पंकज व्हटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात मध्ययुग कधी संपले आणि आधुनिक कालखंड कधी सुरू झाला याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. असे असले तरी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले असता आधुनिक कालखंडाची सुरुवात अठराव्या शतकाच्या मध्यापासून झाली असे मानले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे.

आधुनिक भारताचा इतिहास दोन टप्प्यांमध्ये-ईस्ट इंडिया कंपनीचे शासन (१७५७-१८५८) आणि ब्रिटिश राजसत्तेचे शासन (१८५८-१९४७)-विभागता येतो. या लेखामध्ये आपण पहिल्या टप्प्याबाबत चर्चा करणार आहोत. पुढच्या लेखामध्ये आपण दुसऱ्या टप्प्याबाबत चर्चा करू. पहिल्या टप्प्याचे अजून चार भागांमध्ये-कंपनीची बंगालमधील पायाभरणी (१७५७-१७९८), बंगालबाहेर कंपनीच्या सत्तेचा विस्तार (१७९८-१८२८), शांततेचा कालखंड (१८२८-१८४८) आणि कंपनीच्या सत्तेचा वेगाने विस्तार (१८४८-१८५७)-विभाजन करता येईल.

या चार भागांचा अभ्यास कंपनीचे भारतीय सत्तांबाबतचे बदलते धोरण या अनुषंगाने करणे अपेक्षित आहे. भारतीय उपखंडामध्ये कंपनीने आपल्या सत्तेचा विस्तार कशा पद्धतीने केला हे कर्नाटक युद्धे, इंग्रज-मराठा युद्धे, म्हैसूर युद्धे यांसारख्या युद्धांच्या अभ्यासातून समजून घेता येईल. २०१८ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये तैनाती फौजेच्या कराराबाबत प्रश्न विचारला गेला होता.

कंपनीच्या सत्तेच्या विस्तारासोबतच या काळातील भारतीय सत्तांचे प्रशासन, राज्यव्यवस्था आणि त्यांचा आपापसातील संघर्ष यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. २०२१ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये अर्काटचे निजाम (कर्नाटक संस्थान), म्हैसूर साम्राज्य आणि रोहिलखंड साम्राज्य यांवर प्रश्न विचारला गेला आहे.

कंपनीच्या सत्तेची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी १५ व्या शतकापासून युरोपीय व्यापारी कंपन्यांनी भारतात आपले बस्तान कसे बसवले, याचा अभ्यास करायला हवा. सुरुवातीच्या कालखंडामध्ये युरोपीय व्यापारी कंपन्यांनी भारतीय उपखंडामध्ये विशेषत: किनारी भागात व्यापारी वसाहती स्थापन केल्या. २०२१ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये सतराव्या शतकातील इंग्रजी वखारींबाबत प्रश्न विचारला होता. तसेच २०२२ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये डच, पोर्तुगीज आणि इंग्रजी कंपन्यांच्या वसाहतीबाबत प्रश्न विचारला होता.

बंगालमध्ये कंपनीच्या सत्तेची जी पायाभरणी झाली त्या काळाचा अभ्यास करण्यासाठी प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, क्लाईव्हची दुहेरी राज्यपद्धती, वॉरेन हेस्टिंग आणि लॉर्ड कॉर्नवॉलीसचे (कायमधारा पद्धती, कॉर्नवॉलीसची संहिता) प्रशासन जाणून घेणे आवश्यक आहे. २०१८ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये कंपनीद्वारा निर्यात केल्या जाणाऱ्या मालाबद्दल प्रश्न विचारला होता. कंपनी सत्तेचा अभ्यास करताना ब्रिटीश संसदेद्वारा पारित केलेले चार्टर कायदे (१७९३, १८१३, १८३३, १८५३) हा महत्त्वाचा भाग आहे. कंपनीची प्रशासनिक व्यवस्था आणि या कायद्यांमुळे प्रशासनिक व्यवस्थेत व धोरणांमध्ये झालेले बदल यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. २०१९ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये १८१३ च्या चार्टर कायद्यावर प्रश्न विचारला गेला आहे. २०१८ च्या पूर्व परीक्षेमध्ये शैक्षणिक धोरणाबाबत दोन प्रश्न, भारतातील इंग्रजी शिक्षणाची सुरुवात आणि वूडसचा अहवाल, विचारले गेले होते. २०२२ सालच्या पूर्व परीक्षेत शैक्षणिक संस्था आणि त्यांचे संस्थापक यावर प्रश्न विचारला गेला आहे.

कंपनीच्या धोरणाचे आर्थिक परिणाम काळजीपूर्वक अभ्यासले गेले पाहिजे. या घटकामध्ये कंपनीची आर्थिक धोरणे आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यांचा समावेश होतो. कंपनीच्या भू-महसूल संकलन पध्दतीचा-कायमधारा, महालवारी आणि रयतवारी- भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. २०२१ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये औद्याोगिक क्रांतीचा भारतावर काय परिणाम झाला, यावर प्रश्न विचारला गेला होता. २०१८ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये ब्रिटिश सत्तेच्या आर्थिक परिणामांवर प्रश्न विचारला गेला. यासाठी कंपनीच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. २०१७ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये रयतवारी व्यवस्थेबाबत प्रश्न विचारला गेला होता. कंपनीच्या १०० वर्षाच्या कार्यकाळात तिच्या सत्तेच्या विपरीत परिणामांना शेतकरी व आदिवासींच्या प्रतिक्रियेमुळे अनेक छोटे मोठे उठाव झाले. २०१८ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये याच प्रकारच्या संथाळ उठावाबाबत प्रश्न विचारला गेला होता.

उपरोक्त उल्लेख केलेल्या घटकांसोबत इतर घटकांचाही अभ्यास करणे अपेक्षित आहे. भारताच्या भूतकाळाबाबत जाणून घेण्यासाठी ब्रिटिशांनी जे प्रयत्न केले, संस्था उभारल्या आणि याच्याशी संबंधित व्यक्ती यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. २०१६ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये सम्राट अशोकाच्या शिलालेखाच्या लिपीबद्दल प्रश्न विचारला गेला होता. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमधून सामाजिक, धार्मिक सुधारणांना सुरुवात झाली. सामाजिक, धार्मिक सुधारणा आणि सुधारक यांच्यावर अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. उदा. २०१६ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांच्याबाबत प्रश्न विचारला गेला होता. भारतीयांनी, विशेषत: सुधारकांनी, याकाळात अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू केली.

शेवटी, १८५७ च्या उठावाचा अभ्यास करताना उठावाची कारणे, घटनाक्रम, सहभागी नेते, अपयशाची कारणे आणि त्याचा परिणाम यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. एकंदरीत कंपनीच्या सत्तेबाबत जाणून घेण्यासाठी कंपनी प्रशासन, भारतीय सत्ता, कंपनीच्या सत्तेचा विस्तार, त्याला भारतीय सत्तांचे प्रत्युत्तर, सामाजिक-धार्मिक सुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्रे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.