मागील लेखातून आपण गदर चळवळ नेमकी काय होती? ती कुठे सुरू झाली आणि त्यामागचा उद्देश नेमका काय होता? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण होमरूल लीगविषयी जाणून घेऊ. पण त्यापूर्वी होमरूल हा शब्द नेमका कुठून आला? एकंदरीतच याची पार्श्वभूमी काय होती? हे समजून घेणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘गदर चळवळ’ काय होती? ती कधी सुरू झाली?

होमरूल ही संकल्पना पहिल्यांदा १८६० च्या दशकात आयर्लंडमध्ये मांडण्यात आली. त्यावेळी आयर्लंडमध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. तेथील लोकांनी स्वयंशासनाची मागणी ब्रिटिशांकडे केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनेही करण्यात आली. परिणामत: ब्रिटिशांनी १८८६ मध्ये आयरिश होमरूल बिल ब्रिटिश संसदेत मांडले. मात्र, हे बिल १९२० मध्ये पारित झाले.

भारतातील होमरूल चळवळही आयर्लंडमधील होमरूल चळवळीपासून प्रेरित होती. ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची संकल्पना भारतात आणली. पण, ज्या वेळी ॲनी बेझंट या भारतात आल्या, त्या होमरूल चळवळीसाठी नाही, तर थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी. काही दिवसांत भारतात ॲनी बेझंट यांची लोकप्रियता वाढू लागली. बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आल्या असल्या तरी त्यांची रुची ही भारतीय राजकारणात होती. त्यातून त्यांनी १९१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच त्यांनी १९१५ च्या काँग्रेस अधिवेशनात होमरूल लीगची संकल्पना मांडली. मात्र, काँग्रेसमधील मवाळ नेत्यांनी याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – UPSC-MPSC : पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ आणि दिल्ली-लाहोर कट खटला

दरम्यान, १९१४ मध्ये बाळ गंगाधर टिळक यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. १९१५ च्या काँग्रेस अधिवेशनात टिळकही सहभागी झाले होते. त्यांनी ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगच्या संकल्पनेला पाठिंबा दिला आणि १९१६ मध्ये दोन होमरूल लीगची स्थापना झाली. त्यापैकी एका लीगचे नेतृत्व हे टिळकांकडे; तर दुसऱ्या लीगचे नेतृत्व हे ॲनी बेझंट यांच्याकडे होते. दोन्ही होमरूल लीगने एकमेकांना सहकार्य केले. त्यांनी सर्वत्र होमरूल म्हणजेच स्वयंशासनाच्या समर्थनार्थ प्रचार सुरू केला. दोन्ही लीगच्या चळवळी झपाट्याने देशभरात पसरल्या. काँग्रेसच्या मवाळ नेतृत्वामुळे असमाधानी असलेले लोक होमरूल चळवळीशी जोडले जाऊ लागले. होमरूल लीगची वाढती लोकप्रियता बघता, होमरूल लीगवर ब्रिटिश सरकारचा रोष ओढवला. अखेर जून १९१७ मध्ये ॲनी बेझंट यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर जनसामान्यांनी केलेली आंदोलने आणि कॉंग्रेस नेत्यांचा दबाव बघता, १९१७ मध्ये सरकारला त्यांची सुटका करावी लागली. पुढे दोन्ही होमरूल लीग काँग्रेसमध्ये विलीन झाल्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history what is home rule league annie besant bal tilak spb
Show comments