वृषाली धोंगडी
मागील लेखातून आपण पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय? आणि त्याच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण जलप्रदूषण म्हणजे काय याबाबत जाणून घेऊ या. खरे तर मानवाला जगण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. अन्न, वस्त्र व निवारा. तथापि, अधिक बारकाईने पाहिल्यास, या तिघांच्या निर्मितीमध्ये पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पाणी हा घटक दूषित झाला, तर त्यातून निर्माण होणारे धोके घातक ठरतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरण : परिसंस्थेचे प्रकार भाग -२
पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन या पदार्थांपासून बनलेले असते. ज्याप्रमाणे प्रत्येक पदार्थाचे भौतिक आणि रासायनिक गुण वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचेही रासायनिक गुण असतात. जेव्हा पाण्याचे रासायनिक, भौतिक व जैविक गुण बाह्य स्रोतांमुळे बदलतात, तेव्हा पाणी प्रदूषित होते; ज्याला आपण ‘जलप्रदूषण’ असे म्हणतो. पाण्याची गुणवत्ता खालावण्यामागे ‘प्रदूषक’ जबाबदार असतात. प्रदूषक हे धोकादायक कण (घटक) आहेत, जे पाण्यात प्रवेश करतात आणि त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. त्यामुळे पाण्याच्या ‘पीएच’ (PH) मध्ये बदल होतो.
पाणीपुरवठा दोन प्रकारे प्रदूषित होऊ शकतो : एक- एकाच बिंदूच्या स्रोताकडून आणि दुसरा- विविध स्रोतांकडून.
बिंदू स्रोत (पॉइंट सोर्सेस) : समजा- एखादी नदी एखाद्या कारखान्याच्या बाजूने वाहत असेल आणि त्या कारखान्याने त्यांचा दूषित कचरा नदीत सोडला, तर त्या नदीतील पाणी प्रदूषित होते. मात्र, अशा वेळी हे पाणी कोणत्या प्रदूषकामुळे दूषित झाले, याची माहिती आपण घेऊ शकतो. प्रदूषणाचा हा प्रकार नियंत्रित करता येतो.
विविध स्रोतांकडून (नॉन पॉइंट सोर्सेस) : या प्रकारच्या स्रोतामध्ये पाण्यातील प्रदूषक वेगवेगळ्या स्रोतांकडून येतात. या ठिकाणी दूषित घटकांचा आवाका मोठा असतो. त्यामुळे प्रदूषकाचा स्रोत आपण ओळखू शकत नाही. या प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ : समुद्रातील दूषित पाणी. या ठिकाणी सर्व नद्यांचे पाणी एकत्र होते. तथापि, नद्यांच्या पाण्यात प्रदूषक ओळखणे आणि त्यावर उपचार करणे कठीण होते.
हेही वाचा – UPSC-MPSC : पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार कोणते?
जलप्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :
- जलशुद्धीकरण करणे.
- सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.
- पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.
- पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे.
- कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.
- कृत्रिम खतांचा वापर कमी करून, सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.
- पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेणे.
- किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे.
- औष्णिक जलप्रदूषणामूळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान २० से.पेक्षा अधिक वाढणार नाही याची खबरदारी घेणे.
- खनिज तेलामुळे होणाऱ्या जलप्रदूषण समस्येवर उपाययोजना करणे