डॉ.श्रीराम गीत
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर सगळय़ांच्या डोळय़ासमोर फक्त राज्यसेवा किंवा केंद्रीयसेवा स्पर्धा परीक्षाच उभ्या रहातात. वास्तविक पाहता चार किंवा पाच प्रकारच्या परीक्षा याच प्रकारात मोडतात. बँकेत नोकरीसाठी कारकून किंवा अधिकारी पातळीवरच्या दोन वेगवेगळय़ा परीक्षा असतात. सर्व प्रकारच्या गणवेशधारी दलांसाठी असाच थोडाफार सामायिक अभ्यास असलेल्या परीक्षा असतात. एवढेच काय मॅनेजमेंटच्या प्रवेशाची कोणत्याही पातळीवरील तयारी करताना जी परीक्षा द्यावी लागते त्यातही वरील अभ्यासक्रमाशी साम्य असते.
कोणतीही पदवी झाल्यानंतर यातील कोणतीही परीक्षा आपल्या इच्छेनुसार देता येते, हे त्यातील एक विशेष. मात्र, पदवीधर झाल्यानंतर लगेच यासाठीचा क्लास कोणता लावू? हा प्रश्न विचारणारे ९९ टक्के विद्यार्थी सापडतात. क्लास शिवाय यश नाही हे इतके मनात ठसलेले असते की आपण कशाकरिता क्लास लावत आहोत हा प्रश्नही विद्यार्थी व त्यांचे पालकांना पडत नाही. या साऱ्या परीक्षांसाठीची सामान्य प्रश्नपत्रिका कोणी जर सहज पाहिली तर त्यात दहावीचे गणितावर आधारित एक विभाग असतो. दुसरा विभाग पदवी समकक्ष इंग्रजीतून विचारलेल्या भाषेवरच्या प्रश्नांचा असतो. तर तिसरा विभाग हा मुख्यत: विद्यार्थ्यांची तर्क विचारक्षमता तपासण्यासाठी असतो. याचेच एकत्रिकरण करून राज्यसेवा किंवा केंद्र सेवा स्पर्धा परीक्षांसाठी सी-सॅट नावाचा पेपर द्यावा लागतो.
क्लास लावावा का न लावावा?
या चर्चेत मी येथे जात नाही. मात्र, बारावीपासून दर रविवारी जे विद्यार्थी या तीन पद्धतीच्या प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करतात, त्यांना या साऱ्या परीक्षेत यश नक्की मिळते. या उलट पदवीनंतर क्लास लावून व त्यासाठी मोठी रक्कम मोजून हाती यश लागत नाही. काहींच्या बाबतीत तर हे मला जमणे शक्य नाही म्हणून भीतीपोटी तो रस्ता सोडून देण्याची वेळ येते. ग्रामीण विद्यार्थी अनेकदा मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे, पेपर वाचन सुरू केले आहे, निबंध लेखनाचा सराव करीत आहे अशी चुकीची व ठाम समजूत करून घेतात. शास्त्र शाखेतून इंजिनीयिरगला जाणारे विद्यार्थी सोडले तर इतर साऱ्यांचाच दहावी नंतर गणिताशी संबंध येत नसतो. एवढेच काय तर्क विचारात्मक कोडी सोडवण्याचा खेळ सुद्धा त्यांनी कधी केलेला नसतो. त्यामुळे या दोन मोठय़ा विभागामध्ये किमान मार्क मिळवण्यात ते अपयशी ठरतात किंवा त्या विभागांची त्यांच्या मनात कायमची भीती बसते. कितीही उत्तम अशा स्वरूपाचा क्लास जरी लावला तरी तिथल्या शिकवण्याच्या वेगाशी जुळवून घेणे हे सुद्धा कठीण असते. अशीच काहीशी गोष्ट सामान्य ज्ञान या विषयाची असते. आयुष्यात कधीही पेपर न वाचलेला पदवीधर जेव्हा या स्पर्धा परीक्षांच्या मागे जाऊन पुस्तके वाचायला लागतो तेव्हा त्याला या साऱ्याबद्दल अनाकलनीय वाटणारे साधे साधे सामान्य ज्ञान पाठांतर करून लक्षात ठेवावे लागते. मग स्वाभाविकच अभ्यासाचे दडपण येते.
अनेकांना क्लासची फी भरणे हे सुद्धा आर्थिक दृष्टय़ा डोईजड असते. यावर साधासा उपाय म्हणजे या आधी सांगितलेला दर रविवारचा एक तासाचा अभ्यास. मराठीत एक म्हण आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे. तसेच पदवीधर झाल्यावर क्लासची जाहिरात पाहून नाव नोंदणी करणारे करतात.
हा ज्याचा त्याचा प्रश्न
परीक्षेचे तंत्र समजून घेण्याकरिता, स्पर्धेची किमान तयारी स्वत: केल्यानंतर, सामान्य ज्ञान वाचनातून वाढवल्यानंतर क्लास लावणे कितपत गरजेचे आहे? हा ज्याचा त्याचा प्रश्न. हा प्रश्नच ज्या विद्यार्थ्यांना व पालकांना पडत नाही त्यांच्यासाठी क्लास हा प्रकार प्रत्येक पेठेत, प्रत्येक गावात होता, आहे आणि राहिल.