पंकज व्हट्टे
या लेखामध्ये आपण आद्या मध्ययुगीन आणि मध्ययुगीन भारत या घटकाची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती करून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी या कालखंडाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक आयाम समजून घेण्यावर भर द्यावा. मागच्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे कला आणि संस्कृती या घटकाचा आपण स्वतंत्र लेखामध्ये विचार करू.
आद्या मध्ययुगीन कालखंडाचे आपण दोन भागांमध्ये- उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे विभाजन करू शकतो. या कालखंडामध्ये उत्तर भारतात ‘तिहेरी संघर्ष’ चालू होता. गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकुट आणि पाल ही राजघराणी कन्नोजवरील नियंत्रणासाठी संघर्ष करत होती, यालाच ‘तिहेरी संघर्ष’ असे म्हटले जाते. २०२२ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये या राजांची नावे आणि राजघराणे यांच्या जोड्यांबाबत प्रश्न विचारला होता. यामध्ये गुर्जर-प्रतिहार आणि राष्ट्रकुट यांच्या व्यतिरिक्त चंदेल आणि परमार घराण्यातील शासकांची नावे समाविष्ट होती. याच कालखंडामध्ये दक्षिण भारतात पल्लव, चोल, चालुक्य, पांड्य, चेर, गंगा यादव, काकतीय आणि होयसळ ही राजघराणी साम्राज्य स्थापनेसाठी प्रयत्न करत होती. साम्राज्य स्थापन करण्यामध्ये चोल राजघराणे यशस्वी ठरले. २०१७ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये काकतीयांच्या बंदराबाबत प्रश्न विचारला गेला होता.
आद्या मध्ययुगीन कालखंडातील चोल प्रशासनाची संरचना त्यांच्या समकालीन राजघराण्यांच्या प्रशासनापेक्षा वेगळी होती. त्यामुळे तिच्या वैशिष्ट्यांचा वेगळा अभ्यास करणे आवश्यक ठरते. जातीव्यवस्थेचा विस्तारित स्वरूपातील विकास, मंदिरांचा एक संस्था म्हणून झालेला विकास आणि धार्मिक संकल्पनांचा विकास या आद्या मध्ययुगीन कालखंडामध्ये घडून आलेल्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. त्यामुळे या घटकांवरदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतीय उपखंडातील घडामोडीसोबतच सिंधमध्ये झालेले मुहम्मद बिन कासीमचे आक्रमण हा देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत, विजयनगर साम्राज्य, बहामनी साम्राज्य आणि त्याची पाच वारसा राज्ये, आणि मुघल साम्राज्य याचा समावेश होतो. दिल्ली सल्तनतीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भारतावर गझनी आणि घोरी यांची आक्रमणे झाली. दिल्ली सल्तनतच्या कालखंडामध्ये चार घराण्यांनी – इल्बारी तुर्क/गुलाम/मामलुक, खल्जी, तुघलक, सय्यद आणि लोदी राज्य केले. विद्यार्थ्यांनी या घटकांचा अभ्यास करताना या कालखंडातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, प्रशासकीय बदल, अल्लाउद्दिन खल्जी आणि मोहम्मद बिन तुघलक यांनी केलेल्या सुधारणा, आणि या काळात झालेली परकीय आक्रमणे यावर भर द्यावा. २०१९ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये दिल्ली सल्तनतीच्या महसूल प्रशासन, लष्करी प्रशासन (मीरबक्षी) आणि इक्ता पद्धतीवर प्रश्न विचारला गेला होता. २०२१ साली तैमुरच्या आक्रमणाबाबत तर २०२२ साली मंगोल आक्रमणाबाबत प्रश्न विचारला गेला होता. दिल्ली सल्तनतच्या कालखंडामध्ये भारतात महत्त्वाचे तांत्रिक बदल काही क्षेत्रांमध्ये घडून आले. त्यामध्ये सुती कापडाचा उद्याोग, रेशीम उद्याोग आणि इमारत बांधणी यांचा समावेश होता. याच कालखंडामध्ये भारतीय उपखंडात तुर्कांनी कागद निर्मितीचे कारखाने सुरू केले. २०१६ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये ‘अरघट्ट’ बाबत प्रश्न विचारला होता. अरघट्ट म्हणजे जलसिंचनासाठी वापरले जाणारे पर्शियन चाक होय.
विजयनगर साम्राज्याच्या कालखंडामध्ये देखील चार घराण्यांनी – संगम, साळूवा, तुळूवा आणि अरविंदू – राज्य केले. जवळजवळ सर्व दक्षिण भारत हा विजयनगरच्या अधिपत्याखाली होता. विजयनगर आणि बहामनी साम्राज्य यांच्यामध्ये दीर्घकाळ संघर्ष चालला. विद्यार्थ्यांना या संघर्षाची थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे. विजयनगरचे प्रशासन काही आयामांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण होते जसे की, नायक व्यवस्था. २०१६ साली कृष्ण्देवराय या विजयनगर शासकाच्या कर रचनेवर प्रश्न विचारला होता. नुनिझ या परकीय प्रवाशाने विजयनगरमधील समाज आणि स्त्रिया यांच्याबद्दलची जी निरीक्षणे नोंदवली होती त्यावरदेखील प्रश्न विचारण्यात आला होता. बहामनी साम्राज्याचे पाच शाह्यांमध्ये विघटन झाले. यामधून आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही आणि बरिदशाही ही राज्ये उदयाला आली. कालांतराने या शाहींच्या ताब्यातील बहुतांश प्रदेश मुघलांनी आपल्या साम्राज्याला जोडला.
मुघल कालखंड या घटकाचे दोन भागात – साम्राज्यवादी (ग्रेटर) मुघल्स आणि उत्तर (लॅटर) मुघल्स असे विभाजन करता येते. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांना साम्राज्यवादी (ग्रेटर) मुघल्स मानले जाते. विद्यार्थ्यांनी मुघलांचा राजकीय इतिहास विशेषत: अकबरच्या संदर्भात जाणून घेणे आवश्यक आहे. अकबराचे धोरण वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यामुळे त्या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदा. अकबराचे धार्मिक धोरण जे दीन-ए-इलाही नावाने ओळखले जाते. औरंगजेबच्या असहिष्णू धार्मिक धोरणामुळे मुघल साम्राज्याच्या विघटनास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्याने दख्खनमध्ये मुघल सत्तेला आव्हान दिले. मुघलांच्या राजकीय इतिहासासोबातच त्यांचे प्रशासन समजून घेण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. २०१९ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये मुघल प्रशासनातील जहागीरदार आणि जमीनदार यांच्यावर प्रश्न विचारला गेला होता. तसेच २०२१ साली मुघल साम्राज्याचे सुभा, सरकार आणि परगणा या घटकांवर प्रश्न विचारला होता. २०१८ साली परकीय प्रवाशांच्या भारताबाबतच्या निरीक्षणावर प्रश्न विचारला होता.
एकंदरीत, आद्या मध्ययुगीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंड या घटकाच्या बहुतांश आयामांवर यापूर्वीच प्रश्न विचारून झाले आहेत. यावरून आपल्याला भविष्यात या घटकावर पूर्व परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांनी या कालखंडातील राजकीय घडामोडी, प्रशासकीय संरचना, आर्थिक आणि सामाजिक विकास, परकीय आक्रमणे, परकीय प्रवाशांच्या नोंदी आणि तांत्रिक बदल या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे, स्वतंत्र लेखामध्ये आपण सांस्कृतिक घटकांची ओळख करून घेऊ.