– सागर भस्मे
या लेखातून आपण राष्ट्रीय उत्पन्नाबाबत जाणून घेऊ या. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा विषय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा , बँक आणि वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये, इत्यादींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते. याबरोबरच ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचे वस्तुनिष्ठ निर्देशकही आहे. आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर आधारित आहे. त्यामुळे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशांमध्ये व्यक्त केले जाते.
देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल इतर काही व्याख्यासुद्धा तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. जसे की, राष्ट्रीय उत्पन्न समिती. प्रा. पी. सी. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट १९९४ मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये प्रा. डी .आर. गाडगीळ आणि डॉ. व्ही. के. आर.व्ही. राव हे सदस्य होते. या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मांडलेली आहे, ती पुढीलप्रमाणे, “राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय.” तसेच प्रा. ए. सी. पीगू यांच्या मते, “समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते, असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय,” या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. तसेच प्रा. आयर्विंग फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षातील कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो, असा भाग होय!”
भारतात १९४९ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यःस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना (CSO) दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते.
राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये:
१) राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे. म्हणजेच, एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे.
२) राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेतल्या जात नाहीत.
३) राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही.
४) राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो.
५) राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे.
६) राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते.
७) राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य विनिमय मूल्य असते, अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो.