विक्रांत भोसले
विद्यार्थी मित्रहो, लोक प्रशासनातील नैतिकता हा खरे तर एक व्यापक विषय आहे. आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये या विषयांतर्गत तीन घटकांचा समावेश केला गेला आहे.
१. नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये
२. सार्वजनिक वा नागरी सेवा मूल्ये आणि लोक प्रशासनातील नैतिकता
३. प्रशासनातील सभ्यता.
आज आपण २०२३ च्या केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेल्या पहिल्या दोन घटकांवरील प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा करणार आहोत. या घटकांच्या तयारीसाठी दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या (2nd ARC) चौथ्या अहवालाचा ‘‘Ethics in Governancel’’ अभ्यास करणे उपयुक्त ठरू शकते. तसेच IGNOUच्या लोक प्रशासन आणि नीतिशास्त्र या विषयांचे अभ्यास साहित्यदेखील कामी येऊ शकते. या साहित्याचा अभ्यास करताना संकल्पनांचे अचूक आकलन आणि लोक प्रशासनातील त्यांचे नेमके उपयोजन माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवाल आणि त्यांचे मार्गदर्शनपर साहित्यदेखील कामी येऊ शकते.
आता आपण प्रश्नांची चर्चा करूयात.
Q. What do you understand by moral integrityl and k professional efficiency in the context of corporate governance in India? Illustrate with suitable examples. (150 words, 10 marks)
प्र. भारतातील निगम प्रशासनाच्या संदर्भात ‘नैतिक सचोटी’ आणि ‘व्यावसायिक कार्यक्षमता’ यावरून तुम्हाला काय आकलन होते? योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. (१५० शब्द, १० गुण)
(उत्तरासाठीच्या सूचना – या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारताच्या संदर्भात निगम प्रशासनात ‘नैतिक सचोटी’ आणि ‘व्यावसायिक कार्यक्षमता’ कशी दिसून येते या बाबत भाष्य करावे लागेल. तसेच नुसत्या व्याख्या न लिहिता या संकल्पनांबद्दल काय समजले हेही सांगावे लागेल. आणि जे काही समजले आहे ते स्पष्ट करण्यासाठी भारतीय संदर्भात उदाहरणे द्यावी लागतील. तरच एक दर्जेदार उत्तर लिहिता येईल.)
उत्तर – १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारतामध्ये खासगी संस्थांची भूमिका वस्तू आणि सेवांच्या पुरवठय़ामध्ये प्रबळ होत गेली. शासनदेखील आता बरीच कामे खासगी संस्थांच्या मदतीने पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर, निगम प्रशासनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. या संस्थांच्या खासगी स्वरूपामुळे नफा कमावण्यासाठी कधी कधी त्यांच्याकडून अनैतिक निर्णय वा कृती केल्या जाण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी निगम प्रशासनाची कार्य संस्कृती अशा निर्णयांना आळा घालू शकते. यामध्ये नैतिक सचोटी आणि व्यावसायिक कार्यक्षमतेला खूप महत्त्व आहे.
नैतिक सचोटी म्हणजे फक्त संस्थेच्या आणि देशाच्या नियमांचे आणि कायद्याचे पालन करणे नव्हे तर त्यापलीकडे जाऊन उच्च नैतिक आचारसंहिता निर्माण करणे आणि त्यानुसार निर्णय घेणे वा व्यवहार करणे होय. अशा संस्था इतर संस्थांसाठी आदर्श घालून देतात. उदा. टाटा कंपनीने त्यांच्या निगम प्रशासनामध्ये जे. आर. डी. टाटा यांच्या नेतृत्वखाली एक उच्च नैतिक आचरणाची कार्य संस्कृती निर्माण केली.
व्यावसायिक कार्यक्षमता म्हणजे वेळ, शक्ती, पैसा यांचा उत्तम वापर करून दर्जेदार वस्तू वा सेवा पुरवणे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जिथे संसाधनाची कमतरता दिसून येते तिथे अशी कार्यक्षमता खासगी संस्थांना आर्थिक वाढ घडवून आणण्यास मदत करते. उदा. भारतामधील औषध निर्माण करणाऱ्या काही कंपन्यांनी स्वस्त दारात औषधे उत्पादन करून स्वत:च्या व्यावसायिक कार्यक्षमतेचा पुरावा जगाला दिला आहे.
