या लेखात आपण ‘कला व संस्कृती’ या विषयाचा यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आढावा घेणार आहोत. या विषयातील बहुतेक घटक जसे की स्थापत्यशैली, साहित्य व शिल्प यांचा अभ्यास आपण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासातही करतो. पूर्वपरीक्षेत या विषयाची प्रश्नसंख्या कमी असली तरी अपेक्षित घटकांचा अभ्यास करायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कला व संस्कृती अभ्यासताना पुढील घटकांचा अभ्यास अपेक्षित आहे –

भारताची संस्कृती आणि वारसा : सादरीकरणाच्या कलांचे उद्दिष्ट आणि विविध टप्प्यात त्यांचा विकास, भारतीय संस्कृतीमध्ये शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत आणि लोकनृत्यांचे योगदान,सादरीकरणाच्या कलांना भेडसावणारी आव्हाने, भारतात विविध टप्प्यात नाटकाचा विकास आणि लोकनाट्याचे योगदान, भारतातील धार्मिक आणि लौकिक कला.

संगीत : भारतीय संगीताची उत्क्रांती,अमीर खुसरो, मोहम्मद शाह यांचे योगदान, हिंदुस्तानी व कर्नाटकी संगीताची उत्क्रांती; वैशिष्ट्ये; फरक आणि साम्य, प्रादेशिक संगीत आणि आधुनिक संगीत.

नृत्य : नृत्याची उत्क्रांती (ऋग्वेद, हडप्पा, नटराज), भारतातील शास्त्रीय नृत्यव लोकनृत्य. २०२४ मधील पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न बघा-

प्र. खालीलपैकी युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीतला नवीनतम समावेश कोणता आहे?

अ) छाऊ नृत्य ब) दुर्गा पूजा

क) गरबा नृत्य ड) कुंभ मेळा

२०२३ मध्ये गरबा नृत्य या यादीत समाविष्ट झाले आणि २०२४ मध्ये हा प्रश्न विचारला गेला.

नाटक : नाट्यशास्त्राचा परिचय, भारतातील नाटकाचा विकास व नाटकासंबंधी विविध ग्रंथ. उदा. महाभाष्य, मृच्छकटिक.

भाषा आणि साहित्य : वेदिक साहित्य,तमिळ भाषा आणि संगम साहित्य,अभिजात भाषा, भाषेची उत्क्रांती आणि समाजावर त्याचा परिणाम,आधुनिक भारतीय साहित्य. युपीएससी पूर्वपरीक्षा २०२१ मधील खालील प्रश्न बघा –

प्र. भारताच्या संदर्भात, ‘हल्बी हो’ आणि ‘कुई’ या संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?

अ) उत्तर पश्चिम भारतातील नृत्य प्रकार

ब) संगीत वाद्यो

क) पूर्व ऐतिहासिक गुफा चित्रे

ड) आदिवासी भाषा

हा प्रश्न आदिवासी भाषेशी संबंधित असून सध्या ‘कोकबोरोक’ ही त्रिपुरा राज्यात बोलली जाणारी भाषा चर्चेत आहे. चालू घडामोडीतील संदर्भ आपण लक्षात घ्यायला हवेत.

प्र. खालील विधानांवर विचार करा:

१) २१ फेब्रुवारीला युनेस्कोद्वारा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो.

२) बंगाली राष्ट्रीय भाषांपैकी एक असावी अशी मागणी या दिवशी पाकिस्तानाच्या घटनेच्या सभेत करण्यात आली.

वरील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे/ आहेत?

अ) फक्त १ ब) फक्त २

क) १ आणि २ दोन्ही ड) यापैकी नाही

भारतातील वास्तुकला : हडप्पा संस्कृतीतील वास्तूकला, बौद्ध आणि जैन धर्माचा भारतीय वास्तुकलेवरील प्रभाव – स्तूप; चैत्य आणि विहार, वास्तुकलेवरील पर्शियन आणि ग्रीक आक्रमणाचा प्रभाव, मौर्य वास्तुकला, गंधार आणि मथुरा कला शाळा, गुप्त युगातील सांस्कृतिक विकास, मंदिर वास्तुकला, पल्लव वास्तुकला, नालंदा शिक्षण केंद्र, मध्ययुगीन काळातील वास्तुकला – दिल्ली सल्तनत, प्रादेशिक राज्ये, विजयनगर, मुगल, इंडो-इस्लामिक वास्तुकला. औपनिवेशिक वास्तुकला, आधुनिक आणि भूतकाळातील वास्तुकला संरचनांची उपयुक्तता, वास्तुकला संरचनांचे संरक्षण आणि जतन, भारतीय संस्कृतीचा दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रसार. २०२४ मधील पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न बघा. तसा हाही प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे-

प्र. युनेस्कोने जारी केलेल्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या खालील मालमत्तांचा विचार करा:

१. शांतिनिकेतन २. राणी-की-वाव

३. होयसाळांच्या पवित्र समुह

४. बोधगया येथील महाबोधी मंदिर संकुल

वरील मालमत्तांपैकी २०२३ मध्ये किती समाविष्ट झाल्या?

अ) केवळ एक ब) केवळ दोन

क) केवळ तीन ड) सर्व चार

भारतातील ब्राँझ शिल्पे : हडप्पातील ‘नृत्य करत असलेली मुलगी’, चोलाचे ब्राँझ शिल्प – नटराज अशा शिल्पांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

भारतातील चित्रकलेचे प्रकार : प्रागैतिहासिक रॉक पेंटिंग, भित्तीचित्रे, बाघगुफा, सित्तानवसाल पेंटिंग, आर्मामलाई गुफा, पाल चित्रांच्या शाळा, मुघलकाळातील चित्र (भारतीय आणि पर्शियन शैलीचे संश्लेषण), पहाडी, राजपूत आणि डेक्कन पेंटिंगचा विकास, बंगाल आर्ट स्कूल, पुनर्जागरण किंवा पुनरुत्थानवादी चित्र, मद्रास आर्ट स्कूल,सजावटीचे चित्र – मधुबनी; कलामकारी; कालिघाट; वारली; पटचित्र.

भारतीय नाट्य फॉर्म : भारतातील पारंपरिक लोकनाट्याचे महत्त्व, भारतातील पारंपारिक लोक नाट्याचे विविध प्रकार, भारतातील संस्कृत नाट्य,नाट्यक्षेत्रातील आव्हाने, भारतातील कटपुतलीचे प्रकार, कटपुतलीच्या संकल्पना.

धार्मिक तत्त्वज्ञान : बौद्ध धर्म आणि जैन धर्म व त्यांचा प्रभाव, सूफीवाद आणि त्याचा प्रभाव, वेदान्त तत्त्वज्ञान, भक्ती व सूफी परंपरा.

वरील घटकांना खालील २ भागात वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यावरून त्यांचे पूर्वपरीक्षेतील त्यांचे महत्त्व लक्षात येईल –

बहुतेक विद्यार्थी ‘कला व संस्कृती’ या विषयाला ‘ऑप्शन’ला ठेवतात. परंतु यूपीएससी मध्ये यश मिळविण्यासाठी प्रत्येक विषय महत्त्वपूर्ण भूमिका बाजवतो. ‘ऑप्शन’ला ठेवणे ही बाबच ‘ऑप्शन’ला ठेवा. मग यश तुमचेचं आहे.

sushilbari10 @gmail. com