किरण सबनीस

गेल्या काही वर्षात डिझाइन हे एक महत्त्वाचे करिअर म्हणून नावारूपाला आले आहे. आज भारतात जवळपास १०० डिझाइन शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. विद्यार्थ्याना इंजिनीअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर मध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ द्यावी लागते. परंतु डिझाइनसाठी प्रत्येक संस्थेची वेगळी प्रवेश परीक्षा असते त्यामुळे विद्यार्थ्याना व पालकांना योग्य डिझाइन संस्था कशी निवडावी याविषयी खूप गोंधळ, शंका व प्रश्न असतात. खाली दिलेल्या निकषांवरून निवड करणे सुकर होऊ शकेल.

● डिझाइन संस्थेची स्थापना – सर्वप्रथम डिझाइन संस्था स्थापना कधी झाली याची माहिती घ्यावी. जुन्या व नावलौकिक मिळवलेल्या संस्थांकडे ज्ञानसंपदा, अनुभव, परंपरा आणि माजी विद्यार्थ्यांचे नातेसंबंध (alumni network) समूह संचय असतो. उदा . भारतातील अग्रगण्य संस्था एनआयडी, आयआयटी, निफ्ट या संस्था ५० पेक्षा अधिक वर्षे कार्यरत आहेत. अर्थात तुलनेने नव्या संस्थांचे पण अनेक काही फायदे असतात उदा. त्या अधिक लवचिक असतात. त्या बरेचसे अभ्यासक्रमातील बदल सत्वर करू शकतात, त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान व नवीन शैक्षणिक प्रणाली चटकन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतात.

● डिझाइन संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या शाखा (Specializations) – डिझाइन हे बहुअंगी क्षेत्र आहे. त्यामध्ये प्रॉडक्ट, ग्राफिक, यूजर एक्सपिरियंस, फॅशन, अंतर्गत संरचना, अॅनिमेशन, मल्टिमीडिया इत्यादी अनेक शाखा आहेत. विविध पर्यायांतून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे निवड करता येते. त्यामुळे अधिक शाखांचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था नक्कीच विद्यार्थ्याना सर्वांगीण व सर्वसमावेशक विचारसरणीही विकसित करण्यात मदत करतात. आपल्या प्राधान्यक्रमानुसार डिझाइन विषयाची/ शाखेची उपलब्धता पाहावी. मुख्य (Major), दुय्यम (Minor) आणि वैकल्पिक ( Elective) विषय अशी संकल्पना काही संस्थांमध्ये असते.

हेही वाचा >>>नोकरीची संधी : लष्करातील संधी

● संस्थेतील शिक्षकांची पात्रता, अनुभव आणि विविधता – शिक्षकांची शैक्षणिक पदवी, उद्याोग क्षेत्रातील अनुभव, त्यांनी निर्मिती केलेली नावीन्यपूर्ण संसाधने, संशोधन प्रबंध (Research Publications), जागतिक संपर्क हे महत्त्वाचे निकष आहेत, कारण डिझाइन शिक्षणामध्ये काहीप्रमाणात गुरु-शिष्य परंपरा राबवली जाते, त्यामुळे कुठल्या संस्थेमध्ये उत्कृष्ट शिक्षकांकडून शिक्षण मिळेल हे पाहणे अत्यंत जरुरीचे आहे.

● विद्यार्थी-शिक्षक प्रमाण – सर्वसामान्यपणे चांगल्या डिझाइन शिक्षण संस्थेमध्ये १८ ते २० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक हे प्रमाण योग्य आहे. हे प्रमाण जास्त असेल तर वैयक्तिक लक्ष मिळण्यास अडचण येते. डिझाइन अभ्यासक्रम हा अनुभवजन्य आणि प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने लहान आकाराच्या तुकड्या आवश्यक असतात.

● संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प आणि कामगिरी – डिझाइन संस्थामध्ये समक्ष भेट देवून त्यामधील विद्यार्थ्यांनी कोणते प्रकल्प केले, त्यात कसे यश मिळविले, कोणते पुरस्कार प्राप्त केले आहेत याची सखोल माहिती घेणे महत्त्वाचे आहे. यावरून शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा लक्षात येतो. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास सध्याच्या आणि भूतपूर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणे याचा उपयोग निर्णय प्रक्रियेमध्ये होऊ शकतो.

हेही वाचा >>> MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी! पाहा माहिती

● संस्थेची डिझाइन विचारप्रणाली आणि तत्वज्ञान – संस्थेचा अभ्यासक्रम कोणत्या डिझाइन तत्त्वज्ञानाचा अवलंब करतो याचाही विचार करावा. संस्थेची दूरदृष्टी आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा डिझाइन शिक्षणात कसा समावेश केलेला आहे.. भारतीय विचार, संस्कृती, कला, चालीरीती आणि जागतिकिकरण यांचा कसा समन्वय साधला आहे हे पाहणे पण महत्त्वाचे आहे.

● डिझाइन संस्थेतील अध्यापनशास्त्र (Pedagogy) – संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी शैक्षणिक पद्धतीही तपासून पाहावी. सैद्धांतिक (Conceptual) , शास्त्रीय (Scientific) आणि प्रात्यक्षिक (Practical) अभ्यासाचा समतोल कसा राखला जातो, उद्याोग क्षेत्रातील संशोधन, तांत्रिक घडामोडींशी संपर्क आणि संबंध कसा जोपासला जातो याकडे लक्ष द्यावे.

