विक्रांत भोसले

आपण सर्वचजण स्वत:ची भविष्यातील प्रतिमा पाहत असतो; जी समूह म्हणून अथवा समाज म्हणून अधिक न्यायाधिष्ठित व अधिक नैतिक जबाबदारी पाळणाऱ्या समूहाची प्रतिमा असते. केवळ समूह म्हणून नाही तर समूहातील विविध घटकांसाठी, प्रारुपांसाठी विशिष्ट नैतिक चौकट असावी असे आपल्याला वाटत असते. ही चौकट त्या-त्या समूहाला/ घटकाला अधिक बळकटी देवू शकते. नैतिक शासनव्यवस्था, नैतिक उद्योगव्यवस्था, नैतिक शिक्षणव्यवस्था या आणि अशा अनेक घटकांचा यामध्ये समावेश होतो.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

यूपीएससीमधील Ethics and Integrity या घटकामध्येदेखील नैतिकता व नीतीनियम यांची विविध प्रारुपांबरोबरील गुंतागुंतीची मांडणी उमेदवाराने अभ्यासलेली असणे अपेक्षित आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जबाबदार नागरिक व मनुष्य म्हणून वेगवेगळय़ा परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागते. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या वागण्याचे मापदंड कसे ठरतात व आपण कसे वागतो याचा अभ्यासपूर्ण, नीतिशास्त्रानुसार केलेला विचार म्हणजेच Ethics and Integrity हा घटक होय. मात्र सर्वाना एकाच वेळेस लागू होतील, तसेच स्थळ, काळ बदलले तरी समर्थनीय ठरतील अशा नीतीनियमांची चौकट करणे मुळातच सोपे काम नाही.

नीतिनियमांची चौकट निश्चित करण्यातील प्रमुख अडचणी :
(१) कोणते मापदंड वापरून अशी नीतिनियमांची चौकट ठरवावी?
(२) ही नीतिनियमांची चौकट आपण सामोरे जात असणाऱ्या प्रत्येक लहान-मोठय़ा प्रसंगास कशी लागू करावी?
(३) ही नीतीनियमांची चौकट कुणी ठरवावी?
जर आपले नीतिनियम भावना, धर्म, कायदा, रूढी-परंपरा किंवा विज्ञान या कशावरच बेतलेले नसतील तर मग ते कशाचे बनले आहेत? अनेक विचारवंतांनी, तत्त्ववेत्त्यांनी या प्रश्नांचा आढावा घेतला आहे. शेकडो वर्षांच्या तात्विक घुसळणीतून प्रमुख पाच नीतिनियमांच्या चौकटी सर्वानी मान्य केल्या आहेत. या आणि पुढील लेखांमध्ये मिळून आपण या पाचही नीतिनियमांच्या चौकटींचा सखोल विचार करणार आहोत.

नीतिनियमविषयक या चौकटी खालीलप्रमाणे –
( I) उपयुक्ततावादी दृष्टिकोन
( The Utilitarian Approach)
( II) हक्काधिष्ठित दृष्टिकोन
( The Rights Approach)
( III)न्यायाधिष्ठित दृष्टिकोन
( The Justice Approach)
( IV) सामायिक कल्याणवादी दृष्टिकोन (The Common Good Approach)
(V) सद्गुणाधिष्ठित दृष्टिकोन ( The Virtue Approach)

या व पुढील लेखात या पाचही चौकटींचा आढावा आपण घेणार आहोत. त्यानंतरच्या लेखांमधून या प्रत्येक विचारसरणीवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. आजच्या लेखामध्ये आपण पहिल्या दोन दृष्टिकोनांचा विचार करणार आहोत. त्याचबरोबर या दोन्ही दृष्टिकोनांना धरून यूपीएससीसाठी कोणत्या विचारवंतांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, हे देखील पाहणार आहोत.

