माझ्या आई-वडिलांनी करिअरच्या बाबतीत मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नाही. मला आ णि माझ्या भावाला त्यांनी सारख्याचं पद्धतीनं वाढवलं. ज्या काळात आई-वडिल त्यांच्या मुलांपुढं डॉक्टर-इंजिनीअर होण्याची स्वप्न ठेवायचे, त्या काळात वडील मला वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या आयपीएस, आयएएस अधिका-यांच्या बातम्या वाचून दाखवायचे आणि त्यांच्या कामगिरीविषयी कौतुकानं बोलायचे. यूपीएससी परीक्षा देण्याचं बीज एखाद वेळेस माझ्या मनात या गोष्टीमुळं नकळतपणे पेरलं गेलं असावं. लहानपणापासूनचं मला पोलिसांच्या पोशाखाचं खूप आकर्षण होतं. त्यामुळं आपण देखील पोलीस अधिकारी व्हावं असं मला लहानपणापासूनच वाटायचं.
हेही वाचा : UPSCची तयारी : नैतिक द्विधांचे स्वरूप (भाग २)
विज्ञानाची गोडी
मी मूळची पालघरची असले तरी लहानाची मोठी झाले ती ठाण्यात. भांडुपच्या ‘पवार इंटरनॅशनल स्कूल’मध्ये माझं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं. नववीत असताना यूपीएससी विषयी इंटरनेटवर माहिती वाचत असताना माझ्या लक्षात आलं की, आपण जर आयपीएस पेक्षा आयएएस झालो तर आपल्याला शैक्षणिक, आरोग्य, महिला विकास यांसारख्या वेगवेगळया क्षेत्रात काम करता येऊ शकतं. म्हणून मी आयपीएस ऐवजी आयएएस होण्याचं ठरवलं. दहावीनंतर पुन्हा माझ्यापुढं प्रश्न निर्माण झाला की, मी विज्ञान शाखेत जाऊ की कला शाखेत. कारण यूपीएससीचे बरेच विषय कला शाखेचे असतात. पण मला विज्ञानाची गोडी होती. तेव्हा पुढंचं-पुढे म्हणत, मुलुंडच्या ‘वझे-केळकर महाविद्यालया’त मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीला मला चांगले मार्क पडले. घरच्यांना पण माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मी देखील डेंन्टिस्ट व्हावं असं वाटू लागलं. म्हणून मी मुंबईच्या ‘गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज’मध्ये बीडीएससाठी प्रवेश घेतला. बीडीएस झाले. माझ्या स्पर्धा-परीक्षेच्या तयारीत बीडीएस बनणं माझा ‘प्लॅन-बी’ होता. समजा मला यूपीएससी परीक्षेत यश मिळालं नसतं तर बीडीएस होऊन मी स्वत:चा व्यवसाय करू शकले असते. त्यामुळं यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य देखील मिळालं असतं. प्रत्येक यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्याजवळ असा एखादा चांगला प्लॅन-बी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण यूपीएससी परीक्षेत जर का अपयश मिळालं आणि विद्यार्थ्याजवळ प्लॅन-बी नसेल तर असा विद्यार्थी निराशेच्या खोल गर्तेत जाऊ शकतो.
बीडीएस झाल्यावर माझं वैद्याकीचं कौशल्य विसरू नये म्हणून मी माझ्या बहिणीच्या क्लिनिकवर जाऊन काम करायला सुरुवात केली. दुसरीकडे यूपीएससीची तयारी सुरू केली. मी दहावीत असल्यापासून स्वत:ला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली होती. यूपीएससीत काहीही विचारतील या भीतीने मी त्या काळात अख्खाच्या अख्खा पेपर वाचून काढायचे. अगदी कुणाच्या घरी चोरी झाली…या सह सर्व बातम्या आणि लेख मी वाचायचे. त्यावेळी अख्खा पेपर वाचण्यात माझे दोन-अडीच तास सहज जायचे. पुढे युट्यूबमुळं यूपीएसीसाठी वर्तमानपत्रातलं नेमकं काय वाचलं पाहिजे ते मला समजलं. त्या प्रमाणं मी ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘द हिंदु’ यांसारखे पेपर वाचून त्यातल्या बातम्यांची टिपणं काढायला सुरुवात केली.
