आपण कामासाठी आपल्या उजव्या हाताचा अधिक वापर करतो आणि डाव्या हाताचा त्या तुलनेत कमी वापर करतो. पण अचानक आपण उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचा वापर केला तर आपली काो सहजरीत्या होणार नाहीत. डाव्या हाताप्रमाणे जर आपण आपल्या मुलांना देखील जबरदस्ती केली हेच क्षेत्र निवड तर त्या विद्यार्थ्यांला ते अवघड जाणार आहे. त्या क्षेत्रामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्याला सहजरीत्या या गोष्टी आत्मसात करता येणार नाहीत. परंतु प्रयत्न केल्यास हळूहळू त्यांना ते शक्य देखील होईल. सध्याच्या युगात सहजरीत्या काही मिळत नाही. आपल्याला अधिक मेहनत घेतली पाहिजे.
येत्या काळातील कारखानदारीत अल्गोरिदमचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण विचार करून सर्जनशीलता विकसित नाही केली तर आपल्या भविष्यकालीन नोकऱ्या या धोक्यात येणार आहेत. हातातून संधी निघून जाण्याआधी आपल्याला वेगळय़ा धाटणीने विचार करायला शिकले पाहिजे. आपला भारत हा तरुणांचा देश आहे बुद्धिमत्तांचा देश आहे. शिवाजी महाराजांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रचंड सैन्य जमा केले. शंकराचार्यानी शक्तिपीठांची स्थापन केली. आपल्या देशाला आंबेडकर, बुद्ध अशा अनेक बुद्धिमान महात्म्यांची संस्कृती लाभली आहे.
येत्या काळात युद्ध प्रसंग उभा राहणार आहे. हा युद्ध प्रसंग म्हणजे यंत्र आणि मनुष्य. येत्या काळात माणसाची जागा यंत्र घेणार आहे. म्हणून आपल्याला बुद्धिमत्तेच्या जोरावर या युगात टिकून राहावे लागेल. प्रत्येक क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत, खूप प्रगती होत आहे. मानसोपचार क्षेत्रात देखील फार मोठी कामगिरी पार पडली आहे. पूर्वी नैराश्यातून १२ ते १३ टक्के लोक सावरायचे आता ७० टक्के लोक सावरू शकतात.
आपल्याला बुद्धिमत्ता प्रबळ करायची असेल तर सर्वप्रथम सकारात्मक विचार केले पाहिजेत. मार्टिन सेलिग्मन मानसोपचारतज्ज्ञ यांनी सकारात्मक विचार आत्मसात करण्यासाठी आपली बलस्थाने लिहून त्यावर काम करण्यास सांगितले. शहाणपण, धैर्य, माणुसकी, योग्य-अयोग्य, संयम, अध्यात्म, नवीन काहीतरी करण्याची तयारी, चिकाटी, आशा बाळगणे आणि कृतज्ञता यांचा बलस्थानांमध्ये समावेश होतो. ही बलस्थाने मजबूत केल्यावरच आपण अधिक चांगल्या प्रकारे सकारात्मक विचार करू शकतो.