वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण जलप्रदूषण म्हणजे काय? आणि जलप्रदूषकांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण वायुप्रदूषण म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या प्रदूषकांबाबत जाणून घेऊया. वायुप्रदूषण हे मुख्यत्वे वाहतूक, इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्म इंधनाचे जळण आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहनांमुळे हवेत कार्बन मोनॉक्साईड (co), हायड्रोकार्बन्स (HC) व नायट्रस ऑक्साईडची (NO) उच्च पातळी निर्माण होते; तर बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणामुळेही वायुप्रदूषण होते. यामुळे मानवाला रोग किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. वेळप्रसंगी मृत्यू होण्याची शक्यताही असते.

वायुप्रदूषणामुळे इतर सजीवांना, जसे की प्राणी आणि पिके यांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते. खरं तर मानवी क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रिया दोन्ही वायुप्रदूषण निर्माण करू शकतात. एकंदरीतच मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून हानी पोहोचवतात, त्याला वायुप्रदूषण असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : जलप्रदूषण म्हणजे काय?

वायुप्रदूषकांचे स्त्रोत –

वायुप्रदूषकांचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती अशा दोन भागांत वर्गीकरण करता येईल.

नैसर्गिक : ज्वालामुखी-सल्फर डायॉक्साईड, हवेतील इतर अनेक वायू, मोठ्या प्रमाणावरील धूलिकण आणि दलदली प्रदेशातून निघणारा मिथेन ही नैसर्गिक वायुप्रदूषके आहेत. याशिवाय नैसर्गिकरीत्या लागणाऱ्या जंगलातील वणव्यांमुळेही वायुप्रदूषण होते.

मानवनिर्मित : वाहनांमधून, कारखान्यांमधून आणि वीजनिर्मिती व सिमेंट प्रकल्पांमधून निघणारा नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड, व्हीओसी, काबर्न मोनॉक्साईड व डायॉक्साईडच्या सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण हे मानवनिर्मित वायुप्रदूषक आहेत. जीवाश्म इंधन जाळल्याने सल्फर ऑक्साईड (So 2 ), सल्फ्यूरिक ॲसिड (H 2 SO 2 ), हायड्रोजन सल्फाइड (H 2 S) आणि कार्बन-डाय-ऑक्साईड (CO 2 ) इत्यादी वायू वातावरणात सोडले जातात. तसेच थर्मल पॉवर प्लांटमधून नायट्रस ऑक्साईड (NO), नायट्रोजन ऑक्साईड (NO 2 ), कार्बन मोनॉक्साईड (CO), नायट्रिक ऍसिड (HNO 3 ) हवेत सोडले जाते. हीसुद्धा मानवनिर्मित प्रदूषके आहेत.

धूलिकरणाचे प्रकार

ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे व श्वसनातून शरीरात न जाणारे. १० मायक्रोमीटर (PM10) पेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसात खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकाळापर्यंत साठून राहतात. हे सूक्ष्म कण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असतात. ते रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात. याचा आरोग्यावर अतिशय घातक परिणाम होतो.

वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म (नॅनो आकारात) काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन अतिसूक्ष्म कण बनतात व वातावरणातील प्रदूषण वाढवतात. दोन स्ट्रोकवाल्या वाहनांमुळे, तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे, शहरांमध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील शहरांमध्ये प्रामुख्याने अतिसूक्ष्म कणांचा प्रादुर्भाव जास्त आहे.

वायुप्रदूषणाचे परिणाम

मानवी आरोग्यावरील परिणाम : सिगारेटच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या निकेल कणांमुळे माणसाच्या डोळ्यात जळजळ होणे, नाक व घशाचा त्रास होणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे, त्यामुळे व्यक्तीच्या शरीरात डिलिरियम (डेलीरियम) सारखे आजार उद्भवतात.

वनस्पतींवरील परिणाम : NO2 मुळे, झाडे त्यांची पाने अकाली गळतात, ज्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. वायुप्रदूषणामुळे तयार होणाऱ्या सल्फर डाय ऑक्साईड (SO 2 ) मुळे पानांचे ब्लीचिंग होते, ज्यामुळे वनस्पतींमध्ये ग्रीन ब्लीचिंग नावाचा रोग होतो. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिलच्या कमतरतेमुळे पिवळसरपणा येतो.

प्राण्यांवर होणारा परिणाम : विशेषत: वायुप्रदूषणामुळे फ्लोरिन, शिसे आणि आर्सेनिकच्या प्रभावाने दूषित किंवा लेप असलेली झाडे प्राणी पीत असतील तर त्यांना आर्सेनिक विषबाधा होते.

हवामानावर होणारा परिणाम : उद्योग आणि मोटारगाड्या, जंगलतोड आणि इंधनाच्या ज्वलनामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड (CO 2 ) चे प्रमाण वाढले आहे. यामुळे जागतिक तापमानवाढीचा प्रश्न व त्यासंलग्न असणाऱ्या विविध समस्या तयार झाल्या आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार कोणते?

वायुप्रदूषण नियंत्रण उपाय

चक्रीवादळ विभाजक, गुरुत्वाकर्षण स्थिरीकरण, स्क्रबर्स/वेट कलेक्टर्स आणि फायबर फिल्टर ही अशुद्ध कण नियंत्रित करण्यासाठी काही उपकरणे आहेत. यामुळे वायुप्रदूषण नियंत्रित केले जाऊ शकते.

वायुप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, १८८१

वायुप्रदूषण कमी करणे, त्यावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणणे, हवेची गुणवत्ता राखणे, वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी मंडळाची स्थापना करणे, ही या कायद्याची उद्दिष्टे आहेत. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा किंवा १० हजारांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीची तरतूद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc what is environment what is air pollution mpup spb
Show comments