सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Plateaus In Europe : युरोप खंडात चार स्वतंत्र पर्वतश्रेणी आहेत. अति उत्तरेकडे स्कँडिनेव्हियाचे पर्वत आहे, तर पूर्वेकडे युरोप आणि आशिया खंडांची सीमा निश्चिती करणारे उरल पर्वत आहेत. आग्नेयेकडील कॉकेशस पर्वतदेखील युरोप व आशियातील सीमा निश्चित करतात. आल्प्स पर्वत या खंडाच्या दक्षिण भागात आहेत. आपण या इतर श्रेणींची थोडक्यात माहिती घेऊन आल्प्स श्रेणीची विस्ताराने माहिती घेणार आहोत.

स्कँडिनेव्हिया पर्वत

ही पर्वतश्रेणी युरोपच्या अति उत्तरेकडील स्कँडिनेव्हिया द्वीपकल्पात स्थित आहे. ज्याचा पश्चिम किनारा नॉर्वेजियन समुद्र आणि उत्तर समुद्रात जातो. या पर्वतातील गालधोपिगेन या शिखराची उंची सुमारे २४६७ मीटर आहे. हे दक्षिण नॉर्वेमध्ये वसलेले, तसेच मुख्य भूप्रदेश उत्तर युरोपमधील सर्वोच्च बिंदू आहे. स्कॅन्डिनेव्हियन पर्वतांचा मोठा भाग बर्फाचे क्षेत्र आणि हिमनद्या व्यापतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अमेरिका खंडातील पठारे

उरल पर्वत

युरोपच्या पूर्वेकडील उरल पर्वत हा सध्या अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वांत प्राचीन पर्वत आहे. हा पर्वत आर्क्टिक महासागरापासून ते कॅस्पियन समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण दिशेत विस्तारलेला आहे. त्याची लांबी सुमारे २५०० किमी आहे. या पर्वतामुळे आशिया व युरोपमधील सीमारेषा निश्चित होते.

कॉकेशस पर्वत

हा कॅस्पियन समुद्र आणि ब्लॅक सी यांच्यादरम्यान असून तो युरोपच्या आग्नेय भागात आहे. कॉकेशस पर्वतरांगेची लांबी अंदाजे १२०० किमी आहे. कॉकेशस पर्वतातील माऊंट एलब्रुस शिखर सुमारे ५६४२ मी. हे सर्वांत उंच शिखर आहे. याव्यतिरिक्त युरोपमधील सर्व १० उंच शिखरे कॉकेशस पर्वतांमध्ये, विशेषतः रशिया, जॉर्जिया किंवा रशिया-जॉर्जिया सीमेवर स्थित आहेत.

आल्प्स पर्वत

हा पर्वत युरोपच्या दक्षिण भागात असून याची निर्मितीही हिमालय पर्वतासारखीच दोन भूपट्टयांच्या टकरीतून झाली आहे. आफ्रिकेचा भूभाग उत्तरेकडे सरकण्याने या पर्वताची निर्मिती झाली. हा जगातील युवा वली पर्वतांपैकी एक आहे. आल्प्स आणि हिमालय या दोन्ही पर्वतांची निर्मिती टकरीमुळे होणे आणि दोन्ही पर्वत साधारणतः समकालीन असणे यामुळे भूगर्भी शास्त्रज्ञ कित्येकदा या पर्वतांचा उल्लेख आल्प्स – हिमालय पर्वत असा एकत्रितपणे करतात.

आल्प्स पर्वत युरोप खंडाच्या दक्षिण-मध्य भागात पश्चिमेकडे तसेच पूर्वेकडे विस्तारलेला आहे. माऊंट ब्लॅक हे मध्य आल्प्समधील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची सुमारे ४८१० मीटर आहे. पूर्वेकडे हा पर्वतमय प्रदेश ‘ब्लॅक सी’पर्यंत विस्तारलेला आहे. उच्च भूमी पुढे आशिया खंडात अनातोलिया पठारापर्यंत विस्तारलेला दिसून येतो. पश्चिम भागात ही पर्वतश्रेणी आल्प्स या नावाने ओळखली जात असली, तरी अति पश्चिमेकडील दक्षिण युरोपमध्ये आयबेरियन पठाराच्या स्वरूपात दिसून येते.

युरोप खंडातील पठारे

युरोप खंडात मोठी व विस्तीर्ण अशी पठारे अभावानेच आढळतात. युरोपातील प्रमुख पठारे मासिफ सेंट्रल, मेसेटा, रुमानिया पठार आणि मध्य रशियन पठार ही आहेत.

मासिफ सेंट्रल पठार :

मासिफ सेंट्रल हे फ्रान्सच्या पूर्व भागात आहे. हे फ्रान्सच्या मुख्य भूभागाला सुमारे १५% कव्हर करते. वास्तविक ही लहान लहान पठारांची एक मालिकाच असून त्यांची सरासरी उंची २०० ते ३०० मी. आहे. पुय डे सॅन्सी हे मॅसिफ सेंट्रलमधील  सर्वात उंच शिखर आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अमेरिका खंडातील पर्वतश्रेणी

मेसेटा पठार :

मेसेटा हे आयबेरियन द्वीपकल्पात असून त्याने स्पेनचा निम्मा भाग व्यापला आहे. त्याचा उतार उत्तर दक्षिण असा आहे. मेसेटाच्या पठाराची उंची सुमारे ६०० मीटर ते २१०० मीटर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे २ लाख २० हजार चौरस किलोमीटर आहे.

रुमानिया पठार :

रुमानियाच्या भागात दोन स्वतंत्र पठारे आहेत. एक कार्पोथियन पर्वताच्या उत्तर उतारावर असून दुसरे पूर्वेकडे ‘ब्लॅक सी’ पर्यंत विस्तारत जाते.

मध्य रशियन पठार :

मध्य रशियन पठार भूमी हा कमी उंचीवरचा पठारी प्रदेश आहे. उरल पर्वतांच्या पश्चिमेकडे असलेला हा पठारी प्रदेश पूर्व युरोपियन मैदानापेक्षा काहीसा उंच आहे. हे पठार कोणत्याही पर्वताशी संलग्न नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc world geography mountain ranges and plateaus in europe continental mpup spb