सागर भस्मे
मागील काही लेखांतून आपण महाष्ट्रातील हवामान, कृषी आणि वाहतूक व्यवस्थेविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशात कशा प्रकारच्या वसाहती आढळतात, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्रातील घरांच्या आकारमान व घरबांधणी पद्धतीमध्ये स्थानिक हवामान व साधनसामग्री यामुळे विविधता पहावयास मिळते. उदा. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी असते, अशा भागातील घरे मातीच्या विटांपासून बांधलेली असतात. त्यामध्ये स्थानिक काळा दगड भिंतीसाठी वापरतात. घरांचे छत लाकडी पट्ट्या टाकून झाकून घेतल्यावर त्यावर माती टाकली जाते, याला ‘माळवदी’ किंवा ‘धाब्याची घरे’ असे म्हणतात.
कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी या नद्यांच्या खोऱ्यात धाब्याची घरे आढळून येतात. लाकूड उष्णतेचे दुर्वाहक असल्याने उन्हाळ्यात ही घरे थंड राहतात. कोकणात सुमारे ४०० से.मी. इतका पाऊस पडतो, याचा परिणाम येथील घरबांधणीवर झाल्याचा दिसून येतो. घराचे छप्पर उतरते व कौलारू किंवा नारळ-पोफळीच्या पानांनी शाकारलेले असते. अलीकडे धातूचे किंवा सिमेंटचे पत्रेदेखील छपरासाठी वापरले जातात. खलाटी भागातील खेडी ओळीसारखी दिसतात तर वलाटी भागातील खेड्यांच्या रचनेत विविधता आढळते. घरे विखुरलेली तर काही ठिकाणी पुंजक्यासारखी दिसतात. सह्याद्री घाटमाथ्यावरसुद्धा जास्त पावसामुळे उतरत्या छपराची घरे बांधतात. बऱ्याच ठिकाणी घरांचे छत वनस्पतींच्या विविध भागांपासून तर भिंती कुडाच्या असतात. घरे विखुरलेली आढळतात. घाटमाथ्यावर उंच-सखल टेकड्यांच्या क्षेत्रात गोलाकार झोपड्यांची निवासस्थाने आढळतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूमी उपयोजन म्हणजे काय? महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप कोणते?
महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीचे प्रकार :
१) विखुरलेल्या वसाहती : विखुरलेल्या वस्त्या म्हणजे गृहसमूहातील अंतरात्मक विलगता होय. एक किंवा एकापेक्षा जास्त कुटुंबे जेव्हा परस्परांपासून थोड्या दूर अंतरावर राहतात, यामुळे निर्माण होणाऱ्या वसाहतीला ‘विखुरलेल्या वसाहती’ असे म्हणतात. सामान्यतः या वसाहती विपरीत हवामानविषयक स्थिती, उंच-सखल डोंगराळ टेकड्यांचा प्रदेश, घनदाट जंगले व गवताळ प्रदेश, कृषियोग्य जमिनीची कमतरता तसेच विस्तृत कृषिक्षेत्रे, आपल्या कृषिक्षेत्रावर घर करून राहणारे शेतकरी अशा ठिकाणी आढळून येतात. तसेच, उंच-सखल भूप्रदेश, कृषी व वसाहतीसाठी सलग भूमीचा अभाव, मृदेची स्तरीय विविधता, जमिनीचे विभक्तीकरण, पाण्याची अनिश्चितता व विकेंद्रित व्यवसाय इत्यादी घटकांमुळे विखुरलेल्या वसाहती आढळतात.
कोकणात विखुरलेल्या वस्त्यांचे प्राबल्य आहे. सह्याद्रीचा घाटमाथा, कोकण किनारपट्टीवरील सखल खलाटीचा भाग, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील पर्वतराई नजीकचा उंच-सखल वलाटीचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मावळ पट्टा, सातपुडा पर्वत व टेकड्यांचा प्रदेश, पूर्व महाराष्ट्रातील टेकड्यांचा प्रदेश येथेसुद्धा विखुरलेल्या वस्त्यांची निर्मिती झाली आहे.
पूर्व विदर्भात खेड्यांचा आकार लहान असतो. आदिवासी लोकांच्या दहा-वीस झोपड्या मिळून वाडी/पाडा ( कृषीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मूळ गावात राहण्यापेक्षा शेतात जाऊन वस्ती करतात. महाराष्ट्रात या शेतवस्त्यांना ‘वाडी’ असे म्हणतात) अस्तित्वात येते. जास्त पर्जन्य, समृद्ध भूजल पातळी, सुपीक जमीन असूनही आदिवासींचा विकास झालेला नाही. येथे सलग शेतजमीन नसल्याने अशी विखुरलेली खेडी असतात. महाराष्ट्रातील गोड, कोलाम, कोरकू इत्यादी अन्य जातींचे वास्तव्य असणाऱ्या वनक्षेत्रात पुंजक्या पुंजक्यांनी घरे बांधल्याचे आढळते. आर्थिक व सामाजिक कारणांच्या प्रभावामुळे वाडीसंस्कृती विकसित होते.
