सागर भस्मे
मागील भागातून आपण ज्वालामुखीची निर्मिती, त्याची कारणे व प्रकार यांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण अमेरिका खंडातील पर्वतश्रेणीबाबत जाणून घेऊ या ….
उत्तर अमेरिका खंडातील पर्वतश्रेणी
रॉकी : रॉकी पर्वतरांगा उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात, अलास्कापासून खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने विस्तारलेल्या आहेत. या पर्वतांची लांबी सुमारे ४,८३० किमी आहे. रॉकी पर्वतातील माउंट मॅक्किन्ले हे सर्वाधिक उंचीचे शिखर असून, त्याची उंची सुमारे ६,१९४ मीटर; तर रॉकी पर्वतांची रुंदी सुमारे १०० ते ४०० किमी आहे. हे पर्वत अंतर्गत मैदानी प्रदेशातून एकदम वर आल्यासारखे दिसतात. रॉकी पर्वत व त्याच्याशी निगडित असलेल्या पर्वतरांगा आणि पठारांना एकत्रितपणे उत्तर अमेरिकी पर्वतसमूह, असे संबोधले जाते. कोस्टल श्रेणी, कॅस्केड श्रेणी व सिएरा नेवाडा श्रेणी एकमेकांशी निगडित असून, त्या रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडे आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : ज्वालामुखीची निर्मिती, कारणे व प्रकार
ॲपेलेशियन : उत्तर अमेरिकेतील दुसरी प्रमुख पर्वतश्रेणी म्हणजे ॲपेलेशियन पर्वतश्रेणी आहे. ही खंडाच्या पूर्व भागात असून, पश्चिमेकडील पर्वतसमूहाच्या मानाने ही पर्वतश्रेणी अतिप्राचीन आहे आणि तिचे मोठ्या प्रमाणात अपक्षरण झालेले आहे. ॲपेलेशियन पर्वतश्रेणी ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वांत प्राचीन पर्वतश्रेणी आहे.
पँजिया (Pangea) : महाखंडाच्या विलगीकरणाआधीच्या काळात या पर्वतांचा विस्तार खूप मोठा होता. माउंट मिचेल हे या पर्वतांतील सर्वांत उंच शिखर आहे. अटलांटिक किनाऱ्यावरील न्यू फाउंडलँड बेटांपासून नैर्ऋत्य दिशेकडे सुमारे २,४०० किमी अंतरापर्यंत ॲपेलेशियन पर्वतांचा विस्तार दिसून येतो. त्यांची सर्वसाधारण दिशा नैर्ऋत्य-ईशान्य अशी आहे. या पर्वतांच्या दोन्ही बाजूस पठारे आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : यमुना नदी प्रणाली
दक्षिण अमेरिका खंडातील पर्वतश्रेणी
अँडीज् : जगातील सर्वांत लांब पर्वतश्रेणी म्हणजे अँडीज पर्वतश्रेणी होय. अँडीज पर्वतांची लांबी सुमारे सात हजार किमीपेक्षा जास्त आहे. या पर्वतांची सरासरी उंची चार हजार मीटर असून, माउंट ॲकन्काग्वा हे सुमारे ६,९६२ मीटर उंचीचे अँडीज पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतांची सरासरी रुंदी २०० किमी आहे; तर सर्वाधिक रुंदीचा भाग ६०० किमी आहे. सर्वसाधारणतः हे पर्वत उत्तरेकडे जास्त रुंद आणि दक्षिणेकडे निमुळते होत जातात. तसेच हे पर्वत दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असून, ते उत्तर-दक्षिण दिशेत विस्तारलेले आहेत.
अँडीज पर्वत हे तेथे असलेल्या जागृत ज्वालामुखींमुळे विशेष प्रसिद्ध आहेत. या पर्वतात ३० हून जास्त जागृत ज्वालामुखी आहेत. सुमारे ५,८९६ मीटर उंचीवर असलेला कोटोपाक्सी ज्वालामुखी हा जगातील सर्वांत उंच ज्वालामुखी आहे.