सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण वाऱ्यांच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भूखंडवहन आणि भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत काय आहे? याबाबत जाणून घेऊया.

भूखंडवहन सिद्धांत

जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर यांनी त्यांच्या भूखंड व महासागराची उत्पत्ती या ग्रंथात भूखंड वहन सिद्धांताचे स्पष्टीकरण दिलेले आहे. यानुसार २५० दशलक्ष वर्षापूर्वी एकच महाखंड व एक महासागर होता, वेगनरने त्या महाखंडाला पॅंजिया असे नाव दिले. कालांतराने पँजियाच्या विभाजनास प्रारंभ होऊन पॅंजिया लॉरशिया/अंगारलैंड व गोंडवाना या दोन भागात विभागणी झाली. पँजियाच्या उत्तर भागातील लॉरेनशियामध्ये उत्तर अमेरिका, ग्रीनलँड आणि युरेशिया यांचा समावेश होतो, तर पँजियाच्या दक्षिणेकडील गोंडवाना भागामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका-अरेबिया, मलेशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका यांचा समावेश होतो. यामध्ये उत्तरेला युरेशिया आणि उत्तर अमेरिका यांच्यामध्ये प्राथमिक अवस्थेतील आर्क्टिक समुद्र; तर युरेशिया आणि आफ्रिका यांच्यात टेथिस समुद्र निर्माण झाला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : वातावरण म्हणजे काय? वातावरणातील थर कोणते?

२०० दक्षलक्ष वर्षांपूर्वी पँजियाच्या विभाजनास प्रारंभ झाला. नॉर्थन रिप्टमुळे, पंजिया पूर्व-पश्चिम छेदला जाऊन, विषुववृत्ताच्या अंशतः उत्तरेकडील लॉरेशिया हा भाग, तर दक्षिणेकडे गोंडवना हा भाग निर्माण झाला. सदर्न रिप्टमुळे गोंडवना भाग दोन भागांमध्ये विभागला गेला. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका अरेबिया, तर भारताचे ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका अशा भागात विभाजन झाले. १३५ दशलक्ष वर्षांपूर्वी भारत अंटार्क्टिकापासून वेगळा होऊन भारत उत्तरेकडे सरकू लागला. ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी उत्तर अमेरिका हा युरेशियापासून, तर दक्षिण अमेरिका आफ्रिका खंडापासून वेगळा झाला. दोन्हीही अमेरिका यांचे अपवहन पश्चिमेकडे झाले आणि नंतर अपवहनाने ते एकमेकांच्या जवळ आले आणि इस्थेमस ऑफ पनामा (Isthmus of Panama) मुळे ते जोडले गेले. २०० दशलक्ष वर्षांपूर्वी अरेबिया हा आफ्रिकेपासून वेगळा होऊन आशियाला तर ऑस्ट्रेलिया हा अंटार्क्टिकापासून वेगळा होऊन उत्तरेकडे गेला.

भूखंडवहन सिद्धांताचे पुरावे

जिगस्वा फिट (Jigsaw Fit ) : वेगनरने भूखंडाच्या बाह्य आकारामधील साम्याला Jigsaw Fit असे म्हटले आहे. दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये समरूपता आढळते.

भूशास्त्रीय पुरावे : जर भूखंडे पूर्वी एकत्र होती, तर एका खंडाच्या विशिष्ट प्रदेशात आढळणारे खडक व दुसऱ्या खंडाच्या विशिष्ट प्रदेशात आढळणारे खडक आणि खडकाचे प्रकार एकसारखे असले पाहिजे. वायव्य आफ्रिका व पूर्व ब्राझील येथे एकसारखे खडक आहेत. तसेच दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्या काही प्रदेशातील खडकही एकसारखे आहेत.

जीवशास्त्रीय पुरावे : ‘ग्लासोटेरिस’ म्हणजेच नेचेवर्गीय वनस्पती, ‘लिस्ट्रोसोरस’ म्हणजेच सरपटणारे प्राणी, ‘मेसोसोरस’ म्हणजेच गोड्या पाण्यातील प्राणी; हे अंटार्क्टिका आणि दक्षिण गोलार्धात आढळले आहेत. ‘सिनोनॅथस’ हा सरपटणारा प्राणी दक्षिण आफ्रिका व दक्षिण अमेरिकामध्ये आढळलेला आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अग्निजन्य खडक आणि त्याचे प्रकार

पुराहवामान शास्त्रीय पुरावे

अमेरिका, ग्रेट ब्रिटन, अंटार्क्टिका, भारत इत्यादी बहुतेक ठिकाणी कोळशाचे साठे आढळतात.

पुराचुंबकीय पुरावे : प्रत्येक भूखंडाची स्वतःची ध्रुवीय ‘भटकंती वक्ररेषा’ (Polar-Axis) होती आणि त्या बऱ्याच अंशी वेगवेगळ्या होत्या.

भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत : भूपट्टमधील विकृती व भूपट्टच्या सभोवतालच्या सीमांताशी (Margin) आंतरक्रिया यांचे अध्ययन म्हणजे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत होय. प्लेट टेक्टोनिक्स हा एक वैज्ञानिक सिद्धांत असून प्लेट टेक्टोनिक्स सिद्धांत प्रथम १९६२ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठाच्या डब्ल्यूजे मॉर्गन यांनी प्रकाशित केला होता. ज्यामध्ये सात मोठ्या प्लेट्सच्या प्रमाणात वेगाचे आणि हालचालीचे वर्णन केले आहे. शिलावरण हे वेगवेगळ्या कठीण विभागांचे बनलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महाद्वीप व सागरी कवच आढळतात. या विभागांना भूपट्ट (plates) म्हटले जाते आणि ते दुर्बलावरणावर फिरते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc world geography continental drift and plate tectonics theory mpup spb
Show comments