आजच्या लेखामध्ये आपण घटनादुरुस्ती प्रक्रिया, मौलिक संरचना आणि आणीबाणीविषयक तरतुदी इ. बाबी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण भारतीय संविधानातील कलम ३६८ मध्ये समाविष्ट असलेल्या घटनादुरुस्ती प्रक्रियेसंबंधी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधान कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याच्या निर्मितीला विशिष्ट काळाचा संदर्भ असतो. त्या काळातील देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थिती विचारात घेतली जाते. याशिवाय भविष्यातील संभाव्य समस्या, बदलणारी परिस्थिती यांचा अंदाज घेऊन काही तरतुदी राज्यघटनेत समाविष्ट केल्या जातात. परिणामी, संविधानामध्ये बदललेल्या परिस्थितीशी सुसंगत ठरणाऱ्या सुधारणा करणे उचित ठरते. भारतीय संविधानाच्या भाग २० मधील ३६८ व्या कलमात घटनादुरुस्तीची पद्धत सांगितलेली आहे. यामध्ये दुरुस्तीचे उद्देश काय असावेत, घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत, घटनादुरुस्ती करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा इत्यादी बाबींचा समावेश आहे. घटनादुरुस्तीसाठी औपचारिक आणि अनौपचारिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो.

हेही वाचा : UPSC Key : यूपीएससी सूत्र : अनुसूचित जाती-जमातींसाठीही क्रिमीलेअर अन् हिमाचल प्रदेशातील ढगफुटी; वाचा सविस्तर…

भारतीय राज्यघटना संसदेच्या साध्या बहुमताने; संसदेच्या विशेष बहुमताने आणि; संसदेचे विशेष बहुमत आणि निम्यापेक्षा अधिक घटकराज्यांची मान्यता या पद्धतीने बदलली जाऊ शकते. घटनादुरुस्तीच्या अनौपचारिक पद्धतीमध्ये न्यायालयीन अन्वयार्थ आणि संकेत, रूढी आणि व्यवहार यांचा समावेश होतो. या माध्यमातूनही घटनात्मक तरतुदीमध्ये बदल घडवून आणता येतो.

घटनादुरुस्ती प्रक्रियेचे अवलोकन केले असता भारतीय राज्यघटनेने लवचिकता व परिदृढता (ताठरपणा) यांचा सुवर्णमध्य साधलेला आहे. या घटकाची तयारी करताना घटनादुरुस्ती प्रक्रिया, आतापर्यंत झालेल्या सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका व त्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निवाडे यांची माहिती असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Success Story: चाळीतली छोटीशी खोली, अभ्यासासाठी शेजारच्यांचा वायफाय; तारेवरची कसरत करत आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण; वाचा अभिषेकचा प्रेरणादायी प्रवास

भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीचा अधिकार संसदेला बहाल केलेला आहे. मात्र या अधिकाराचा वापर किती व कोणत्या संदर्भात करावा यावरून संसद व सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. १९७३ साली केशवानंद भारती खटल्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेमध्ये बदल करता येणार नाही असा निर्णय दिला. जरी राज्यघटनेमध्ये मौलिक संरचना कुठेही परिभाषित केलेली नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मौलिक संरचनेची चौकट ठरविण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने मौलिक संरचनेच्या तत्त्वप्रणालीद्वारे संसदेच्या घटनादुरुस्तीच्या निरंकुश अधिकारांवर निर्बंध आणले. संविधानाची सर्वोच्चता, कायद्याचे राज्य, देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संघराज्यात्मक स्वरूप, प्रजासत्ताक, लोकशाहीप्रधान शासन व्यवस्था, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, सत्ताविभाजन, मार्गदर्शक तत्त्वे, न्यायालयीन पुनर्विलोकन इत्यादी बाबींचा मौलिक संरचनेत समावेश केला. पुढे न्यायमूर्ती जगमोहन रेड्डी यांनी संविधानातील उद्देशपत्रिका ही सुद्धा घटनेची मौलिक संरचना आहे असे स्पष्ट केले. राज्यघटनेचा गाभा आणि तत्त्वज्ञान टिकवून ठेवण्यासाठी हा सिद्धांत आणला गेला. या सिद्धांताचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा सर्वोच्च न्यायालयाद्वारे रद्द घोषित केला जातो.

भारतीय संविधानातील भाग १८ मध्ये कलम ३५२ ते ३६० मध्ये आणीबाणीविषयक तरतुदींचा समावेश केला आहे. या तरतुदीमुळे निकडीची परिस्थिती, युद्ध, बाह्य आक्रमण, अंतर्गत अशांतता, आर्थिक संकट इत्यादी अनियमित अथवा आणीबाणी सदृश्य परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारला सक्षम बनवले आहे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षा तसेच लोकशाही स्वरुपाची राजकीय व्यवस्था आणि राज्यघटना इत्यादी बाबींचे संरक्षण करता यावे याकरिता भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीविषयक तरतुदींचा समावेश केला गेला. भारतीय संविधानामध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो. राष्ट्रीय आणीबाणी (कलम ३५२); राष्ट्रपती राजवट (कलम ३५६) आणि; वित्तीय आणीबाणी (कलम ३६०). आणीबाणीच्या काळामध्ये सर्व सत्ता केंद्र सरकारच्या हाती एकवटते आणि राज्यांवर केंद्राचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित होते. राज्यघटनेमध्ये कोणतीही दुरुस्ती न करता देखील यामुळे संघराज्य स्वरूपाचे रूपांतर एकात्म व्यवस्थेमध्ये होते. या घटकाची तयारी करताना आणीबाणीविषयक तरतुदी, आणीबाणीचे मूलभूत हक्कांवर होणारे परिणाम इत्यादी बाबी जाणून घ्याव्यात.

हेही वाचा : Success Story: योगा मॅटपासून के फिटनेस प्रोडक्ट्सपर्यंत, ‘या’ उद्योजकाने दोन वर्षांत केली ३० कोटींची उलाढाल

तसेच, राज्य आणीबाणीविषयक तरतुदी अभ्यासाव्यात कारण आजवर कलम ३५६ चा बऱ्याचदा गैरवापर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवटीबाबतचे न्यायालयाचे निवाडे अभ्यासावेत. यानंतर वित्तीय आणीबाणी संबंधित तरतुदी जाणून घ्याव्यात. वित्तीय आणीबाणी कोणत्या परिस्थितीमध्ये घोषित केली जाते ती परिस्थिती तसेच वित्तीय आणीबाणीचे परिणाम माहीत करून घेणे आवश्यक ठरते.

उपरोक्त घटकांचा अभ्यास ‘भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया’ खंड १, इंडियन पोलिटी, या संदर्भ ग्रंथांमधून करावा. तसेच, वृत्तपत्रांचे नियमित वाचन आपल्याला या तरतुदींशीसंबंधित समकालीन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. याकरिता ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’ यांसारख्या वृत्तपत्रांचा वापर करावा.

भारताचे संविधान

(भाग ३)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation constitution of india part 3 css