कोकणातील कृषी अर्थव्यवस्था कुटुंबप्रधान आहे. एक घर दुसऱ्या घरापासून अलग असल्याने बहुतेक कुटुंबे आत्मनिर्भर असतात. सामाजिक घटक जाती-वर्णव्यवस्था, धार्मिक व वांशिक भिन्नता यामुळे विलगतेची प्रवृत्ती वाढून ग्रामीण वस्त्यांमध्ये उच्चवर्णीय लोक आर्थिक व सामाजिकदृष्ट्या निम्न स्तरातील लोकांना सामावून घ्यायला सहजासहजी तयार नसतात. परिणामत: सामाजिक दरी वाढत जाते. यामुळे मुख्य ग्रामीण वस्ती व अन्य लोकांची वस्ती असे विकेंद्रित चित्र दिसते.
ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधार्थ लोक शहराकडे स्थलांतर करतात. नागरी विभागातील ग्रामीण नागरी सीमांत भागात या लोकांच्या विखुरलेल्या झोपड्या आढळतात. प्रादेशिक विकासासाठी धरणे, विद्युत प्रकल्प, वसाहतीकरण, खनिजांचा शोध, संशोधन संस्था, औद्योगिक वसाहती इत्यादी कारणांमुळे मूळ वस्त्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न येतात. मोठ्या प्रकल्प योजना कार्यान्वित झाल्यावर तेथील जमिनी व खेडी पाण्याखाली जातात, तेथील वसाहतीचे पुनर्वसन करावे लागते.
हेही वाचा – UPSC-MPSC : साखर उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर असण्याची मुख्य कारणे कोणती?
विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्ये :
- विखुरलेल्या वस्त्यांमध्ये अंतरात्मक विलगता स्पष्टपणे पाहावयास मिळते. खेडी, वाड्या, वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते.
- २०० ते ५०० लोकसंख्येच्या अनेक वाड्या व वस्त्या आढळतात.
- शेतकरी शेतजमिनीवरच राहत असल्याने दैनंदिन प्रवास वाचतो. श्रमाची व वेळेची बचत होते.
- या वसाहतींमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध नसतात.
- या वसाहती पर्यावरणाशी अधिक निकट व त्या प्रदूषणमुक्त असतात.
२) सघन/केंद्रित वसाहती : एकापेक्षा जास्त गृहसमूह एकत्र येऊन वस्त्यांचे केंद्रीकरण होत असेल तर त्याला ‘सघन/केंद्रित वस्ती’ असे म्हणतात. अनेक कुटुंबे जवळजवळ राहतात. त्यामुळे दाट वसाहत निर्माण होते. संरक्षण, समूह प्रवृत्ती, समाजप्रियतेचा गुण व प्राकृतिक मर्यादा यामुळे केंद्रित वसाहती निर्माण होतात. महाराष्ट्रातील देश किंवा दख्खनचे पठार बऱ्यापैकी सपाट असल्याने केंद्रित वसाहती आढळतात. ओढे, नाले, प्रवाह, नद्या, तळी, सरोवरे अशा पाणवठ्याजवळ गाव वसल्याचे दिसते. शेतीसाठी चांगली जमीन असावी व भरड, मुरमाड जमीन गाव वसविण्यासाठी वापरावी असा संकेत असतो. अशा भरड जमिनीचा रंग पांढरट असल्याने गावाच्या वस्तीला ‘गाव पांढरी’ किंवा ‘पांढरी’ हा शब्द वापरला जायचा; त्यामुळे खेड्याच्या वस्तीचा उल्लेख ‘पांढरी’ किंवा ‘गावठाण’ या नावाने होऊ लागला.
३) संमिश्र / संयुक्त वसाहती : मुख्य वसाहत व तिच्या सभोवतालच्या अलग-अलग घरांचे समूह मिळून निर्माण होणाऱ्या वसाहतीला ‘संमिश्र वसाहत’ असे म्हणतात. एक गाव व त्या गावाखाली येणाऱ्या छोट्या-छोट्या वाड्या तसेच जुळी खेडी या संयुक्त वसाहती आहेत. सांस्कृतिक, सामाजिक व शासकीयदृष्ट्या एका वसाहतीच्या वाड्या मूळ वसाहतीशी संलग्न असतात. काही वेळा एकाच नावाने ओळखली जाणारी जोडखेडी असतात. यातील लहान खेड्यांना ‘खुर्द’, मोठ्या खेड्यांना ‘बुद्रुक’ अशी विशेषणे लावली जातात. नदी किंवा डोंगरामुळे अलग झालेल्या एकाच नावाची अशी दोन गावे व अनेक खेडी महाराष्ट्रात दिसून येतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या का सुरू झाल्या? याची नेमकी कारणे कोणती?
४) विखंडित/अपखंडित वसाहती : एकाच वसाहतीमधील घरांचे समूह अलग-अलग, कमी-जास्त अंतरावर, अनियमित वसलेले असतात, त्यास ‘विखंडित/अपखंडित वसाहत असे म्हणतात. नदी, टेकडी, डोंगराचा अडथळा, पाणीपुरवठा, शेतजमिनीची उपलब्धता, सामाजिक किंवा व्यावसायिक विकेंद्रीकरणामुळे एकाच वसाहतीचे विखंडन झालेले असते. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या उतारावर घाटाला लागून पूर्वेकडे व पश्चिमेकडे विखंडित वसाहती आढळतात.