प्रवीण चौगले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रस्तुत लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उर्वरितबाबींचा आढावा घेणार आहोत. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे काही वेळा विशिष्ट माहिती गृहीत धरून विचारले जातात, म्हणून या विषयाशी संबंधित वस्तुनिष्ठ माहिती अभ्यासावी लागते. सर्वप्रथम आपण चित्रकलेचा आढावा घेऊ.

चित्रकला

भारतीय चित्रकलेचा इतिहास प्राचीन आहे. पाषाण काळातच मानवाने गुहांमध्ये चित्रे काढण्यास प्रारंभ केला होता. भीमबेटका येथे गुहांच्या भिंतीवर मानवाच्या चित्रांचे पुरावे सापडतात. या चित्रांमध्ये शिकार करताना मनुष्यांचा गट, स्त्रिया, पशुपक्ष्यांचा समावेश होता. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून अजिंठा लेण्यांमध्ये चित्रे काढली जात होती. यातील सर्वात प्राचीन चित्रांमध्ये गौतम बुद्धांना विविध रूपांमध्ये दाखवण्यात आले आहे. लेणी चित्रकलेमध्ये अजिंठा आणि वेरूळ बरोबरच सीतानवसंल चित्रकला आणि बाघ चित्रकला यांचे अध्ययन करावे. हिंदू व बौद्ध साहित्याच्या माध्यमातून चित्रकलेच्या विविध पद्धतीने माहिती मिळते. यामध्ये लेणी चित्र, लेखाचित्र व धूल चित्रांचा समावेश होतो.

पूर्व भारतातील चित्रकला १० व्या शतकात विकसित झाली. ती बौद्ध धर्माशी संबंधित होती. भारतीय चित्रकला लघुचित्राच्या स्वरुपात विकसित झाली आणि ती अतिशय सुंदर चित्रकला होती. ती प्रामुख्याने हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित होती.

दिल्ली सुलतानशाहीच्या काळातही मशिदींमध्ये चित्रकला दिसून येते. यामध्ये पर्शियन संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. हा प्रभाव भारतातील हिंदू चित्रकलेवरहीपडला. बहामनी साम्राज्य, विजयनगर साम्राज्य आणि राजस्थानच्या राजपूतांनीही चित्रांना प्रोत्साहन दिले.

मुघल चित्रकला शैली पर्शियन आणि हिंदू चित्रकलेच्या मिश्रणातून विकसित झाली. अकबराने चित्रकलेला प्रोत्साहन दिले. याशिवाय औरंगजेब वगळता इतर मुघल शासकांनीही चित्रकलेला प्रोत्साहन दिले. जहांगीरचा काळ – जहांगीरच्या काळाला मध्ययुगीन चित्रकलेचा सुवर्णकाळ म्हणतात. मन्सूर, बिशनदास, मनोहर हे जहांगीरच्या दरबारातील महत्त्वाचे चित्रकार होते. जहांगीर वेगवेगळय़ा चित्रकारांच्या कलाकृतींमधील बारकावे ओळखू शकत होता.

राजपूत चित्रकलेचा विकास राजस्थान व पंजाब हिमालयातील राजपूत राजघराण्यांच्या आश्रयाखाली १६ ते १९ व्या शतकामध्ये झाला. राजपूत शैलीचे दोन भाग पडतात. १.राजस्थानी शैली आणि २.पहाडी शैली.

चित्रकला या घटकाचा अभ्यास करताना प्रमुख शैलींबरोबरच प्रादेशिक शैलीही विचारात घेणे आवश्यक ठरते.

प्रश्न. आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्यावेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवत नसून त्यामधील सुरेख सौंदर्यपण दर्शविते, या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा.

साहित्य

भारतीय साहित्याचा उदय संस्कृत भाषेत रचलेल्या व दीर्घकाळ मौखिक परंपरेने चालत आलेल्या चार वेदांमध्ये दिसून येतो. संस्कृत ही इंडो युरोपियन कुलातील महत्त्वाची भाषा असून तिच्यातील साहित्य भांडार अत्यंत समृद्ध आहे. वेदिक साहित्यानंतर व्यासकृत महाभारत व वाल्मिकीकृत रामायण ही दोन महाकाव्ये महत्त्वाची मानली जातात. यानंतर अठरा पुराणांचा निर्देश करावा लागेल. ही पुराणे भिन्न भिन्न काळात रचली गेली. प्राचीन काळातील महत्त्वाची साहित्यिक कृती म्हणून भरतमुनींच्या नाटय़शास्त्राचा उल्लेख केला जातो. त्याची रचना इसवी सन पूर्व तिसऱ्या ते दुसऱ्या शतकात झाली असावी, असे मानले जाते. या ग्रंथामध्ये नाटय़ विषयीचा सर्वागीण उहापोह केलेला आहे. अभिजात नाटककारांमध्ये भास, कालिदास, भवभूती, विशाखा दत्त, जयदेव इत्यादी नाटककारांचा समावेश आहे. दक्षिणेत इसवी सन पूर्व ६०० च्या आधीपासूनच तमिळ भाषेत साहित्य निर्मिती होत असावी असे मानले जाते. साहित्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी व निर्माण झालेले साहित्य वाङ्मयीन कसोटय़ांवर पारखून घेण्यासाठी पांडय़ राजांच्या सूचनेनुसार संगम परिषद स्थापन झाली. आज उपलब्ध असलेले सर्वात प्राचीन तमिळ साहित्य संगम साहित्य या नावाने ओळखले जाते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या साहित्य विषयीची माहिती घेणे आवश्यक ठरते.

भारतात इस्लामी सत्ता स्थिरावल्यानंतर तिचा प्रभाव भारतीय संस्कृती व साहित्यावर पडला. इस्लाम धर्म व संस्कृतीने स्वत:च्या अरबी-फारसी साहित्याला उत्तेजन दिल्याने फारसी ही राज्यव्यवहाराची भाषा बनली. अरबी-फारसीतील अभिजात साहित्यकृतींची भाषांतरे भारतीय भाषांमध्ये होऊ लागली. दक्षिण भारतातही इस्लामी सत्ता केंद्र असल्याने तेथे दख्खनी भाषा साहित्याची वृद्धी झाली.

प्रश्न. मध्ययुगीन भारतातील फारसी साहित्यिक स्तोत्र तत्कालीन युगबोधाचे  (the spirit of the age) प्रतिबिंब आहेत. भाष्य करा (२०२०)

इंग्रज भारतात आल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीचा, विज्ञानाचा मुख्यत्वे करून इंग्रजी साहित्याचा प्रभाव भारतीय जनमाणसावर दिसून आला. राजव्यवहाराची तसेच शिक्षणाची भाषा इंग्रजी होती. ही भाषा आत्मसात करून सुशिक्षित वर्गाला पाश्चात्य संस्कृती व युरोपीय साहित्याचा परिचय झाला. त्यातून भारतातील सर्वच प्रादेशिक भाषांमधील साहित्याने पुन्हा नवे आधुनिक वळण घेतले. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांचा वापर करावा. इयत्ता ११ वी चे  An Introduction to Indian Art Part– I आणि बारावीचे  An introduction to Indian art Part – ll ही पुस्तके सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे, तसेच १२ वी चे  Themes in Indian History part- I आणि  कक, जुन्या एनसीईआरटीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation strategy upsc exam preparation in marathi zws
Show comments