IAS Officer Vinod Kumar : आयएएस ऑफिसरची नोकरी (सरकारी नोकरी) मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याचबरोबर आयएएस पदासाठी चांगली रँकही आवश्यक असते. मात्र, आज आपण अशा एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना ओडिशा ग्रामीण गृहनिर्माण विकास महामंडळ घोटाळ्यात अकराव्यांदा दोषी ठरवले आहे.
आयएएस ऑफिसरचे नाव विनोद कुमार असे आहे. विनोद कुमार हे ओडिशा केडरचे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराच्या आणखी एका प्रकरणात ते दोषी आढळले आहेत. भुवनेश्वर दक्षता न्यायालयाने त्यांना निधीचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले आणि ५० हजार रुपये दंडासह तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विनोद कुमार यांना यापूर्वीच भ्रष्टाचाराच्या इतर १० प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.
आयएएस विनोद कुमार यांनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी टेक आणि एम टेक पदवी घेतली आहे. त्यानंतर ते १९८९ मध्ये आयएएस अधिकारी झाले. ओडिशा विजिलियन्स (Odisha Vigilance) , विनोद कुमार यांनी बेकायदा M/s सिटी बिल्डर्ससाठी कर्ज मंजूर केले होते, ज्यामुळे ORHDC चे नुकसान झाले. या कारणामुळे त्याला अन्य सहा जणांसह दोषी ठरवण्यात आले आहे.
ओआरएचडीसी घोटाळ्याशी संबंधित प्रकरण उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००० मध्ये, M/s होम लाइफ बिल्डर्सना ३८ डुप्लेक्सच्या बांधकामासाठी कर्ज देण्यात आले होते आणि त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी वितरित केल्याचा आरोप होता. या भ्रष्टाचार प्रकरणात ओआरएचडीसीचे तत्कालीन कंपनी सचिव स्वस्ती रंजन महापात्रा, कर्जपूर्व मंजुरी अधिकारी उमेश स्वेन आणि बिल्डर कंपनीच्या दोन व्यवस्थापकीय भागीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. विनोद कुमार, स्वस्ती रंजन महापात्रा आणि उमेश स्वेन यांच्यावर कट रचणे आणि बांधकाम कंपनीला चुकीचे फायदे मिळवून दिल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हे प्रकरण ओडिशातील सरकारी संस्थांमधील पारदर्शकतेचा अभाव अधोरेखित करते.