अजित देशमुख
आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा २०२३ मध्ये विचारलेल्या दोन प्रश्नांची आदर्श उत्तरे पाहूयात. जेणेकरून या आदर्श उत्तरांच्या आधारे आपण उत्तर लेखनाची दिशा निश्चित करू शकतो. मुख्य परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिताना कळीच्या शब्दांच्या आधारे उत्तराचा कच्चा आराखडा बनवणे आवश्यक आहे. या कच्च्या आराखडय़ाच्या आधारे दिलेल्या वेळेत दिलेल्या शब्दमर्यादेत आपण उत्तर लिहू शकतो. यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचून, समजून घेऊन प्रश्नातील कळीच्या शब्दांना संबोधित करणे आवश्यक आहे. उदा. पुढच्या प्रश्नातील कळीचा शब्द म्हणजे ‘सल्तनत कालखंड, तांत्रिक बदल आणि भारतीय समाज’. पहिल्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्या कालखंडात वापरत आलेले तांत्रिक बदल आणि त्या बदलांनी भारतीय समाजाला कशाप्रकारे हे प्रभावित केले, हे लिहिणे आवश्यक आहे.
प्र. सल्तनत कालखंडात कोणते प्रमुख तांत्रिक घडून आले? या तांत्रिक बदलांनी भारतीय समाजाला कशा प्रकारे प्रभावित केले?
या प्रश्नांचे उत्तर लिहिताना सल्तनत कालखंड म्हणजे कोणता काळ हे नमूद करणे आवश्यक आहे. या काळात कोणते तांत्रिक बदल घडून आले आणि यामुळे भारतीय उपखंडातील आर्थिक संरचनेत कशा प्रकारे बदल झाला, हे नमूद करावे. सल्तनत काळात रहाट/ पर्शियन चाक, गज-ए-सिकंदरी, चरखा, हातमाग, इ. हे तांत्रिक बदल भारताला ज्ञात झाले. या बदलांमुळे भारतीय उपखंडातील कृषी क्षेत्र, वस्त्रोद्योग, भू महसूल पद्धती, व्यापार, रेशीम उद्योग या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. या बदलांचा आर्थिक संरचनेवर देखील प्रभाव पडला. सल्तनत कालखंडात धातुशास्त्रातदेखील मोठी प्रगती घडून आली. धातू वितळवणे, त्यापासून शस्त्रास्त्रे बनवणे ही प्रक्रिया अधिक प्रगत बनली. याच शस्त्रांच्या आधारे सल्तनत एक साम्राज्य बनले आणि साम्राज्यात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित झाली.
सल्तनत कालखंडात कागदाचा वापर आणि पुस्तक बांधणीचे तंत्रदेखील भारताला अवगत झाले. यामुळे शिक्षण प्रसार, सांस्कृतिक देवाण घेवाण, प्रशासकीय निर्णयांची नोंदणी या गोष्टी सुलभ झाल्या. अरेबिक आणि पर्शियन ग्रंथांचा स्थानिक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला. यामुळे धार्मिक शिक्षण आणि विचार यांच्या प्रसाराला मदत झाली. किण्वन प्रक्रियेद्वारे अल्कोहोलचे उध्र्वपातन करून अल्कोहोलच्या वेगवेगळय़ा प्रक्रियेला याच काळात गती मिळाली. अल्कोहोलच्या सेवनाचे प्रमाण इतके वाढले की, अल्लाउद्दीन खल्जी या सुल्तानाने अल्कोहोल सेवनास मज्जाव केला. याचबरोबर सल्तनत कालखंडात इमारती बांधण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल घडून आले. इमारती उभारण्याची शैली बदलली. सुल्तानांनी कमानी आणि घुमट बांधण्यास प्राधान्य दिले. इमारतींना प्लास्टर करण्यासाठी जिप्सम आणि चुना यांचा वापर करण्यात येत असे. यातूनच इंडो-इस्लामी वास्तूशैलीचा उदय झाला. उदा. कुतुबमिनार. विविध धार्मिक प्रतिमा आणि प्रतीके, भौमितिक रचना यांचा वापर इमारतीच्या सजावटीसाठी, कलाकुसर करण्यासाठी करण्यात आला. सुल्तानांनी अनेक शहरांची निर्मिती केली. यासोबतच एका वेगळय़ा पद्धतीच्या शहरांच्या नियोजनाची शैली सुरू झाली. सल्तनत कालखंडात इमारतींना सत्तेचे प्रतीक म्हणून विकसित करण्यात आले. सांस्कृतिक वर्चस्वाचे केंद्र म्हणून इमारतींकडे पाहण्यात येई.
या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप करताना उपरोक्त सर्व मुद्दय़ांचा परामर्श घ्यावा.
दुसऱ्या प्रश्नातील कळीचे शब्द म्हणजे ‘रेल्वे, सामाजिक आर्थिक बदल’. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विविध देशांमध्ये या शब्दांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक भारत आणि इतर देशांमधील उदाहरणे देणे आवश्यक आहे.
