटिशांनी प्लासी व कर्नाटक ही युद्धे जिंकली होती. त्यामुळे ब्रिटिश एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आली होती. दरम्यान, या काळात ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यात चार युद्धे झाली. ती ‘ॲंग्लो-म्हैसूर युद्ध’ या नावाने ओळखली जातात.
त्यापैकी पहिले युद्ध इ.स. १७६७ ते १७६९ दरम्यान ब्रिटिश आणि हैदरअली यांच्यात झाले. या युद्धात हैदरअलीने आक्रमकपणे ब्रिटिशांचा सामना केला. इ.स. १७६९ मध्ये झालेल्या मद्रासच्या तहाने युद्धाचा शेवट झाला. पुढे इ.स. १७८० ते १७८४ दरम्यान ब्रिटिश आणि हैदरअली यांच्यात दुसरे युद्ध झाले. मात्र, या युद्धादरम्यान इ.स. १७८२ साली हैदरअलीचा मृत्यू झाला. त्यामुळे या युद्धाचे नेतृत्व टिपू सुलतानने केले. इ.स. १७८४ मध्ये मंगलोरच्या तहाने दुसऱ्या ॲंग्लो-म्हैसूर युद्धाचा शेवट झाला. या युद्धामुळे म्हैसूरचे मोठे नुकसान झाले.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग २
पुढे इ.स. १७९० ते १७९२ दरम्यान ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यात तिसरे युद्ध झाले. या युद्धात ब्रिटिशांनी टिपू सुलतानचा पराभव केला. या युद्धानंतर इ.स. १७९२ साली ब्रिटिश आणि टिपू सुलतान यांच्यात श्रीरंगपट्टणम येथे तह झाला. या युद्धामुळे टिपू सुलतानला आपले अर्ध्यापेक्षा जास्त राज्य गमवावे लागले. तसेच ब्रिटिशांना युद्धखर्च म्हणून तीन कोटी रुपये द्यावे लागले. सलगच्या युद्धांमुळे म्हैसूरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. इ.स. १७९६ ते १७९९ दरम्यान ब्रिटिश आणि म्हैसूर यांच्यात चौथे युद्ध झाले. या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी म्हैसूरवर नियंत्रण मिळवले.