Q. International aid is an accepted form of helping resource- challengedl nations. Comment on ethics in contemporary international aid. Support your answer with suitable examples. (150 words, 10 marks)
प्र. आंतरराष्ट्रीय सहकार्य ही संसाधनग्रस्त राष्ट्रांना साहाय्य करण्याची एक स्वीकारार्ह व्यवस्था आहे. आजच्या काळातील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील नैतिकतेवर भाष्य करा. तुमच्या उत्तराचे योग्य उदाहरणे देऊन समर्थन करा. (१५० शब्द, १० गुण)
(उत्तरासाठीच्या सूचना – भाष्य करणे म्हणजे दिलेल्या विधानाबद्दल वा मुद्दय़ाबद्दल स्वत:चे मत व्यक्त करणे आणि त्यासाठी योग्य समर्थन देणे. या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी सर्वात आधी संसाधनग्रस्त राष्ट्रांना कोण वा कशी मदत करते आणि केव्हा मदत केली जाते हे थोडक्यात लिहावे. ही मदत करण्यामागे कोणता हेतू असतो हेही स्पष्ट करावे. यातून कोणते नैतिक परिणाम साधले जातात याबद्दल भाष्य करावे. आणि शेवटी तुम्ही जे भाष्य केले आहे त्याचे समर्थन करण्यासाठी योग्य उदाहरणे द्यावीत.)
उत्तर – जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत की जी अविकसित, गरीब तसेच मागास राष्ट्रे समजली जातात. ही राष्ट्रे स्वत:हून स्वत:चा विकास घडवून आणू शकत नाहीत. अशा राष्ट्रांना कधी कधी काही राष्ट्रे मदत करतात वा काहीवेळा ही मदत जागतिक बँक वा आंतरराष्ट्रीय नाणे निधी यासारख्या संस्थांकडून केली जाते.
अशी मदत करण्यामध्ये मदत करणाऱ्या घटकांचे विविध हेतू दिसून येतात. जसे की मदत करणाऱ्या राष्ट्रांना मदत घेणाऱ्या राष्ट्राशी चांगले आंतरराष्ट्रीय संबंध ठेवायचे असतात वा कधी अशा राष्ट्रांचा राजकीय हेतू दडलेला असतो वा त्यांना अशा मदतीद्वारे गरीब राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख भूमिका प्राप्त करायची असते. वर नमूद केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांना बऱ्याचदा मागास राष्ट्रातील प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थांमध्ये सुधार घडवून तिथल्या समाजाचा विशेषत: सामान्य नागरिक आणि दुर्बल घटकांचा सर्वागीण विकास घडवायचा असतो.
यातील बरेचसे हेतू हे नैतिक असतात वा वाटतात. परंतु नेहमी परिणाम जसे हवे आहेत तसे होतीलच असे नाही.
उदा. जागतिक बँकेने मदत करण्यापूर्वी राष्ट्रांवर सुशासन आणण्याची अट घातलेली दिसून येते. वा जपानने भारताला केलेल्या आर्थिक मदतीतून पायाभूत सुविधांचा विकास घडलेला दिसतो आणि हे नैतिकच आहे. परंतु कधी कधी महाबलाढय़ राष्ट्रे स्वत:च्या आर्थिक ताकतीचा गैरवापर करून गरीब राष्ट्रांवर अनावश्यक निर्बंध लादताना दिसून येतात. जसे की चीनने बेल्ट आणि रोड या प्रकल्पाच्या निमित्ताने काही राष्ट्रांना कर्जबाजारी बनवलेले दिसून येते.
अंतिमत: आंतरराष्ट्रीय सहकार्याचा हेतू हा स्वार्थी राजकीय वा आर्थिक हेतू साध्य करणे हा नसून एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हाच असला पाहिजे.
या पुढील लेखामध्ये आपण प्रशासनातील सभ्यता या घटकावर आलेल्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत.