पंकज व्हट्टे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लेखामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्राचीन भारताचा इतिहासातील मौर्य साम्राज्याच्या कालखंडापर्यंतची चर्चा करणार आहोत. यानंतरच्या लेखामध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील उर्वरित भाग आणि आद्या मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास यावर चर्चा करूयात.

जसे की आपण शेवटच्या लेखामध्ये चर्चा केली होती, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सांस्कृतिक आयामांवर भर दिला आहे. असे असले तरी कोणत्याही समाजाची संस्कृती त्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आयामांपासून वेगळी करता येत नाही. हे सर्व आयाम एकमेकांशी जोडले गेलेले असतात आणि एकमेकांना प्रभावित करत असतात. उदा. मौर्योत्तर काळामध्ये स्तुपांचा आकार वाढत गेला आणि त्यांच्यावरील कलाकुसर-नक्षीकाम देखील वाढत गेले. कारण या कालखंडामध्ये आर्थिक समृद्धी मोठ्या प्रमाणावर होती आणि श्रीमंत व्यापाऱ्यांनी बौद्ध धर्माला आश्रय दिला होता. याठिकाणी सांस्कृतिक विकास हा आर्थिक समृद्धीशी जोडून अभ्यासता येतो. यासोबतच याला एक सामाजिक आयाम देखील आहे. वैदिक समाजाच्या वर्णव्यवस्थेच्या उतरंडीमध्ये वैश्यांना (व्यापारी वर्ग) त्यांच्या आर्थिक समृद्धीनंतरही तिसरे स्थान देण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न वैश्य सामाजिक ऊर्ध्वगामितेच्या शोधात होते आणि ती संधी त्यांना जैन आणि बौद्ध धर्माने दिली.

यामुळेच संस्कृतीचा अभ्यास करताना कप्पेबंद पद्धतीने अभ्यास करणे उचित नाही. यापूर्वी मुख्य परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आधारे आपण हे समजून घेऊयात. २०१३ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये संगम साहित्यावर आधारित प्रश्न विचारला होता. संगम साहित्यामधून तत्कालीन समाजाच्या आर्थिक सामाजिक जीवनाचे चित्रण कशाप्रकारे केले आहे, हे विद्यार्थ्यांनी लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजेच संगम कालखंडातील साहित्यामधून दिसणाऱ्या सामाजिक-आर्थिक परीस्थितीचे चित्रण याबाबत उत्तरात माहिती देणे अपेक्षित आहे.

या लेखामध्ये आपण ज्या काळाची चर्चा करणार आहोत त्या काळाकडे वळूया. या लेखामध्ये आपण अश्मयुगापासून मौर्य कालखंड या काळाची चर्चा करणार आहोत. यामध्ये अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक कालखंड, उत्तर वैदिक कालखंड (वेदोत्तर) आणि मौर्य कालखंड यांचा समावेश होतो.

अश्मयुगाचे चार कालखंडामध्ये – पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग आणि ताम्रपाषाण युग यांमध्ये- विभाजन केले जाते. उत्क्रांती, वैशिष्ट्ये, तांत्रिक बदल आणि सांस्कृतिक आयाम यांच्याआधारे उपरोक्त चार टप्प्यांचा अभ्यास करायला हवा. विद्यार्थ्यांनी या चार टप्प्यांमधील संस्कृतीच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. ताम्रपाषाणयुगीन काळामध्ये कायथा, जोर्वे, अहाड, गनेश्वर-जोधपुरा या संस्कृतींचा उगम झाला. विद्यार्थ्यांनी या संस्कृतींच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०१५ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये ‘मध्याश्मयुगीन कालखंडातील कोरीव खडकातील स्थापत्यकलेमध्ये ( rock cut architecture) तत्कालीन काळाचे कशाप्रकारे प्रतिबिंब पडते आणि आधुनिक चित्रकलेशी तुलना करताना त्यांच्यातील सौंदर्यशास्त्राची सुरेख समज कशी दिसून येते’ या विधानाचे विद्यार्थ्यांनी टीकात्मक परीक्षण करणे अपेक्षित होते. यासाठी आधुनिक चित्रकला म्हणजे काय याचा अर्थ माहिती असणे महत्त्वाचे आहे. यानंतरच आपण या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो. अशाप्रकारच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना कळून येते कि अभ्यास करताना केवळ पाठांतरावर भर देऊन उपयोग नाही. सिंधू संस्कृतीबाबत अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी या संस्कृतीचा उगम, मुख्य वैशिष्ट्ये, आर्थिक आणि सामाजिक आयाम आणि या संस्कृतीचा झालेला ऱ्हास यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०१४ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य असणाऱ्या नागरीकरणाबाबत प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सध्याच्या काळातील नागरीकरणाने सिंधू संस्कृतीतील नागरीकरणापासून काय शिकावे हे विद्यार्थ्यांनी उत्तरामध्ये लिहिणे अपेक्षित होते. वैदिक कालखंडाच्या अभ्यासामध्ये धार्मिक संकल्पना, राजशास्त्र/ राजकारण, समाज आणि अर्थव्यवस्था यांचा समावेश होतो. वैदिक कालखंडातील आद्या वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड यांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे अपेक्षित आहे. २०२३ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये वैदिक समाज आणि धर्म यांच्या मुख्य वैशिष्ट्यांबाबत प्रश्न विचारला होता. यापैकी कोणती वैशिष्ट्ये भारतीय समाजामध्ये आजही अस्तित्वात आहेत असेही विचारले होते.

