लोकेश थोरात

आजच्या लेखामध्ये आपण भूगोल या एका महत्त्वाच्या विषयासंबंधी चर्चा करणार आहोत. भूगोल हा विषय यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षांसोबतच मुलाखतीदरम्यान एक महत्त्वाचा विषय ठरतो. आपली ज्या राज्यात किंवा जिल्ह्यात नियुक्ती होते त्या राज्याची किंवा जिल्ह्याची भौगोलिक पार्श्वभूमी जसे हवामान, कृषी, मृदा, नदीप्रणाली इत्यादी आपणांस माहिती असणे गरजेचे आहे. परीक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास भूगोल हा विषय केवळ पूर्व परीक्षेतच महत्त्वाचा नसून मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये सुमारे १०० गुणांचे व पेपर ३ मध्ये जवळजवळ ५० ते ७० गुणांचे प्रश्न हे केवळ भूगोल या विषयातून विचारले जातात. तसेच भूगोलाची व्याप्ती ही पर्यावरण, कृषी, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, व आपत्ती व्यवस्थापनासारख्या विषयांशी असलेली दिसते.

सर्वप्रथम आपण भूगोलाचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊ. संघ लोकसेवा आयोगाने आपणांस ‘जगाचा व भारताचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल’ हा अभ्यासक्रम दिलेला आहे. आता हा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याची पोटफोड पुढीलप्रमाणे करता येईल – १) प्राकृतिक भूगोल,  २) मानवी भूगोल, ३) भारताचा भूगोल आणि ४) जगाचा प्रादेशिक भूगोल (नकाशा आधारे). वरील सर्व विभागांतून सर्वसाधारणपणे १२-१५ प्रश्न पूर्व परीक्षेला विचारले जातात. जर आपण भूगोल व पर्यावरण या दोन्ही विषयांच्या एकत्रित प्रश्नांची संख्या पाहिली तर ती सुमारे २५ च्या आसपास असते. म्हणजेच, सामान्य अध्ययन पेपरचा सुमारे २५ टक्के किंवा एक चतुर्थाश भाग हा भूगोल व पर्यावरण या विषयांनी व्यापला जातो. पुढील तक्त्यामध्ये वर्षांनुसार विचारलेल्या प्रश्नांची संख्या आपल्या संदर्भासाठी देत आहे. आता, पर्यावरण हा विषय जरी वेगळा असला तरी त्याचा थेट सहसंबंध भूगोलाशी असल्यामुळे, इथे त्याचीही प्रश्नसंख्या दिलेली आहे. तसेच, भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोल हा विषयही अंतर्भूत केला जातो.

            विषय/प्रश्न संख्या भूगोल   पर्यावरण

            २०१३   ९          १३

            २०१४   १२       १७

            २०१५   १४       १०

            २०१६   ७          १८

            २०१७   ७          ११

            २०१८   ८          १३

            २०१९   १४       ११

            २०२०   १०       १०

            २०२१   १०       १७

            २०२२   १६       १४

            २०२३   १६       १४

आता आपण भूगोल विषयाचा पूर्व परीक्षेस असणारा अभ्यासक्रम विस्तृतपणे समजून घेऊ. अभ्यासक्रमामध्ये भूगोलाचे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक असे विभाग केलेले दिसतात. परंतु, सामाजिक व आर्थिक भूगोल हा मुळात मानवी भूगोलाचाच भाग आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अभ्यासक्रमाचे वरीलप्रमाणे एकूण चार भाग करता येतात.

१) प्राकृतिक भूगोल – या विभागात निसर्गाने निर्माण केलेल्या भौगोलिक रचनांचा व घटनांचा (उदा. पर्वत, नद्या, भूकंप, आवर्त इ.) अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोलाचे पुन्हा    a) भूरुपशास्त्र  b) हवामानशास्त्र  c) सागरशास्त्र  d) जैव-भूगोलशास्त्र व e) पर्यावरण भूगोल असे उपविभाग पडतात. भूरुपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या शिलावरणाचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग, भूकवचाची निर्मिती, खडक व खनिजे, भूकवचावर कार्य करणाऱ्या भूअंतर्गत व बहिर्गत शक्ती, भूपट्ट विवर्तनीकी, सागरतळ विस्तार संकल्पना, जलनि:सारण प्रणाली व प्रारूपे अशा पाठांचा अभ्यास करावा लागतो. भूरूपशास्त्र हा भूगोलातील एक खूप मोठा व विस्तृत उपविभाग आहे. यानंतर प्राकृतिक भूगोलातील पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा उपविभाग म्हणजे हवामानशास्त्र होय. हवामानशास्त्र या विषयात आपण पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करतो. हवामानशास्त्रात प्रामुख्याने वातावरणाची घटना व रचना, तापमान, सौरतापण, पृथ्वीचे उष्णता संतुलन, आद्र्रता, सांप्रीभवन, वृष्टी, वातावरणीय दाबपट्टे, वातावरणीय परिसंचलन, वायुराशी, आघाडया, आवर्त, प्रत्यावर्त, मान्सून, जेटप्रवाह, हवामानाचे वर्गीकरण असे पाठ अभ्यासावे लागतात. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास या उपविभागावर सर्वाधिक प्रश्न आलेले दिसतात. सागरशास्त्रामध्ये आपण पृथ्वीच्या जलावरणाचा अभ्यास करतो. तुलनेने सोप्या असलेल्या या उपविभागावर गेल्या काही वर्षांत प्रश्नांची संख्या वाढलेली दिसते. सागरशास्त्रात सागरतळ रचना, सागरजलाचे गुणधर्म जसे क्षारता, तापमान व घनता, सागरजलाच्या हालचाली उदा. सागरी लाटा, सागरप्रवाह, भरती-ओहोटीच्या लाटा, त्सुनामी लाटा, प्रवाळ-भित्तीका, प्रवाळ विरंजन, सागरी कायदे असे पाठ अभ्यासावे लागतात. यापैकी सागर प्रवाह व प्रवाळ भित्तिका हे महत्त्वाचे पाठ आहेत. प्राकृतिक भूगोलाच्या शेवटच्या टप्यात जैव-भूगोलशास्त्र व पर्यावरण भूगोल हे उपविभाग येतात. जैव-भूगोलशास्त्रामध्ये मृदा, प्राणी व वनस्पतींबद्दल अभ्यास करावा लागतो. यामध्ये मृदा निर्मितीचे घटक, मृदा निर्मितीच्या प्रक्रिया, मृदेचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा निचरण, मृदेची धूप, मृदा संवर्धन, मृदा उच्छेद असे पाठ अभ्यासावे लागतात. पर्यावरण भूगोल हा वेगळा विषय म्हणूनच अभ्यासत असल्याने इथे त्याबद्दल जास्त लिहिलेले नाही. तरीही, या विषयांतर्गत जगातील जिवसंहती, परिसंस्था, प्रदूषण, अन्नसाखळी, हवामान बदल, पर्यावरणीय निचरण व संवर्धन असे प्रमुख पाठ अभ्यासावे लागतात.

