विक्रांत भोसले
परिणामवाद
एखाद्या कृतीच्या परिणामावरून त्या कृतीची नैतिकता ठरविणाऱ्या नीतिशास्त्रातील सिद्धांताला परिणामवाद असे म्हणतात. परिणामवादाच्या गाभ्याशी व्यक्ती काय करते- म्हणजेच त्याच्या कृती काय आहेत आणि त्या कृतींचे मूल्यमापन हे समोर येणाऱ्या परिणामांच्या चांगले-वाईटपणावर आधारित असते. वरवर पाहता या सिद्धांताद्वारे नैतिक मूल्यमापनाचा एक थेट निकष समोर ठेवला जातो. परंतु चांगले परिणाम कोणते हे ठरविण्यासाठी मुळात चांगले म्हणजे नेमके काय हे माहीत असणे ही एक पूर्वअट आहे. चांगले म्हणजे काय – हे व्यक्तीला अगोदरच माहीत असल्याचे हा सिद्धांत गृहित धरतो. ही बाब मान्य केल्यास पुढचा प्रश्न असा पडू शकतो की मग चांगले परिणाम नेमके कोणते? बहुसंख्यांना आनंद देतील ते की साधारणत: जास्तीत जास्त आनंदाची निर्मिती करतील ते? किंवा चांगल्या परिणामांची काही वेगळीच व्याख्या असावी? मुळातच चांगले म्हणजे काय हे माहीत नसेल तर एखाद्या कृतीचा परिणाम हा बरोबर आहे किंवा कसे हे ठरविता येत नाही.
परिणामवादी नीतिशास्त्राचे प्रमुख उदाहरण म्हणजे उपयुक्ततावाद. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण साधणारी कृती ही बरोबर, तर आनंद नाहीसा होईल असे परिणाम साधणारी कृती ही चूक असे हा सिद्धांत मानतो. परंतु परिणामांवरून कृतीचे नैतिक मूल्य ठरते एवढेच सरळसोटपणे म्हणूनही चालत नाही. कारण कृती करताना व्यक्तीला अपेक्षित असलेले परिणामच शेवटी साध्य होतील असे नव्हे. पूर्णत: वेगळे किंवा अपेक्षित परिणामांबरोबर आणखी काही परिणामही शेवटी समोर येऊ शकतील; अशा परिस्थितीत मूल्यमापन नेमके कुठल्या परिणामांवरून करायचे असा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच व्यक्तीने वाईट हेतूने एखादी कृती केली – परंतु तिचे परिणाम मात्र अनपेक्षितरित्या चांगले झाले – तर ती कृती चांगले ठरते काय? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
उपयुक्ततावाद (Utilitarianism) निर्णयाच्या किंवा कृतीच्या परिणामांचा विचार करतो, आणि म्हणूनच त्याला परिणामवादी मांडणी मानले जाते. मानवासाठी सर्वात महत्त्वाचे ध्येय सुख आहे, अर्थात् हे सुख वैश्विक आणि सर्वाना आनंद देणारे आहे, असे उपयुक्ततावाद मानतो. म्हणूनच ‘The greatest happiness of the greatest number’ हे उपयुक्ततावादाचे ब्रीदवाक्य आहे. अशाप्रकारे, कृतीच्या परिणामांवरून उपयुक्ततावाद मानवी कृतींचे मूल्यमापन करत असतो. कृतीची उपयुक्तता म्हणजेच सुख निर्माण करण्याची आणि दु:ख कमी करण्याची ताकद यावर कृतीचे नैतिक मूल्यमापन केले जाते. ज्या कृतीमुळे योग्य परिणाम साधले जातात, ती कृती योग्य कृती समजली जाते. म्हणूनच उपयुक्ततावाद ही एक परिणामवादी मांडणी आहे.