( I) उपयुक्ततावादी दृष्टिकोन

( The Utilitarian Approach) थोडक्यात सांगायचे झाले तर, जास्त लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळावा असे धोरण असणे म्हणजे उपयुक्ततावादी दृष्टिकोन असणे होय. अशाच कृतींना या विचारांनुसार नैतिक मानले जाते. या विचारसरणीनुसार निर्णय घेत असताना अनेक वेगवेगळय़ा बाबींमुळे या विचारसरणीचे महत्त्व स्पष्ट होते –
(१) प्रत्येक व्यक्तीला म्हणूनच प्रत्येक मताला समान किंमत असते.
(२) सर्वच जण स्वत:च्या सुखाकरिता प्रयत्नशील राहणार व दु:खे टाळण्याचा प्रयत्न करणार हे गृहीत धरलेले असते.
जास्तीत जास्त आनंद किंवा कमीत कमी दु:ख निर्माण करणे असेही या दृष्टिकोनाकडे पाहाता येते. मात्र याही दृष्टिकोनामध्ये काही त्रुटी आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे? आनंद? यासाठी कोणतीही नैतिक मोजपट्टी लावली जात नाही. तसेच अल्पसंख्यांकांच्या मताला अजिबात वाव मिळत नाही. उपयुक्ततावादाबद्दलचे सविस्तर काम जेरेमी बेंथम आणि जे. एस. मिल यांनी केले आहे. उपयुक्ततावादाविषयीच्या सविस्तर लेखामध्ये आपण या दोन्ही विचारवंतांच्या मांडणीचा अभ्यास करणार आहोत.

( II) हक्काधिष्ठित दृष्टिकोन

( The Rights Approach) यामधील निर्णय हे अशा प्रकारे घेतले जातात की व्यक्तीच्या नैतिक हक्कांचा आदर केला जावा व त्यांचे पूर्ण संरक्षण केले जावे. या विचारसरणीमध्ये असे मानले जाते की माणूस उत्क्रांतीच्या शिडीवर पुष्कळच वर पोहोचला आहे व म्हणून त्याला ठरावीक प्रतिष्ठा मिळालेली आहे.
हक्काधिष्ठित दृष्टिकोन बाळगत असताना माणसाकडे दोन वेगवेगळय़ा प्रकारच्या क्षमता असतात असे मानले जाते; त्या म्हणजे माणसामध्ये अंगभूत असणाऱ्या क्षमता आणि माणूस समाजामध्ये कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकतो त्यावर आधारित क्षमता. या विचारसरणीनुसार माणसाला मुळातच मौल्यवान समजले जाते. तसे करत असताना त्याला मिळणारे हक्क त्याच्याकडील क्षमतांवर ठरवले जात नाहीत; जसे की, अपंग व्यक्तीला सुदृढ व्यक्तीसारखाच मतदानाचा हक्क असतो. यामध्ये त्या व्यक्तीकडे अंगभूत कोणत्या क्षमता आहेत अथवा ती व्यक्ती समाजामध्ये काय योगदान देऊ शकते याला प्राधान्य दिले जात नाही. ती व्यक्ती केवळ माणूस म्हणून जन्माला आली आहे म्हणून काही ठरावीक हक्क त्या व्यक्तीसाठी मान्य केलेच पाहिजेत, अशी ही विचारसरणी आहे.

इतर सर्वंच दृष्टिकोनांप्रमाणे याही दृष्टिकोनाला काही मर्यादा आहेत. दोन व्यक्तींचे अथवा समूह गटांचे हक्क जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, तर मोठा पेचप्रसंग उभा राहातो. याचबरोबर सर्व जगात एका वेळेस लागू करता येईल अशी हक्कांची परिपूर्ण यादी अस्तित्वात नाही. तरीदेखील समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा या दृष्टिकोनामधून विचार करावा लागतो; जसे की, अन्याय होत असलेल्या व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव नसणे अथवा ती व्यक्ती हक्क प्रस्थापित करण्याकरिता शारीरिक अथवा मानसिकदृष्टय़ा दुर्बल असणे. हक्काधिष्ठित निर्णय घेत असताना निर्णय घेणाऱ्याची भूमिका अतिशय कळीची ठरू शकते. हक्क या संकल्पनेला धरून इम्यॅन्युएल कान्ट या जर्मन विचारवंताची मांडणी अभ्यासणे गरजेचे ठरते.

वरील चर्चेतून असे लक्षात येते की, एकाच घटनेकडे किंवा निर्णयाकडे बघण्याचे एकापेक्षा जास्त योग्य दृष्टिकोन असू शकतात. वेगवेगळे दृष्टिकोन, त्यांची समर्थनीयता, त्यांचे फायदे-तोटे आणि त्यांचा प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी केला जाऊ शकणारा वापर याचा सविस्तर अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. पुढील लेखात आपण उरलेले तीन दृष्टिकोन पाहणार आहोत. त्यानंतर, प्रत्येक दृष्टिकोनांविषयी सविस्तर चर्चा आणि त्यासंबंधी यूपीएससीने विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषणही पाहणार आहोत.