● संस्थेची वैधता व अधिकृत मान्यता – भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक नवीन डिझाइन संस्था सुरू होत आहेत. त्यातील काही संस्था ३ वर्षे, ४ वर्षे पदवी, २ वर्षे पदव्युत्तर शिक्षण किंवा १ वर्षाचा डिप्लोमा प्रदान करतात. हे सर्व कौर्सेस व दिलेली प्रमाणपत्रे एआयसीटीई, यूजीसी किंवा सरकार मान्यताप्राप्त आहेत का आणि या संस्था अधिकृत विद्यापीठाशी संलग्न आहे की नाही हे तपासावे. याची माहिती त्या संस्थांच्या संकेतस्थळांवर मिळू शकते.

● पदवीनंतरचे करीअर व नोकरीच्या संधी – डिझाइनचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या क्षेत्रात करिअर करता येते. त्यामुळे डिझाइन शिक्षण संस्थेचे नोकरी देणाऱ्या संस्था, स्टार्टअप्स आणि उद्याोगसंस्थांशी संबंध कसे आहेत? गेल्या काही वर्षांत किती टक्के विद्यार्थ्यांची निवड उद्याोग क्षेत्रात झाली? कोणकोणत्या प्रतिष्ठित कंपन्यांनी त्यांना नोकरीची संधी दिली? त्यांचे सुरुवातीचे पॅकेज काय आहे? या संस्थांचे नावाजलेले भूतपूर्व विद्यार्थी (Alumni) कोण आहेत? यासर्व माहितीवरून संस्थेची कामगिरी लक्षात येईल.

● आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण उपक्रम – डिझाइन क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले आहे. म्हणूनच इतर देशांतील नामवंत संस्थांशी भारतातील संस्थेचा कसा संबंध व संपर्क आहे हे पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थी विनिमय ( International Student Exchange) कार्यक्रम.

● आंतरराष्ट्रीय शिक्षकांची भेट, शिक्षण फेरी- ज्ञान शिबिरे यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात विस्तार होतो व त्यांना परदेशात इंटर्नशिप व नोकरीची दारे उघडी होऊ शकतात.

● डिझाइन संस्थेचे अधिकृत मानांकन – डिझाइन संस्थांचा दर्जा कोणत्या आधिकृत मानांकनानुसार ठरतो याची माहिती घ्यावी. कारण एकाच मानकाप्रमाणे सर्व संस्थांची गुणवत्ता ठरविली जात नाही. इंटरनेटवर भारतातील व परदेशातील डिझाइन संस्थांची क्रमवारी उपलब्ध होऊ शकते.

● संस्थेतील शिक्षण शुल्क व शिष्यवृत्ती सुविधा – डिझाइन शिक्षण हे तुलनेने महाग आहे. सर्वसाधारणपणे ४ वर्षांचा डिझाइन पदवीचा शिक्षण खर्च अंदाजे २५ ते ३० लाखांपर्यंत असतो. काही संस्थांमध्ये सक्षम व कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्त्या उपलब्ध असतात. बऱ्याच संस्थांच्या शिक्षणासाठी बँक कर्जाची सोय उपलब्ध असते. पालकांनी या सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे याकडे खर्च असे न पाहता दीर्घकालीन गुंतवणूक असे पहिले पाहिजे.

● संस्थेमधील मूलभूत सुविधा व शैक्षणिक वातावरण – डिझाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारी व अभिनव विचारधारेला प्रवृत्त करणारी ऐसपैस जागा, विविध स्टुडिओज, प्रयोगशाळा, संगणक सुविधा, अद्यायावत लायब्ररी, वसतिगृहे अशा मूलभूत सुविधा आहेत का याची पाहणी करावी. त्याच प्रमाणे डिझाइन शिक्षणासाठी मोकळे, मुक्त विचार वृद्धिंगत करणारे व तणाव विरहित वातावरण असणे फार महत्त्वाचे असते.

● संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेचा दर्जा – डिझाइन संस्थेमधील प्रवेशासाठी कोणत्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते हे सजगपणे पाहावे. सर्वसामान्यपणे चांगल्या संस्थांमध्ये ३ -४ टप्प्यांची प्रवेश प्रक्रिया असते व प्रत्येक टप्प्याचा दर्जा उत्कृष्ट असतो उदा. लेखी परीक्षा, स्टुडिओ टेस्ट, पोर्टफोलियो व प्रत्यक्ष मुलाखत इत्यादी. काही संस्था एकच टप्प्याची परीक्षा घेतात तर काही फक्त मुलाखती मधून निवड करतात. विद्यार्थ्यानी संस्थांची निवड करताना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

● नवीन जागेच्या दृष्टीने महत्त्वाचे निकष – हा शैक्षणिक अभ्यासक्रम ३-४ वर्षांचा असल्याने काही महत्त्वाचे निकष म्हणजे संस्थेचे घरापासूनचे किंवा आपल्या जागेपासूनचे अंतर, शहरातील शैक्षणिक वातावरण, सुरक्षितता, परिसरातील संस्कृती, औद्याोगिक संपर्क, स्थानिक पालकांची उपलब्धता, वाहतूक सुविधा अशा घटकांचाही विचार करावा. वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून सुयोग्य डिझाइन संस्थेची निवड करता येऊ शकेल. केवळ एका-दोन निकषांवर अवलंबून राहून संस्थेची निवड करू नये. योग्य संस्था निवडण्यासाठी अनुभवी डिझाइनर्स व तज्ञांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरू शकते.

Story img Loader