हेही वाचा : नोकरीची संधी : स्टेट बँकेत भरती
‘मानववंशशास्त्रा’ची निवड
वैकल्पिक विषय म्हणून मी ‘मानववंशशास्त्रा’ची निवड केली. यूपीएससीचा वैकल्पिक विषय नेहमी गुण देणारा आणि आपल्या आवडीचा असावा. म्हणजे त्याचा वारंवार अभ्यास करताना आपल्याला कंटाळा येत नाही. मी दंतचिकित्सक होते. मानववंशशास्त्र माझ्यासाठी पूर्णत: नवीन विषय होता. मला या विषयासाठी मार्गदर्शनाची गरज होती. म्हणून मी दिल्लीला जाऊन ‘मानववंशशास्त्रा’चा एक साडे-तीन महिन्यांचा कोर्स केला. विज्ञानाची पार्श्वभूमी असल्यामुळं मी तो अडीच महिन्यांतच पूर्ण केला आपण घरापासून दूर राहिलो तर आपला अभ्यास अधिक चांगला होईल म्हणून दिल्लीतच राहिले. मात्र कोव्हिडमुळं मला ठाण्याला परतावं लागलं. मी २०२० मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची पूर्व-परीक्षा दिली.
अपयश पचवलं
मी वर्षभर खूप अभ्यास केला होता. तरी देखील अभ्यासाची दिशा चुकीची असल्यामुळं मला त्या परीक्षेत अपयश आलं. यूपीएससी परीक्षेत ‘हार्ड स्टडी’ पेक्षा ‘स्मार्ट स्टडी’ अपेक्षित आहे. उगाचच भारंभार अभ्यास करण्यापेक्षा नेमका अभ्यास करणं, या परीक्षेची गरज आहे. यूपीएससी तुम्हाला ‘स्पेशालिस्ट’ नाही तर ‘जनरॅलिस्ट’ बनवते. त्यामुळे वैकल्पिक विषयाची ढीगभर पुस्तकं वाचत बसण्यापेक्षा मी अत्यावश्यक आणि नेमकी पुस्तकंच वाचली. यूपीएससीचा अभ्यास करताना विद्यार्थ्याला परीक्षेसाठी काय ‘आवश्यक’ आहे आणि काय ‘अनावश्याक’ आहे ते ठरवता येणं फार गरजेचे आहे. पूर्व परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी मी अभ्यासाची दिशा सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही काही त्रुटी राहून गेल्या. त्यामुळं पूर्व परीक्षा पास होण्याचा माझा दुसरा प्रयत्नही फसला. पूर्व-परीक्षा पास होण्यासाठी मी पुन्हा तिसऱ्यांदा कंबर कसली.
यूपीएससीसाठी ‘पोमोडोरो तंत्रा’नं मी अभ्यासाचं वेळापत्रक आखलं. या तंत्राची माहिती मला युटयूबवरून मिळाली. मी रोज पहाटे साडे-चारला उठायचे. माझी आई योग शिकवते. त्यामुळे तिनं शिकवल्या प्रमाणे मी उठल्यावर पंचेचाळीस मिनिटं ध्यान करायचे. नंतर आठ-साडे-आठला अभ्यासाला बसायचे. सलग पन्नास मिनिटं अगदी मन लावून अभ्यास करायचे. मग पाच-दहा मिनिटं विश्रांती घ्यायचे. या पाच-दहा मिनिटांत कधी मी घरातल्या-घरातच चालायचे. किंवा भूक लागली असेल तर काहीतरी खाऊन घ्यायचे. मग पुन्हा सलग पन्नास मिनिटं अभ्यास करायचे. दुपारी जेवण झाल्यावर एखादी डुलकी घ्यावीशी वाटली तर तीही मी त्या दहा मिनिटांमध्ये बसवायचे. पन्नास-दहाच्या या अभ्यास-तंत्राचा वापर मी दिवसातून १२-१३ वेळा करायचे. परीक्षा अगदी तोंडावर आल्यावर हेच तंत्र मी दिवसातून पंधरा-सोळा वेळा वापरायचे.
ताण दूर करण्यासाठी योगासने
अभ्यास करताना मनावर नेहमीच एक प्रकारचा ताण येतो. आम्ही ‘जीवन विद्या मिशन’चे नामधारक आहोत. जीवन विद्योत आम्हाला सकारात्मक विचार करण्यासाठी ‘?फर्मेशन तंत्र’ शिकवलं जातं. एखाद्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी ‘व्हिज्युलायझेशन’चं तंत्रही आम्ही वापरतो. माझ्या पहिल्या प्रयत्नातल्या अपयशानंतर मी अभ्यासाच्या जोडीला ही दोन्ही तंत्रही वापरायला सुरूवात केली. मी यूपीएससी पास झाले असून माझी आई मला पेढा भरवते आहे, असा मी फोटो काढून घेतला. त्याच्या प्रिंटस् काढून मी माझ्या आणि आई-बाबांच्या खोलीत भिंतीवर चिकटवल्या. अभ्यास करताना ज्या ज्या वेळी माझ्या मनात निकाला विषयी नकारात्मक विचार यायचे, त्या त्यावेळी मी ‘?फर्मेशन’ आणि ‘व्हिज्युअलायझेशन’ यां दोन्ही तंत्रांचा वापर करून मनाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवायचे. अभ्यासाच्या काळात मनाबरोबर प्रकृती चांगली राहण्यासाठी मी योगासनं करायचे.
