मागील काही लेखांतून आपण शाहूराजे आणि महाराणी ताराबाई यांच्यातील संघर्ष, पेशवेपदाची सुरुवात, पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि पहिले बाजीराव यांच्या कारकिर्दीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण बाळाजी बाजीराव आणि त्यांच्या कारकिर्दीबाबत जाणून घेऊ या….
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ६
इ.स. १७४० मध्ये पहिल्या बाजीरावांच्या निधनानंतर त्यांचा १८ वर्षीय मुलगा बाळाजी बाजीराव पेशवे झाले. ते नानासाहेब या नावानेही ओळखले जात. वडिलांप्रमाणे बाळाजी बाजीरावदेखील कर्तबगार होते. त्यांच्याच काळात पेशवेपद वंशपरंपरागत झाले. इ.स. १७४९ मध्ये शाहूराजांनी मृत्यूपूर्वी राज्याची जबाबदारी पेशव्यांकडे दिली होती. राज्याचा प्रमुख झाल्यानंतर बाळाजी बाजीरावांनी सर्वप्रथम आपली राजधानी पुणे येथे हलवली.
पहिल्या बाजीरावांप्रमाणेच बाळाजी बाजीराव यांनीही उत्तर भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांनी बंगालमध्येही अनेक मोहिमा राबवल्या. तसेच इ.स. १७५१ मध्ये उडिसा प्रांत ताब्यात घेतला. शिवाय त्यांनी दक्षिण भारतातील छोट्या संस्थानांकडूनही खंडणी वसूल केली. इ.स. १७५२ मध्ये त्यांनी इमाम-उल-मुल्क याला मुघलांचे वजीरपद मिळवून दिले. पुढे त्यांनी पंजाबमध्येही राज्यविस्तार करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम बाळाजी बाजीराव यांनी अहमदशाह अब्दालीच्या सैन्याला पंजाब सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे अहमदशहा अब्दालीनेही मराठ्यांविरोधात मोहीम चालवली.
संभाव्य युद्धाचा धोका ओळखून पेशव्यांनी उत्तर भारतात सैन्य रवाना केले. या सैन्याचे नेतृत्व बाळाजी बाजीराव यांचा अल्पवयीन मुलगा विश्वासराव याच्याकडे असले तरी वास्तविक नेतृत्व त्यांचा चुलतभाऊ सदाशिवभाऊ यांच्याकडे होते. अब्दालीच्या सैन्याचा मुकाबला करण्यासाठी मराठ्यांनी उत्तरेकडील राज्यांशी मैत्री करण्याचा आणि त्यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठ्यांचे आधीचे वर्तन बघता, अनेकांनी मराठ्यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ५
अखेर १४ जानेवारी १७६१ रोजी मराठा आणि अब्दालीच्या सैन्यामध्ये पानिपत येथे युद्ध झाले. इतिहासात हे युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. तसेच बाळाजी बाजीराव यांचा अल्पवयीन मुलगा विश्वासराव, तसेच चुलतभाऊ सदाशिवभाऊ यांचा मृत्यू झाला. मराठ्यांच्या पराभवाची बातमी मिळताच बाळाजी बाजीराव यांना मानसिक धक्का बसला. पुढे इ.स. १७६१ मध्ये त्यांचे निधन झाले.