प्र. रेल्वेच्या आगमनामुळे जगातील विविध देशांमध्ये कोणते सामाजिक-आर्थिक परिणाम घडून आले?
रेल्वे हा मानवी इतिहासातील क्रांतीकारी बदलांपैकी एक बदल होता. रेल्वेने वाहतूक, दूरसंचार, व्यापार या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. तसेच, रेल्वेमुळे जगातील विविध देशांमध्ये अनेक आर्थिक सामाजिक परिणाम घडून आले.
सकारात्मक बदल : रेल्वेमुळे माल आणि प्रवासी वाहतूक वेगवान, कमी खर्चिक, आणि कार्यक्षम बनली. रेल्वेमुळे बाजारपेठेचा भौगोलिक विस्तार झाला. दुर्गम भागातून विविध उत्पादने नागरी भागात वाहून नेणे शक्य झाले. तसेच नागरी भागातील औद्योगिक उत्पादने दुर्गम आणि ग्रामीण भागात वाहून नेणे सोपे झाले. रेल्वेमुळे लोकसंख्येच्या जास्त घनतेच्या नागरी भागातील, शहरांमधील प्रवासी वाहतूक सुलभ झाली. रेल्वेने कृषी आणि उद्योग यांच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. उदा. युनायटेड किंग्डममध्ये रेल्वेमुळे कोळशाची वाहतूक, कच्च्या मालाची वाहतूक, उत्पादित मालाची वाहतूक करणे सहज शक्य झाले. औद्योगिक क्रांतीला एकप्रकारे वेग देण्याचे कार्य रेल्वेने केले आणि युनायटेड किंग्डमची अर्थव्यवस्था बदलली. रशियामध्ये ट्रान्स-सैबेरियन रेल्वेमुळे रशियाला पूर्व भागातील खनिजे (लीना नदीच्या खोऱ्यातील सोन्याच्या खाणी) उपलब्ध झाली. रेल्वेमुळे रेल्वे मार्गावरील शहरांची संख्या आणि आकार वेगाने वाढला. उदा. शिकागो हे अमेरिकेतील शहर हे एक रेल्वे जंक्शन होते. कालांतराने एक मोठे नागरी केंद्र बनले ज्याची लोकसंख्या वेगाने वाढली. रेल्वेच्या विस्तारामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. उदा. रेल्वेमुळे भारतात १४ लाख रोजगार उपलब्ध झाले. रेल्वेमुळे विविध शहरे आणि भौगोलिक प्रदेश एकमेकांशी जोडले गेले. ही शहरे कालांतराने सांस्कृतिक संगमाची केंद्रे बनली. विविध सामाजिक पार्श्वभूमीचे, विविध भौगोलिक प्रदेशातील लोक एकमेकांशी जोडले गेले. याद्वारे संकल्पना, विचार, भाषा, खाद्यसंस्कृती यांची देवाण-घेवाण होणे शक्य झाले. उदा. भारतातील बहुतांश रेल्वे जंक्शन ही कॉस्मोपॉलिटिन केंद्रे बनली. आफ्रिका खंडात रेल्वेने शिक्षणाच्या प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावली. रेल्वेमुळे कर्मठ सामाजिक बंधने शिथिल झाली. विविध सामाजिक पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवासासाठी एकाच डब्यात बसणे गरजेचे होते. उदा. भारतात विविध जातींच्या लोकांनी रेल्वेच्या एकाच डब्यात बसणे ही गोष्ट सामाजिकदृष्टय़ा अभूतपूर्व होती.
नकारात्मक बदल : रेल्वेचा वापर शोषण आणि वासाहतिक सत्तांच्या वर्चस्वासाठी करण्यात आला. वासाहतिक सत्तांनी रेल्वेच्या मदतीने गुलाम राष्ट्रातील कच्च्या मालाची लूट केली. उदा. आफ्रिका खंडातील गुलामांची वाहतूक, खनिजांची वाहतूक, भारतातून कापसाची वाहतूक. रेल्वेमुळे मूलनिवासी, आदिवासी यांची उपजीविका, जीवनशैली यांच्यावर दुष्परिणाम झाले. रेल्वेच्या मार्गामुळे त्यांना स्थलांतर करावे लागले. उदा. मध्य भारतातील आदिवासी. रेल्वेमुळे पर्यावरणावर दुष्परिणाम झाला. रेल्वेच्या स्लीपर्ससाठी जंगले तोडण्यात आली.
रेल्वेने जगभरातील भूगोल, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाज यांचे स्वरूप बदलले. वाहतुकीचा एक नवीन पर्याय म्हणून शोध लागलेल्या रेल्वेने जगातील व्यापार, समाज, नागरीकरण, औद्योगिकीकरण यांना प्रभावित केले.