या लेखात आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेत नियमितपणे विचारल्या जाणाऱ्या ‘कायदे व विधेयके’ या घटकांची माहिती घेणार आहोत. २०२४ च्या पूर्वपरीक्षेत या घटकावर ४ प्रश्न विचारलेले आहेत. यात भारत सरकार कायदा, १९३५; ईशान्य परिषद कायदा, १९७१; धन विधेयक व ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ यांचा समावेश आहे. पूर्वपरीक्षेसाठी अभ्यास करताना आपल्या अभ्यासक्रमातील कायदे व चालू घडामोडीतील विधेयके यांचा विचार क्रमप्राप्त ठरतो. कायदे व विधेयके यातील तरतुदींचा अभ्यास चांगला करा.
२०२४ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न बघा –
● प्र. भारत सरकार कायदा, १९३५ च्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा:
१ . या कायद्याने ब्रिटिश भारतीय प्रांत आणि संस्थानिक राज्ये यांच्या एकत्रीकरणावर आधारित अखिल भारतीय महासंघाची स्थापना करण्याची तरतूद केली.
२. संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार हे संघीय विधानमंडळाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(अ) फक्त १
(ब) फक्त २
(क) १ आणि २ दोन्ही
(ड) १ आणि २ दोन्ही नाही
भारत सरकार कायदा, १९३५ मध्ये वर नमूद केलेल्या दोन्ही तरतुदी होत्या. राष्ट्रीय महत्त्वाच्या ५९ बाबींचा समावेश असलेल्या संघीय (केंद्रीय) यादीमध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वित्त, रेल्वे, चलन आणि प्रेस यांचा समावेश होता.
● प्र. ईशान्य परिषद ( NEC) ची स्थापना ईशान्य परिषद कायदा, १९७१ द्वारे करण्यात आली. २००२ मध्ये NEC कायद्यात सुधारणा झाल्यानंतर, परिषदेत खालीलपैकी कोणते सदस्य असतात?
१. संविधान राज्याचे राज्यपाल
२. घटना राज्याचे मुख्यमंत्री
३. भारताच्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले तीन सदस्य
४. भारताचे गृहमंत्री
खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा :
(अ) फक्त १, २ आणि ३
(ब) फक्त १, ३ आणि ४
(क) फक्त २ आणि ४
(ड) १, २, ३ आणि ४
ईशान्य परिषद (सुधारणा) कायदा, २००२ नुसार, परिषदेची रचना खालीलप्रमाणे आहे:
● राज्यांचे राज्यपालपद भूषवणारी व्यक्ती
● अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचे मुख्यमंत्री
● राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले तीन सदस्य
● राष्ट्रपती परिषदेच्या अध्यक्षाची नियुक्ती करतील.
यावरून पर्याय (अ) हे आपले उत्तर निश्चित होते.
● प्र. संसदेत धन विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१. कलम १०९ मध्ये धन विधेयकांच्या संदर्भात विशेष कार्यपद्धतीचा उल्लेख आहे.
२. धन विधेयक राज्य परिषदेत मांडता येणार नाही.
३. राज्यसभा विधेयक मंजूर करू शकते किंवा बदल सुचवू शकते परंतु ते नाकारू शकत नाही.
४. राज्यसभेने सुचवलेल्या धन विधेयकातील सुधारणा लोकसभेने स्वीकारल्या पाहिजेत.
खाली दिलेल्या कोडचा वापर करून उत्तर निवडा:
(अ) फक्त १ आणि २
(ब) फक्त २ आणि ३
(क) १, २ आणि ३
(ड) १,३ आणि ४
राज्यसभेने अर्थ विधेयकात सुचवलेल्या सुधारणा लोकसभा नाकारू शकते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर (क) हे आहे. वरील प्रश्नावरून हे स्पष्ट होते की विधेयकाबाबत संविधानातील तरतुदी, कलमे माहीत असावित. ‘धन विधेयक म्हणजे कलम ११०’ अशा प्रकारचा अभ्यास इथे त्रासदायक ठरू शकतो. धन विधेयकाशी संबंधित इतर कलमेही तुम्हाला माहीत असणे अपेक्षित आहेत.
● प्र. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ बाबत खालील विधाने विचारात घ्या :
१. १८ व्या लोकसभेपासून तरतुदी लागू होतील.
२. हा कायदा झाल्यानंतर १५ वर्षांसाठी लागू राहतील.
३. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या कोट्यात अनुसूचित जाती महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या तरतुदी आहेत.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(अ) १, २ आणि ३
(ब) १ आणि २ फक्त
(क) २ आणि ३ फक्त
(ड) १ आणि ३ फक्त
१८ व्या लोकसभा निवडणुकीनंतर, जनगणना आणि परिसीमन त्वरित केले जाईल आणि त्यानंतरच हा कायदा लागू केला जाईल. असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर (क) आहे. चालू घडामोडीतील चर्चेत असणारी विधेयके पूर्वपरीक्षेत मोठ्या प्रमाणावर विचारली जातात. महिलांना संसदेत आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हे एक ऐतिहासिक पाऊल होते. ज्यावर आयोगाने प्रश्न विचारला.
गेल्या वर्षभरात जी महत्त्वाची विधेयके चर्चेत होती; त्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ही विधेयके खालीलप्रमाणे आहेत :
● त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, २०२५
● विमान वस्तूंमधील हितसंबंधांचे संरक्षणक विधेयक, २०२५
● कोस्टल शिपिंग विधेयक, २०२४
● मर्चंट शिपिंग विधेयक, २०२४
● भारतीय वायुयन विद्या विधेयक, २०२४
● बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४
● रेल्वे (सुधारणा) विधेयक, २०२४
● आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, २०२४
● बॉयलर विधेयक, २०२४
● ऑइलफिल्ड्स (नियमन आणि विकास) सुधारणा विधेयक, २०२४
● राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा आणि विधानसभांच्या एकाच वेळी निवडणुका घेण्याची तरतूद करणारी दोन विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहेत.
‘कायदे व विधेयके’ यांचे पूर्वपरीक्षेतील महत्त्व लक्षात घेता या घटकावरील अपेक्षित प्रश्नांवर काम करणे आगामी पूर्वपरीक्षेसाठी अत्यावश्यक आहे.
sushilbari10 @gmail. Com