प्रवीण चौगले
भूगोल हा UPSC अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा भाग GSपेपर १ च्या इतर सर्व विषयांच्या तुलनेत अधिक महत्त्वाचा आहे, म्हणून GS पेपर १ मध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी भूगोलाचे सखोल आकलन असणे आवश्यक आहे. प्रस्तुत लेखात UPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक मधील भूगोल या घटकासाठी उत्तर लेखन कसे करावे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम GS पेपर १ मधील भूगोल या घटकाचा अभ्यासक्रम जाणून घेऊ. अभ्यासक्रमामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो –
जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्टय़े :
जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण; जगाच्या विविध भागांमध्ये (भारतासह) प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीय क्रियाकलाप, चक्रीवादळ इत्यादी या सारख्या महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टय़े आणि त्यांचे स्थान, महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलसंस्था आणि हिमटोप) आणि वनस्पती आणि जीवजंतू आणि अशा बदलांचे परिणाम.
भूगोल हा पारंपरिकपणे एक स्थिर (static) घटक आहे, मात्र बहुतांशवेळा प्रश्नदेखील समकालीन घडामोडी लक्षात घेऊन विचारले जातात. परिणामी, परीक्षेच्या वेळी चांगले उत्तर लिहिण्यासाठी वृत्तपत्रे वाचणे आणि नंतर परीक्षाभिमुख घडामोडी संकलित करणे श्रेयस्कर ठरते. साधारणपणे, उमेदवार या घटकाच्या तयारीसाठी अनेक संदर्भ पुस्तकांचा आधार घेताना दिसतात. कित्येकदा त्यांच्यामध्ये संदर्भ पुस्तकांबाबत द्विधावस्था दिसून येते. परंतु, भारतीय भूगोलाच्या सर्वागीण तयारीसाठी पुढील स्रोत/ पुस्तके उपयुक्त ठरतील. इयत्ता सहावी ते बारावी NCER ची क्रमिक पुस्तके, जी.सी.लिओंग लिखित प्राकृतिक भूगोलाचे पुस्तक, माजिद हुसेन-भारताचा भूगोल. डाऊन टू अर्थ हे नियतकालिक, द हिंदू हे वर्तमानपत्र उपयोगी ठरते. भूकंप, चक्रीवादळे, एल-निनो, त्सुनामी इत्यादी बदलत्या भूप्राकृतिक घटना उपरोक्त वृत्तपत्रे आणि मासिकांद्वारे कव्हर केल्या जातात.
UPSC मुख्य परीक्षेच्या गेल्यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील ट्रेंड आणि पॅटर्नवरून असे ध्यानात येते की, static घटकांपेक्षा विश्लेषणात्मक तसेच समकालीन घडामोडींवर आधारीत प्रश्नांवर अधिक भर दिला जातो उदा. २०१६ मधील प्रश्न पाहू.
Q. द.हिमालयाला भूस्खलनाचा धोका जास्त आहे. कारणांची चर्चा करा आणि शमन करण्याचे योग्य उपाय सूचवा. (उत्तराखंडमध्ये अलिकडे झालेली हिमालयातील आपत्ती).
Q. सद्यस्थितीच्या संदर्भात दक्षिण चिनी समुद्राला भौगोलिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
टिप्पणी करा.
आता आपण उत्तर लेखन कौशल्याकडे वळू यात. उत्तर लेखन करणे ही बाब बहुतांश परीक्षार्थीना कठीण वाटते. परंतु प्रारंभी प्रत्येक टॉपिकवर एखादे उत्तर लिहून पहावे. लिहिलेल्या उत्तराचे मूल्यमापन स्वत: करावे. यानंतर हळूहळू फुल लेन्थ टेस्ट लिहिण्याचा सराव करा. UPSC मुख्य GS भूगोलसाठी उत्तरे लिहिताना संरचित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. प्रश्नातील मुख्य थीम आणि उत्तराची गरज ओळखण्यासाठी सर्वात आधी प्रश्न समजून घेणे आवश्यक ठरते. प्रश्नांमध्ये ऐतिहासिक, समकालीन किंवा भविष्यातील दृष्टिकोन आवश्यक आहे का, याचे विश्लेषण करा. उत्तर लिखाणाला सुरुवात करताना नेहमी प्रश्नाला अनुसरून संक्षिप्त प्रस्तावना लिहावी. यामुळे आपण लिहीत असलेल्या उत्तरासाठी एक चांगली पार्श्वभूमी तयार करेल. यानंतर प्रश्नात नमूद केलेल्या कोणत्याही प्रमुख संज्ञा परिभाषित करणे अपेक्षित आहे. उदा. २०२३ मध्ये फ्योर्ड या प्राकृतिक भूगोलावर विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये प्रथम फ्योर्ड या संज्ञेबाबत लिहिणे आवश्यक आहे.
