निलेश देशपांडे
प्रस्तुत लेखामध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील विविध विषयांपैकी एक महत्त्वाचा आणि मुख्य परीक्षेला असणारा विषय अनिवार्य मराठी या पेपरबाबत विस्तृत चर्चा करणार आहोत. या लेखमालिकेमध्ये आपण अनिवार्य मराठी हा पेपर कसा असतो? त्याची तयारी कशाप्रकारे करावी? या पेपरच्या अभ्यासाचा इतर पेपरला काय फायदा होऊ शकतो? या प्रश्नांची समग्र चर्चा करणार आहोत.
सदर लेखमालेमध्ये पहिल्या लेखापासून आपण पेपरचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नांचा स्तर, प्रवाह व प्रश्नांचा कल या प्राथमिक मुद्दय़ांपासून ते विविध कौशल्ये, उतारा सोडवणे, उतारा वाचन, भाषांतर, सारांश लेखन या मुद्यांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. पुढे जाऊन आपण सध्या झालेला २०२३ चा मराठी (अनिवार्य) पेपर व त्याचे स्वरूप याची चर्चा करणार आहोत.
या लेखमालेतील प्रथम लेखामध्ये आपण पेपरचे स्वरूप, पेपरचा अभ्यासक्रम, प्रश्नांचा स्तर, गुणांकन या बाबी समजून घेणार आहोत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये दोन अनिवार्य पेपर असतात. त्यापैकी एक पेपर मातृभाषेमध्ये द्यायचा असतो व एक इंग्रजी भाषेमध्ये अनिवार्य पेपर असतो. अर्थातच मराठी अनिवार्य पेपर महाराष्ट्रात राहणाऱ्या व मराठी भाषा ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्यासाठी असणार आहे. याचाच अर्थ ही आपली मातृभाषा आपणास बोलता, लिहिता, वाचता येत आहे का? या प्राथमिक बाबी तपासणारा हा पेपर.
मराठी अनिवार्य पेपरचे स्वरूप :
एकूण प्रश्न – ६; गुण – ३००; वेळ – ३ तास; भाषा – मराठी
आपणास अनिवार्य पेपरमध्ये दिलेले एकूण सहा प्रश्न सोडवणे हे आवश्यक आहे. आपणास या पेपरमध्ये एकूण गुणांच्या २५ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. म्हणजेच एकूण गुणांपैकी ७५ गुण मिळालेच पाहिजेत. यापेक्षा कमी गुण मिळाल्यास आपण अपात्र ठरतो. म्हणून या पेपरचा व्यवस्थितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे हे आहे की आपण केवळ पात्र होता येईल तेवढाच पेपर न सोडवता संपूर्ण पेपर सोडवणे अनिवार्य आहे.
अभ्यासक्रम :
प्र. १) निबंध (६०० शब्द) – गुण १००
प्र. २) उतारा सोडवणे – गुण ६०
प्र. ३) एक-तृतीयांश सारांश – गुण ६०
प्र. ४) उताऱ्याचे इंग्रजीत भाषांतर – गुण २०
प्र. ५) उताऱ्याचे मराठीत भाषांतर – गुण २०
प्र. ६) व्याकरण व शब्दसंग्रह – गुण ४०
एकूण प्रश्नांची संख्या, गुणांकन व पेपर सोडवण्यास दिलेला कालावधी विचारात घेता आपणास पेपर सोडवण्यासाठी मुबलक कालावधी दिलेला आहे हे लक्षात येते. हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याकडे भाषेच्या विविध कौशल्यांपैकी एक व महत्त्वाचे असलेले लेखन कौशल्य मोठय़ा प्रमाणात आत्मसात केलेले असणे आवश्यक आहे.
प्रश्नांचा स्तर :
मित्रांनो, एक बाब कायम स्मरणात ठेवा, ती म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत आहात त्या परीक्षेचा अभ्यासक्रम मुखोद्गत असणे ही अभ्यास करण्याची पहिली पायरी आहे. अगदी त्याचप्रमाणे जो पेपर तुम्ही सोडवणार आहे त्या पेपरच्या प्रश्नांच्या स्वरूपाबद्दल पूर्ण ज्ञान आवश्यक असते. अन्यथा बऱ्याचदा आपण अपूर्ण माहितीच्या जोरावर अभ्यास करतो व ते कष्ट वाया जाते.
यासंदर्भात एक गोष्ट पाहू. एकदा काही चोर अळट मशीनची चोरी करतात. मशीन तुटत नाही हे पाहून ते मशीन पळवून नेतात. खूप दूर नेऊन मशीन फोडतात. फोडल्यावर त्यांच्या लक्षात येते की ही अळट मशीन नसून पासबुक पिंट्र करणारे मशीन आहे. या गोष्टीतून आपल्याला एक बाब लक्षात येते की, तुम्ही जे कार्य करत आहात त्याची पूर्ण तयारी, स्वरूप, नियोजन केल्याशिवाय यश मिळत नाही.
अनिवार्य पेपरचे स्वरूप पाहता एक बाब लक्षात येते की, आपणास सराव आवश्यक आहे. आपण पूर्णत: सराव केल्यास अनिवार्य पेपरमध्ये पात्र होऊच, मात्र इतर पेपरमध्ये या सरावाचा फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी या पेपरमध्ये अपात्र ठरण्याची शक्यता असते. या अगोदर अनेक विद्यार्थ्यांना अनिवार्य पेपरमध्ये पात्र न ठरल्याने अपयशाचा सामना करावा लागलेला आहे. अनिवार्य पेपरकडे अनेक विद्यार्थी अत्यंत सोपा पेपर आहे, मला सहज छान गुण मिळतील या दृष्टीने पाहतात. मात्र विद्यार्थ्यांनी प्राथमिक टप्प्यापासून अनिवार्य पेपरची तयारी करणे गरजेचे असते.
आपणास प्रश्न क्र. १ मध्ये एका विषयावर ६०० शब्दांमध्ये निबंध लेखन करावयाचे आहे. यासाठी आपणास चार विषय दिलेले असतात. १०० गुणांसाठी हा निबंध आपणास लिहावयाचा आहे. विषयाचा स्तर लक्षात घेता आपणास एक गोष्ट ध्यानात येते की दररोज वर्तमानपत्र वाचन करणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज पेपर वाचन व दर्जेदार अवांतर वाचन केल्यास निबंध योग्य प्रकारे लिहिता येऊ शकतो. प्रश्न क्र. २ मध्ये आपणास उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा सारांश लेखनाचा आहे तर चौथ्या प्रश्नामध्ये मराठी उतारा इंग्रजीत भाषांतर करायचा आहे. पाचव्या प्रश्नामध्ये मराठी उतारा इंग्रजीत भाषांतर करायचा आहे. सहाव्या प्रश्नात समानार्थी/ विरुद्धार्थी शब्द इ. बाबी येतात.
मित्रांनो, सदर लेखात आपण मराठी अनिवार्य पेपरचे स्वरूप पाहिले. याच पेपरबाबत पुढील लेखामध्ये आपण अनिवार्य पेपरसाठी आवश्यक कौशल्ये अभ्यासूया.