या लेखात आपण ‘वनस्पती प्रजाती’ या घटकाची माहिती घेणार आहोत. १८ मार्च २०२५ रोजी प्रकाशित लेखात आपण प्राणी प्रजाती हा घटक समजून घेतला होता. यूपीएससी पूर्वपरीक्षेत या घटकावर नियमितपणे प्रश्न विचारले जातात. २०२४ च्या पूर्वपरीक्षेत ३ प्रश्न या घटकावर विचारलेले असून दरवर्षीच्या पूर्वपरीक्षेत यावर नियमितपणे प्रश्न विचारले जातात.
चालू घडामोडीतील चर्चेतील वनस्पती तसेच विज्ञान व पर्यावरण यात अभ्यासल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास इथे अपेक्षित आहे.
२०२४ यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –
● प्र. खालीलपैकी कोणते एक झाड एका विशिष्ट कीटकासोबत सह-विकसित झाले आहे आणि तो कीटकच त्या झाडाला परागसिंचन करू शकतो, असा अनोखा संबंध दर्शवते?
(अ) अंजीर (ब) मोहाचे झाड (क) चंदन (ड) रेशीम कापूस
अंजिराच्या झाडाचे एका विशिष्ट प्रकारच्या गांधील माशीशी अनोखे नाते आहे. या गांधील माशीचा विकास अंजिराच्या झाडासोबतच झाला आहे आणि ती एकमेव कीटक आहे जी या झाडाचे परागीकरण करू शकते. गांधील माशीच्या शरीराचा आकार आणि आकारमान हे अंजिराच्या फळांशी तंतोतंत जुळतात आणि उंबराची प्रत्येक प्रजाती तिच्या विशिष्ट गांधील माशी परागकाला आकर्षित करण्यासाठी एक वेगळा सुगंध निर्माण करते. वनस्पती प्रजातीचा अभ्यास करताना त्याची वैशिष्टे, वेगळेपण लक्षात घ्यायला हवे.
● प्र. खालील गोष्टी विचारात घ्या:
१. काजू २. पपई ३. रक्तचंदन
उपरोक्तपैकी किती झाडे मूळत: भारतीय आहेत?
(अ) फक्त एक (ब) फक्त दोन (क) तीनही (ड) कोणीही नाही
लाल चंदन हे मूळचे भारतीय असून ते फक्त पूर्व घाटाच्या दक्षिणेकडील भागातच आढळते. लाल चंदन हे ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत आले होते.
काजू हे मूळचे ब्राझीलच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील आहेत. काजू सर्वप्रथम युरोपियन लोकांना ब्राझीलमध्ये सुमारे १५५८ मध्ये आढळले. १६६० च्या सुमारास पोर्तुगीजांनी काजू गोव्यात आणले.
पपई सर्वप्रथम १६ व्या शतकाच्या सुरुवातीला डोमिनिकन रिपब्लिक आणि पनामामध्ये आढळली होती. पपईचे उत्पादन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्यामुळे असे वाटणे साहाजिक आहे की पपई हे भारतीय पीक आहे.
● प्र. खालील वनस्पतींचा विचार करा
१. भुईमूग २. कुळीथ ३. सोयाबीन
वरीलपैकी किती वाटाणा कुटुंबातील आहेत?
(अ) फक्त एक (ब) फक्त दोन (क) तीनही (ड) कोणीही नाही
वरीलपैकी सर्व वनस्पती वाटाणा कुटुंबातील आहेत. वनस्पतींचे वर्गीकरण आपण अभ्यासाने गरजेचे आहे हे वरील प्रश्नावरून लक्षात येते.
२०२३ यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –
● प्र. खालील झाडे विचारात घ्या:
१. फणस २. मोहाचे झाड ३. साग
वरीलपैकी किती झाडे पानझडी प्रकारची आहेत?
(१) फक्त एक (ब) फक्त दोन (क) सर्व तीन (ड) कोणीही नाही
फणस हे सदाहरित वृक्ष असून ते भारत, मलेशिया, श्रीलंका, चीन, आग्नेय आशिया आणि उष्णकटिबंधीय आफ्रिकेत पसरलेले आहेत.
मोहाचे झाड हा उष्णकटिबंधीय पानझडीचा लवकर वाढणारा वृक्ष आहे. मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये तो आढळतो.
सागवान हे उष्णकटिबंधीय कठीण लाकूड असलेले झाड आहे आणि ते पानझडी प्रकारचे आहे. हे मूळत: दक्षिण आणि आग्नेय आशियातील आहे, परंतु इतर अनेक प्रदेशांमध्ये देखील याची लागवड केली जाते.
२०२२ यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –
● प्र. सध्या चर्चेत असलेल्या ‘गुच्छी’ च्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा:
१. ती एक बुरशी आहे.
२. ती हिमालयाच्या काही वनक्षेत्रात वाढते.
३. उत्तर-पूर्व भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी त्याची व्यावसायिक शेती केली जाते.
दिलेल्यापैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
१) फक्त १ ब) फक्त ३ क) १ आणि २ ड) २ आणि ३
ही बुरशीची एक प्रजाती असून सर्वात महागड्या मशरूमपैकी एक असल्याचे मानली जाते. ही बुरशी व्यावसायिकरित्या पिकवता येत नाही. ती हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि जम्मू आणि काश्मीरमधील समशीतोष्ण प्रदेशांतील शंकूच्या आकाराच्या जंगलांमध्ये आणि डोंगराळ प्रदेशात नैसर्गिकरीत्या उगवते.
२०२१ यूपीएससी पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा –
● प्र. नैसर्गिक डास प्रतिबंधक तयार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते?
अ) काँग्रेस गवत ब) हत्ती गवत क) लिंबू गवत ड) नागरमोथा गवत
लिंबू गवत हे नैसर्गिक डास प्रतिबंधक तयार करण्यासाठी वापरले जाते. आपल्या दैनंदिन जीवनातील विविध उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या वैशिष्टपूर्ण वनस्पतींवर आयोगाने प्रश्न विचारले आहेत.
सध्या चर्चेत असलेल्या खालील वनस्पती प्रजातींवरही आगामी पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे –
मणिपूरच्या काक्चिंग येथे आढळणारी हळदीची एक नवीन प्रजाती म्हणजे कुरकुमा काक्चिंगेन्स.
पश्चिम बंगालमधील हावडा येथील आचार्य जगदीश चंद्र बोस इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये आढळणारी असिस्टेसिया वेणुई ही फुलांची वनस्पती.
उनियाला केरलेन्सिस : केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील अगस्थ्यमाला बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये आढळणारी हलकी जांभळी फुले असलेली दाट झुडूप उनियाला वंशाची एक वेगळी प्रजाती म्हणून या वनस्पतीची पुष्टी झाली आहे.
केरळ वन विभागाने वायनाड वन्यजीव अभयारण्यामधून सेना स्पेक्टेबिलिस सारख्या आक्रमक प्रजाती काढून टाकण्यासाठी केरळ पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड (केपीपीएल) सोबत भागीदारी केली आहे.या वनस्पती नीलगिरी बायोस्फीअरमधील वन्यजीव अधिवासाला धोका निर्माण करतात.
वनस्पती प्रजातींवर नियमितपणे प्रश्न विचारले जातात. तेव्हा या घटकावर चांगले काम करा.
sushilbari10 @gmail. com