उत्तराचा मुख्य भाग
उत्तराची विविध विभागांमध्ये व्यवस्थित मांडणी करा, प्रत्येक प्रश्नामध्ये विचारण्यात आलेल्या विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करावे. आपण मांडलेल्या मुद्दय़ांचे समर्थन करण्यासाठी तथ्ये, डेटा आणि उदाहरणे लिहिणे आवश्यक आहे. याबरोबरच उत्तर अधिक सखोल होण्यासाठी आकृती, नकाशे आणि तक्ते वापरावेत. उत्तरामध्ये सर्वसमावेशकता आणण्यासाठी तुमच्या उत्तराच्या विविध भौगोलिक घटकांमध्ये परस्परावलंबन (इंटरिलकिंग) स्थापित करा. आपण लिहिलेले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी टॉपिकशी संबंधित केस स्टडीज समाविष्ट करा. या केस स्टडीजमधून लक्षात आलेले परिणाम आणि धडे यांची चर्चा करा.
भूगोलाच्या उत्तरामध्ये प्रश्नातील संकल्पनेशी संबंधित घटना स्पष्ट करण्यासाठी नकाशे, आकृत्या किंवा फ्लोचार्ट काढावेत आणि सर्व घटकांना योग्यरित्या लेबल करावे.
भौगोलिक महत्त्व : विषयाच्या भौगोलिक महत्त्वावर भर द्यावा. पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची चर्चा करणेही आवश्यक असते. उत्तरामध्ये तुलना आणि विरोधाभास (compare and contrast) लागू असल्यास तसेच सूक्ष्म आकलन दर्शविण्यासाठी भिन्न भौगोलिक प्रदेश किंवा घटनांची तुलना करावी. समानता आणि फरक अधोरेखित करावे.
आकडेवारीचा वापर : सांख्यिकीय माहितीसह संबंधित घटकावर विश्लेषण मजबूत करण्यासाठी आकडेवारी, टक्केवारी उदद्धृत करावी. प्रश्नात उपस्थित केलेल्या भौगोलिक समस्यांचे संतुलित आणि मूलभूत विश्लेषण करावे. वेगवेगळय़ा दृष्टिकोनातून साधक आणि बाधकांचे मूल्यांकन करा.
उत्तराचा समारोप : उत्तराच्या समारोपामध्ये उत्तरात चर्चा केलेल्या मुख्य मुद्दय़ांचा सारांश लिहावा. उत्तरातील मुख्य युक्तिवाद आणि त्याचे व्यापक परिणाम सांगावेत.
भाषा आणि सादरीकरण : उत्तरातील भाषा स्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपाची असावी. आवश्यक नसल्यास शब्दजाल टाळावे. महत्त्वाचे म्हणजे प्रश्नात वापरलेल्या कोणत्याही तांत्रिक संज्ञा स्पष्ट कराव्यात. उत्तर लिहिताना सादरीकरण ही बाब उत्तरातील कंटेंट इतकीच परिणामकारक असते. शेवटी, परीक्षार्थीनी एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की, वढरउ सर्वसमावेशक आणि सुव्यवस्थितपणे लिहिलेल्या उत्तराला महत्त्व देते. आपले उत्तर-लेखन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी उपरोक्त घटक तुमच्या उत्तरांमध्ये समाविष्ट करण्याचा सराव करा.