दि. २२ जानेवारी २०२५ रोजी यूपीएससी २०२५ साठीचे नोटिफिकेशन आले. यात यूपीएससीने काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत त्याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी फॉर्म भरताना आपण या बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. यूपीएससीने २०२५ साठी एकूण ९७९ पदांसाठी जाहिरात दिली आहे.सन २०२२ पासून बघितले तर गेल्या चार वर्षांतील सर्वांत कमी पदांसाठीची ही जाहिरात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ९७९ पदांपैकी दिव्यांगांसाठी ३८ पदे राखीव आहेत. केडर नियंत्रण यंत्रणेद्वारे रिक्त पदांनुसार जाहिरातीतील पदात बदल होऊ शकतो. तसेच SC, ST, OBC, EWS व PwBD यासाठी आरक्षणानुसार पदे दिली जातील.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२५ असून त्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतु विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे. लवकर अर्ज केल्यास आपल्या पसंतीचे पूर्वपरीक्षेचे केंद्र मिळते. तांत्रिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो.

प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी http:// upsconline. gov. in या संकेतस्थळावर जाऊन One Time Registration (OTR) करणे अपेक्षित आहे. OTR करताना माहिती काळजीपूर्वक व जी योग्य माहिती आहे तीच भरणे अपेक्षित आहे, कारण यात एकदाच बदल करता येतो (Only once in lifetime). OTR मध्ये बदल करण्याचा कालावधी 12 फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२५ असा ७ दिवसांचा आहे.

वयोमर्यादा : फॉर्म भरताना उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ३२ वर्षे असणे अपेक्षित आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९३ ते १ ऑगस्ट २००४ या कालावधीत होणे अपेक्षित आहे.

उमेदवाराने परीक्षेच्या दिवशी कमीत कमी ३० मिनिटे आधी परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहणे अपेक्षित आहे, अन्यथा परीक्षेला बसू दिले जाणार नाही. दरवर्षी काही विद्यार्थ्यांना या कारणामुळे परीक्षेला बसू दिले जात नाही.

यूपीएससीद्वारे केले गेलेलेमहत्त्वाचे बदल :

पदांची संख्या २१ वरून २३ :

२०२४ मध्ये आयोगाने २१ पदांसाठी जाहिरात काढली होती. २०२५ मध्ये मात्र एकूण २३ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. याचे कारण ‘Indian Railway Management Service’ मध्ये खालीलपैकी तीन पदे निर्माण झाली आहेत. १) भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा – वाहतूक (गट अ)

२) भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा – कार्मिक (गट अ)

३) भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा – लेखा (गट अ)

फॉर्म भरताना फोटो संबंधीच्या सूचना :

१. उमेदवाराचा फोटो, ही जाहिरात आल्यापासून १० दिवस जुना नसावा. (I.e. The application commencement date)

२. पासपोर्ट फोटोवर ‘उमेदवाराचे नाव’ व ‘फोटो काढल्याची तारीख’ स्पष्टपणे नमूद असावी.

३. पासपोर्ट फोटोमध्ये उमेदवाराचा चेहरा फोटोच्या ३/४ इतका असावा.

४. परीक्षेच्या पूर्व, मुख्य व मुलाखत या तीनही टप्प्यांवर उमेदवार हा अर्जातील फोटोप्रमाणेच प्रत्यक्षात दिसणे अपेक्षित आहे.

उदा. जर उमेदवाराने फोटोत दाढी ठेवली असेल तर पूर्व, मुख्य व मुलाखतीत दाढी ठेवणे अपेक्षित आहे. चष्मा, मिशी इत्यादींच्या बाबतीतही हेच लागू होईल.

शैक्षणिक पात्रता : यूपीएससीने यासंबंधी महत्त्वाचा बदल केला असून त्याचा फायदा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. २०२४ पर्यंत यूपीएससी मुख्य परीक्षेआधी विद्यार्थ्यांना त्यांची पदवी पूर्ण असणे अपेक्षित होते. २०२५ पासून मुलाखती आधी पदवी पूर्ण झाल्यासंबंधीचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. यामुळे निकाल उशिरा लागणे वा पदवी प्रमाणपत्र वेळेत न मिळल्याने पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना यूपीएससीची परीक्षा देता येत नव्हती वा त्यांचा Attempt वाया जाण्याची शक्यता होती. या बदलामुळे पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी निवांतपणे पूर्व व मुख्य परीक्षा देऊ शकतात.

तसेच डॉक्टर(MBBS, BAMS, BHMS, BDS) विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरवासिता व पदवी प्रमाणपत्रांसाठी हीच मुभा देण्यात आली आहे.

आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता: सर्व आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता जसेकी, जातीचे प्रमाणपत्र (SC / ST / OBC / PwBD, Ex झ्र Servicemen), जन्माचा दाखला इ. पूर्वपरीक्षेचा अर्ज करतानाच देणे अपेक्षित आहे.

सेवांचा पसंतीक्रम : २०२५ मधील मोठा बदल म्हणजे सेवांचा पसंतीक्रम पूर्वपरीक्षेचा अर्ज करतानाच देणे बंधनकारक असून जर तो नाही दिला तर उमेदवाराला कोणत्याही पदासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. आधी पूर्वपरीक्षेनंतरही प्रक्रिया केली जात असे.

पूर्व परीक्षेच्या निकालानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना १० दिवसांचा कालावधी केडरपसंतीक्रमासाठी दिला जाईल. मुख्य परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता, पदवी प्रमाणपत्र, पासिंग सर्टिफिकेट इत्यादीसाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाईल.

मुलाखतीतील उत्तीर्ण न झालेल्यांना नोकरीची संधी : मुलाखतीत उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांची माहिती त्यांच्या संमतीने खाजगी कंपन्या, PSUs, भारत सरकारच्या वैधानिक व स्वायत्त संस्थांना पुरविली जाईल जेणेकरून अशा उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल.

या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचण आल्यास सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पुढील दूरध्वनी क्रमांकावर आयोगाशी संपर्क साधू शकता क्रमांक – ०११-२३३८५२७१ किंवा ०११ -२३३८११२५

‘यूपीएससीची बाराखडी’ या आपल्या पहिल्या लेखात आपण इतर आवश्यक माहिती घेतलीच आहे. यूपीएससीद्वारे २०२५ मध्ये केलेले हे बदल हे ‘कालायतस्मै नम:’चेच प्रारूप आहे हे समजून घ्या.

sushilbari10 @gmail. com