उत्तर वैदिक कालखंडामध्ये तीन महत्त्वाच्या घटना घडून आल्या- राज्यसंस्थेची निर्मिती, पर्शियन आणि ग्रीक ही परकीय आक्रमणे आणि जैन आणि बौद्ध यांचा समावेश असलेल्या श्रमण परंपरेचा उदय. राज्यसंस्थेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये राजेशाही आणि गणराज्ये या दोहोंचाही समावेश होता. परकीय आक्रमणाचा प्रशासकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा अभ्यास करण्यासोबतच त्यांच्याबद्दलची एक साधारण समज विद्यार्थ्यांकडे असणे अपेक्षित आहे. बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांनी प्राचीन भारताच्या इतिहासाला मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले. विद्यार्थ्यांनी बौद्ध आणि जैन धर्माच्या धार्मिक संकल्पना, तत्वज्ञान, साहित्य, धार्मिक संरचना आणि धार्मिक संघ यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. ‘आद्या बौद्ध स्तूप कलेमध्ये लोक आकृतीबंधांचा आणि कथनाचा वापर बौद्ध धर्माच्या आदर्शांना विस्तारण्यामध्ये कशाप्रकारे झाला’ असा प्रश्न २०१६ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेला होता.

मौर्य कालखंडाचा अभ्यास करताना मौर्य राज्यसंस्था, तिचे स्वरूप आणि प्रशासन यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तसेच मौर्य शासक सम्राट अशोकाचे धोरण, त्याचे व्यक्तित्व, बौद्ध धर्माचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव अभ्यासणे अपेक्षित आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि अशोकाचे शिलालेख या स्राोतांमधून आपल्याला उपरोक्त आयामांची माहिती मिळते. हे दोन्ही स्राोत मौर्य कालखंडाच्या सांस्कृतिक आयामांचा भाग आहेत. मौर्य स्थापत्यकलेमध्ये स्तूप, चैत्य आणि विहार यांचा समावेश होतो. यातील काही वास्तू उभारल्या होत्या तर काही कोरलेल्या होत्या. आद्या भारतीय कला आणि इतिहास ज्यामध्ये मौर्य कालखंडाचा देखील समावेश होतो त्याचा महत्त्वाचा स्राोत म्हणून कोरीव स्थापत्यकलेबाबत २०२० सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता.

प्राचीन भारताच्या इतिहासातील विशिष्ट कालखंडावर प्रश्न विचारला जातो त्याचप्रमाणे संपूर्ण प्राचीन कालखंड आवाक्यात घेणारा साधारण प्रश्नदेखील मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो. उदा. भारतीय तत्वज्ञान आणि परंपरेने प्राचीन स्मारके आणि कला यांच्या अस्तित्वाला कशाप्रकारे आकार दिला, याची चर्चा करा. असा प्रश्न २०२० सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता. याप्रकारचे अनेक प्रश्न यापूर्वी मुख्य परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासाचा उर्वरित भाग आणि याप्रकारचे प्रश्न याची चर्चा आपण पुढच्या लेखांमध्ये करूया.

(अनुवाद – अजित देशमुख)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation history of ancient india career news amy
Show comments