जेरेमी बेंथमचा संख्यात्मक उपयुक्ततावाद
जेरेमी बेंथम (१७४८-१८३२) या अठराव्या शतकातील ब्रिटिश तत्त्ववेत्याने उपयुक्ततावादाच्या विचारांचा पाया रचला. त्याच्या मते, निसर्गात मानवी आयुष्याचे सुख (pleasure) आणि दु:ख (pain) हे दोन स्वामी आहेत. या दोनच गोष्टी आपण काय करावे किंवा काय करू नये हे ठरवत असतात. आपल्या सगळय़ांना सुखाची अपेक्षा असतेच आणि दु:ख नको असते. म्हणूनच ज्या निर्णयांचा किंवा कृतींचा परिणाम सुख मिळवण्यात होईल ते नैतिकदृष्टय़ा योग्य मानले जावेत, असा हा विचार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळावे असाही विचार केला पाहिजे. बेंथमच्या मते, सुखांमध्ये कोणत्याही प्रकारचा गुणात्मक फरक नाही. ते केवळ जास्त किंवा कमी असू शकते. म्हणजेच काव्यातून मिळणारा आनंद एखाद्यासाठी चहा पिण्यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा जास्त असू शकतो. मात्र त्यात कोणताही गुणात्मक फरक नाही असे बेंथमचे मत होते.
मिलचा सार्वत्रिक सुखवाद किंवा गुणात्मक उपयुक्ततावाद
सुखवाद म्हणजे सुख हेच समाजाचे एकमेव ध्येय असले पाहिजे असा सांगणारा वाद होय. सुखवादाचा मुख्य प्रकार म्हणजे सार्वत्रिक सुखवाद. सार्वत्रिक सुखवादालाच उपयुक्ततावाद म्हणतात. सुखाची प्रत्येकाची कल्पना ही भिन्न असते. सॉक्रेटीसच्या मते, सुख हे वस्तुत: एका भावनेला दिले गेलेले नाव आहे. करुणा, प्रेम, तिरस्कार या जशा भावना आहेत तशी सुख ही सुद्धा एक भावना आहे. पण सुख, समाधान, आणि आनंद यातही फरक आहे. या तिन्ही भावनाच आहेत पण सुखाचा दर्जा उच्च असतो तर समाधान आणि आनंद उच्च असतातच असे नाही. शिवाय आनंद हा विकृत सुद्धा असू शकतो. म्हणून सुखाची व्याख्या पुढीलप्रमाणे देता येते –
विशिष्ट स्वरूपाची व इष्ट इच्छेची पूर्ती करणे म्हणजे सुख. पण येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हवे असणे व इष्ट असणे यात फरक आहे. जे इष्ट असते ते सुख-समाधान देतेच, असे नाही. म्हणून जे इष्ट असेल आणि समाधानही देईल त्याला सुख म्हणता येईल. म्हणून इष्ट समाधानाची पूर्ती म्हणजे सुखाची भावना अशी योग्य व्याख्या देता येईल.
जेरेमी बेंथम या इंग्लिश तत्त्वज्ञाने उपयुक्ततावादाचा विचार प्रथमत: समोर आणला. उपयुक्ततावादाच्या विचारानुसार निर्णयाचे परिणाम जर का समाधानकारक किंवा आनंददायी असतील तर, निर्णयाच्या मार्गाचा फारसा विचार करण्याची गरज निर्माण होत नाही. यालाच ‘Ends justify means’ असेही म्हणतात. जे. एस. मिल (१८०६-१८७३) म्हणजे जेरेमी बेंथम या उपयुक्ततावादी तत्त्वज्ञाचा मित्र जेम्स मिलचा मुलगा. जे. एस. मिल बेंथमचा विद्यार्थी. बेंथमच्या विचारांवर अधिक संस्कार करून मिलने आपला विचार मांडला. बेंथमच्या उपयुक्ततावादावर पुढील आक्षेप घेतले जातात.
(१) जास्तीत जास्त लोकांना सुख मिळवून देण्याच्या धडपडीत अल्पसंख्यांकांची गळचेपी किंवा अन्यायही होऊ शकतात.
(२) ज्यातून सुख मिळते ते नैतिकदृष्टय़ा योग्य असेलच असे नाही.
मिलला आक्षेपांची जाणीव होती. म्हणून तो सुखात प्रकार करू इच्छितो. त्याने सुखाचा दर्जा ठरविण्याचे महत्त्वाचे काम केले आणि त्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक मांडणीही केली. ती कोणती, हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत. तसेच या संकल्पनेवर आधारित यूपीएससीने आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा आढावादेखील घेणार आहोत.