तिसऱ्या प्रयत्नाची पूर्व-परीक्षा देताना माझं मन या गोष्टींमुळं अगदी शांत आणि स्थिर झालं होतं. त्याचं प्रतिबिंब निकालात दिसलं. मी पूर्व-परीक्षा उत्तीर्ण झाले.
मुख्य परीक्षेची कसोटी
पूर्व परीक्षेनंतर केवळ अडीच महिन्यांनी मुख्य परीक्षा होती. परत दिल्लीला जाऊन अभ्यास करण्या इतका यावेळी हाताशी वेळ नव्हता. मी घरीच बसून अभ्यास करण्याचं ठरवलं. मुख्य-परीक्षेच्या तयारीचा भाग म्हणून मी मागच्या आठ-नऊ वर्षांचे पेपर सोडवले. मी रोज दहा प्रर्श्न सोडवायचे. मी आधीच लिहिलेली त्यांची उत्तरं डोळ्याखालून घालायचे. इंटरनेटवरून पुन्हा त्यांची ‘अपेक्षित उत्तरं’ वाचून बघायचे. माझ्या उत्तरांमध्ये नवीन मुद्दयांची भर घालायचे. ‘टायमर’ लावून ती उत्तरं मी मग लिहून काढायचे. दहा मार्काच्या उत्तराला मी साडे-सहा मिनिटं. तर पंधरा मार्कांच्या उत्तराला साडे-दहा मिनिटं दयायचे. मी लिहिलेली उत्तरं माझी मीच तपासायचे. कितीही कंटाळा आला तरी मी रोज ठरवलेले दहा प्रश्न सोडवायचेच सोडवायचे. प्रर्श्न सोडवताना कधी हात दुखायचे. पण ठरवलेलं दिवसाचं ‘टार्गेट’ मी काही झालं तरी पूर्ण करायचे. मुख्य परीक्षेचा पेपर पूर्ण होण्यासाठी लेखनाच्या या सरावाचा मला मुख्य परीक्षेच्या वेळी खूपच उपयोग झाला. मुख्य-परीक्षेच्या वेळी हीच उत्तरं मी वाचून गेले होते. मुख्य-परीक्षेच्या वेळी मी ‘टेस्ट-सिरीज’ लावल्या होत्या. परंतु मागच्या वर्षांचे पेपर सोडवण्याचा मला ‘टेस्ट-सिरीज’पेक्षा जास्त फायदा झाला. मी स्वत:ला सर्व प्रकारच्या समाज-माध्यमांपासून कटाक्षानं लांब ठेवलं होतं. त्यामुळं माझा बराचसा वेळ वाचला.
२०२२ मध्ये मी मुख्य परीक्षा दिली. पास झाले. मुलाखतीच्या वेळी देखील मुलाखत घेणाऱ्यांविषयी मनात अ-कारण भीती न बाळगता मी त्यांच्याकडे ‘सकारात्मक’ दृष्टीनं पाहिलं. माझ्या मुलाखतीचा निकालही त्यामुळं अनुकूल लागला. मी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. संपूर्ण भारतात माझा पंचवीसावा क्रमांक आला. महाराष्ट्रात त्यावर्षी मी पहिल्या क्रमांकावर होते.
मी यूपीएससी दिली त्या वर्षी यूपीएससीला बसणाऱ्या मुलींची संख्या बऱ्यापैकी जास्त होती. त्या वर्षी देशात पहिल्या तीन नंबरात मुलीच ‘टॉपर’ होत्या. मी देखील त्यावर्षी राज्यात पहिली आले होते. माझ्या यूपीएससी प्रयत्नांमध्ये घरच्यांची मला पूर्ण साथ होती. यूपीएससी सारख्या स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आवश्यक असतो. मुलींना जर तो जास्तीत-जास्त प्रमाणात मिळाला, तर पुढील काळात जास्तीत-जास्त मुली प्रशासकीय सेवेत येऊन चांगली कामगिरी बजावतील, असं मला अगदी ठामपणे म्हणावसं वाटतं.
(शब्दांकन : दुलारी देशपांडे )
(समाप्त)
आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail. com