मागील लेखातून आपण शाहू राजे आणि महाराणी ताराबाई यांच्यातील संघर्ष, पेशवेपदाची सुरुवात तसेच पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पहिले बाजीराव आणि त्यांच्या कारकीर्दीबाबत जाणून घेऊया.
इ.स. १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर त्यांचा २० वर्षीय मुलगा पहिले बाजीराव पेशवा झाले. ते अत्यंत महत्त्वकांशी आणि मुसद्दी होते. शिवाजी महाराजांनंतर गनिमी काव्याचा सर्वाधिक वापर कोणी केला असेल तर तो पहिले बाजीराव यांनी केला. आपल्या २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मुघलांविरोधात अनेक मोहिमा राबवल्या. मुघल साम्राज्याच्या एखाद्या प्रदेशावर ताबा मिळवायचा. त्यानंतर त्या भागातील चौथाई आणि सरदेशमुखी मराठ्यांना देण्यास मुघलांना भाग पाडायचे आणि काही दिवसांनी तो प्रदेश मराठा साम्राज्यात विलीन करायचा ही बाजीराव यांची कामाची पद्धत होती. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी माळवा, गुजरात व बुंदेलखंडचा काही भागावर मराठ्यांचं राज्य प्रस्तापित केलं.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ५
बाजीरावांनी निझामांविरोधातही अनेक मोहिमा चालवल्या. याच संघर्षातून मराठा आणि निझाम यांच्यात इ.स.१७२८ आणि इ.स. १७३६ साली अनुक्रमे दोन युद्ध झाली. या युद्धांत मराठ्यांचा विजय झाला आणि बाजीराव यांनी दख्खनची चौथाई आणि सरदेशमुखी मराठ्यांना देण्यास निझामांना भाग पाडले. बाजीराव यांनी जंजिराऱ्याच्या सिद्धीविरोधातही मोहिम चालवली.
इ.स. १७४० मध्ये बाजीराव यांचं निधन झालं. आपल्या २० वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक युद्ध लढली. मात्र, एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही. २० वर्षांच्या काळात त्यांनी मराठा राज्याचे रुपांतर साम्राज्यात केले. या काळात त्यांनी मराठा राज्याचे स्वरूप बदलून टाकले होते. त्यांनी नव्या प्रदेशांचा मराठा राज्यात समावेश केला खरा मात्र, त्यांच्या प्रश्नासनाकडे लक्ष देण्यासाठी बाजीरावांना पुरेसा वेळच मिळाला नाही.