डॉ महेश शिरापूरकर
आजच्या लेखात यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ चा अभ्यासक्रम व या पेपरच्या तयारीकरिता आवश्यक रणनीती, अभ्यास साहित्य इत्यादी बाबींवर चर्चा करणार आहोत. या पेपरच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, कारभारप्रक्रिया आणि राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय, आणि आंतरराष्ट्रीय संबंध या पाच प्रमुख अभ्यासघटकांचा आणि त्याअंतर्गत इतर उपघटकांचा समावेश केलेला आहे.
भारतीय राज्यघटना हा या पेपरचा गाभा आहे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केवळ पूर्व परीक्षेकरिताच महत्त्वाचा नसून मुख्य परीक्षेतही या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्यघटना या घटकातील उपघटक जसे की, राज्यघटनेचा ऐतिहासिक आधार, तिची उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्त्या, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मौलिक संरचना इत्यादी बाबी अभ्यासाव्या लागतील.
ब्रिटिश राजवटीदरम्यान भारतीय राज्यघटनेच्या उत्क्रांतीला प्रारंभ झाला. ब्रिटिशांनी १७३३ साली लागू केलेला नियमन कायदा ते भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या दरम्यान केलेले विविध कायदे, कायद्यांच्या तरतुदीतून विकसित होत गेलेल्या विविध घटनात्मक तरतुदी, स्वातंत्र्यलढ्या दरम्यान भविष्यातील भारताची राज्यघटना कशी असावी, विविध विचारांच्या नेत्यांनी केलेले वैचारिक मंथन, वादविवाद आणि चर्चा समजून घ्याव्यात. त्याचबरोबर संविधान समितीची रचना, तिचे कामकाज, समितीवर करण्यात आलेली टीका व त्याचा प्रतिवाद, उद्दिष्टांचा ठराव, संविधान समितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरील वादचर्चा, राज्यघटनेची स्वीकृती याचा मागोवा घेणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. जगातील इतर संविधानांचा देखील भारतीय संविधान निर्मितीवर प्रभाव आढळतो. घटनाकारांनी अन्य देशांच्या संविधानामधील सर्वोत्तम भाग एकत्र केले, हे करत असताना त्यांनी भारतातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भारताकरिता अनुरुप तरतुदी तसेच १९३५ च्या कायद्यातील आवश्यक प्रशासकीय तपशील इत्यादी बाबी घेतल्या. यामुळे भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान बनले. राज्यघटना निर्मितीसाठी सुमारे २ वर्ष ११ महिने १७ दिवस इतका कालावधी लागला. घटना स्वीकारली त्यावेळी घटनेत २२ भाग ३९५ कलमे आणि ८ अनुसूची यांचा समावेश होता.
लिखित व विस्तृत संविधान, घटना दुरुस्ती प्रक्रियेतील ताठरता व लवचिकता यांचा मेळ, सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक, संघराज्य, आणीबाणीची तरतूद, मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, स्वतंत्र न्यायमंडळ, एकेरी नागरिकत्व, त्रिस्तरीय शासन इत्यादी राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये संकल्पनांसह आणि त्यातील बदलांसह अभ्यासावीत.
राज्यघटनेचा अभ्यास करताना सर्वप्रथम ‘सरनामा’ (उद्देशिका/प्रास्ताविक) समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही राज्यघटनेची उद्दिष्टे व ध्येय्ये सरनाम्यामध्ये स्पष्ट केलेली असतात. सरनाम्यास ‘उद्देश पत्रिका’ असेही म्हणतात. पंडित ठाकुरदास भार्गव यांच्या मते, सरनामा हा घटनेचा आत्मा आहे. भारतीय सरनाम्यातून अधिसत्तेचा स्त्रोत, राज्य व्यवस्थेचे स्वरूप आणि राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे स्पष्ट होतात. सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेल्या तरतुदी आणि त्यासंबंधी भारतीय आणि पाश्चात्त्या अभ्यासकांनी केलेले विवेचन-विश्लेषण अधिक महत्त्वाचे आहे, त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. या संकल्पनांबरोबरच सरनाम्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाचे खटले अभ्यासणे आवश्यक ठरते. कारण या संकल्पनांवर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आढळतात. उदा. गेल्यावर्षी म्हणजे २०२३ साली झालेल्या मुख्य परीक्षेत भारतीय संविधानाशी संबंधित पुढील प्रश्न विचारलेले होते.
‘‘भारताचे संविधान प्रचंड गतिशीलतेच्या क्षमतांसह एक जिवंत साधन आहे. हे संविधान प्रगमनशील समाजासाठी तयार करण्यात आले आहे.’’ जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे अधिकार क्षेत्र विस्तारत आहे, या विशेष संदर्भाने हे विधान सोदाहरण स्पष्ट करा. (१५ गुण).
समर्पक संविधानिक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयांच्या साहाय्याने लिंगभाव न्यायासंबंधी संविधानिक परिप्रेक्ष्य स्पष्ट करा. (१५ गुण)
भारतीय संविधान या विषयाची तयारी करण्यासाठी एनसीइआरटीचे Constitution at work हे इंग्रजीतील तर ‘राजकीय सिद्धांत-संकल्पना व भारतीय राज्यघटना’ हे युनिक अॅकॅडमी प्रकाशित मराठीतील क्रमिक पुस्तक प्राथमिक वाचनासाठी उपयुक्त ठरते. या व्यतिरिक्त भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया (खंड १) (६ वी आवृत्ती, २०२४) हा युनिक अॅकॅडमी प्रकाशित मराठी माध्यमातून राज्यघटनेवर सर्वाधिक अद्यायावत असा ग्रंथ आणि द युनिक अॅकॅडमीद्वारे ऑनलाइन स्वरुपात प्रकाशित करण्यात येणारे ‘बुलेटिन’ हे मासिक वाचावे. या मासिकात मुख्य परीक्षेतील चारही ॅर संबंधी विविध स्त्रोतांमधील चालू घडामोडी मराठीत उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय संविधान हा घटक किंवा यातील तरतुदी हा भाग पारंपरिक स्वरूपाचा असला तरी परीक्षेत येणारे प्रश्न हे समकालीन घडामोडींना जोडून विचारले जातात. याकरिता द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता ही वृत्तपत्रे, सरकारची संकेतस्थळे इत्यादी बाबी वारंवार पाहणे महत्त्वाचे ठरते. संविधानाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विविध संकल्पना व त्यांचा अर्थ स्पष्टपणे समजून घेणे होय. यानंतरच आपली तयारी परिपूर्ण होऊ शकते.