२) मानवी भूगोल – या विभागात अभ्यासक्रमातील आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. निसर्गाने दिलेल्या आदानांचा वापर करून केलेल्या आर्थिक क्रियांचा समावेश आर्थिक भूगोलामध्ये होतो. यामध्ये उद्योग, व्यापार, संसाधने-त्यांचे वितरण, वापर इ. कृषी, दळण-वळण, पर्यटन या व अशा पाठांचा अभ्यास करावा लागतो. सामाजिक भूगोलामध्ये ग्रामीण, नागरी व आदिवासी समाजाची एकमेकांसोबत व सभोवतालच्या अभिक्षेत्रासंबंधी असणारा सहसंबंध अभ्यासावा लागतो. या विभागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या तुलनेने कमी असलेली दिसते. याव्यतिरिक्त मानवी भूगोलात लोकसंख्याशास्त्र, स्थलांतर-कारणे व परिणाम, ग्रामीण वसाहती-प्रकार व प्रारूपे, नागरी वसाहती, नागरीकरण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, भारतातील नागरी वसाहतीच्या व्याख्या इ. पाठांचा देखील समावेश होतो. प्रश्नांच्या स्वरुपाचा विचार केल्यास मानवी भूगोलामध्ये विचारलेले प्रश्न बहुधा चालू घडामोडींशी निगडीत असलेले दिसतात.

३) भारताचा भूगोल – पूर्व परीक्षेत प्राकृतिक भूगोलासोबत दुसरा अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे भारताचा भूगोल होय. प्रादेशिक भूगोलाचा भाग असणाऱ्या या विभागात भारताचा  संपूर्ण प्राकृतिक व मानवी भूगोल अभ्यासावा लागतो. भारताचा राजकीय भूगोल जसे महत्त्वाची शहरे, राज्य, राज्यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा, भारताचे शेजारी राष्ट्रे, भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार याचा अभ्यास करावा लागतो.

भारताच्या प्राकृतिक भूगोलात भारताचे प्रमुख ५ प्राकृतिक विभाग-हिमालय पर्वतरांग, उत्तर भारतीय मैदान, भारतीय पठार, किनारी मैदानी प्रदेश व बेटांचा समावेश होतो. याव्यतिरीक्त भारतातील नद्या-हिमालयातील व पठारावरील, त्यांचा उगम, उपनद्या, काठावरील शहरे, नद्यांवरील जलविद्युत प्रकल्प, नदीजोड प्रकल्प, भारताचे हवामान-मान्सून वारे, ऋतू, एल निनो-ला निना, पर्जन्याचे वितरण, भारतातील वनसंपत्ती, वनोत्पादन, वार्षिक वन अहवाल, भारतातील मृदा-वितरण, महत्त्वाची पिके असे पाठ अंतर्भूत होतात. भारताच्या आर्थिक भूगोलात कृषी-भूवापर, शेतीचे प्रकार, हरीतक्रांती, सिंचन, जमीन  सुधारणा कायदे, शासकीय धोरणे, खनिज संपत्ती व तिचे वितरण, भारतातील उद्योगांचे वितरण, शासनाची औद्योगिक धोरणे, भारतातील पायाभूत सुविधा-वाहतूक (रस्ते, रेल्वे, जलवाहतूक, विमानसेवा), ऊर्जा-संसाधने, ऊर्जा-निर्मिती, हवामान बदल व भारताची ऊर्जा सुरक्षा असे पाठ अभ्यासावे लागतात. पुढील लेखात जगाचा प्रादेशिक भूगोल, नकाशावाचन, भूगोलातील प्रश्नांचे स्वरूप, तयारीची रणनीती व संदर्भ पुस्तकांबद्दल सविस्तर चर्चा करूया.