एअर इंडियाने आपल्या वैमानिकांच्या आणि केबिन क्रू सदस्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने सोमवारी सांगितले की त्यांनी वैमानिक आणि केबिन क्रूसाठी वेतनरचना सुधारली आहे, ज्यात वैमानिकांसाठी प्रति-तास उड्डाण दर वाढवला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानसेवेच्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा एक भाग म्हणून नवीन रचनेनुसार, एअर इंडिया आणि एआयएक्स कनेक्टमधील(एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेससह) २,७०० हून अधिक वैमानिकांच्या वेतनात वाढ केली जाईल. याशिवाय एअर इंडियाच्या ५,६०० केबिन क्रूच्या वेतनात देखील वाढ केली जाणार आहे.
१ एप्रिलपासून लागू झाली वेतनरचनेमधील सुधारणा!
एका अंतर्गत परिपत्रकानुसार, १ एप्रिल २०२३ पासून एअर इंडियाच्या उड्डाण कर्मचार्यांच्या वेतनरचनेमध्ये सुधारणा जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमची वेतन संरचना सोपी करण्यासाठी आम्ही उड्डाण कर्मचार्यांच्या वेतनाची पुनर्रचना केली आहे,” अशी माहिती समोर येत आहे.
सुधारणेनंतर, एअर इंडियाने गॅरेंटेड फ्लाइंग अलाउन्स कॉम्पोनेंट २० तासांवरून ४० तासांपर्यंत दुप्पट केला आहे. त्याशिवाय प्रशिक्षणामध्ये दिल्या जाणाऱ्या वैमानिकांच्या अतिरिक्त भत्त्यांमध्येदेखील वाढ केली जाणार आहे. एअर इंडिया वैमानिकांच्या प्रति तास उड्डाण दर आणि उड्डाण भत्त्यामध्ये वाढ देणार आहे.
दरवाढीनंतर एअर इंडियाच्या वैमानिक आणि केबिन क्रूचा किती असेल पगार?
परिपत्रकानुसार, प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे एक वर्षाचे सीटीसी आता दरमहा ५०,००० रुपये असेल, तर वरिष्ठ कमांडरला दरमहा ८.५० लाख रुपये मिळतील.
तसेच, नवीन केबिन क्रूचा पगार दरमहा २५,००० रुपये असेल, तर केबिन एक्झिक्युटिव्हला दरमहा ७८,००० रुपये मिळतील. जमिनीवर आणि सिम्युलेटर प्रशिक्षणासाठी घालवलेल्या वेळेसाठी कमांड अपग्रेड आणि कन्व्हर्जन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी वैमानिकांना अतिरिक्त भरपाईदेखील दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – एम्सद्वारे नर्सिंग ऑफिसरच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, ३०५५ पदांसाठी होणार भरती, मिळेल एवढा पगार
प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांचे मानधन दुप्पट!
सूत्रांनी सांगितले की, एअर इंडिया आपल्या प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांचे मानधन दुप्पट करणार आहे, तसेच दीर्घकाळ सेवा करणार्या कर्मचार्यांना अतिरिक्त बक्षिसे देण्यात येतील. ठरावीक मुदतीचा करार असलेले ८०० वैमानिक ज्यांच्या कराराचे पाच वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आले होते, त्यांना ५८ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ दिली जाईल.
दोन नवीन पदांची होणार सुरुवात!
एअर इंडियामध्ये ठरावीक मुदतीचा करार असलेले ४७०० केबिन क्रू सदस्य आहेत तर १०० कायमस्वरूपी केबिन क्रू उपस्थित आहेत. याशिवाय एअर इंडिया कनिष्ठ प्रथम अधिकारी आणि वरिष्ठ कमांडर स्तरावरील दोन स्तर/पद सुरू करणार आहे.
एअर इंडियाने कमांडर म्हणून आणखी चार वर्षे उड्डाण करणाऱ्या वैमानिकाला वरिष्ठ कमांडर पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना व्यवस्थापन संवर्गात समावेश करण्याबरोबरच कार्यकारी कर्तव्यासाठी वेगळा भत्ता दिला जाईल.
MIB Recruitment 2023: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात ७५ कॉन्टेन्ट क्रिएटर्सची भरती, मिळेल ६० हजार रुपये पगार
केबिन क्रू संघटनेची रचना चार विभागांमध्ये होणार पुनर्नियुक्ती
कायमस्वरूपी आणि ठरावीक मुदतीचा करार असलेले केबिन क्रू, दोन्हीसाठी केबिन क्रू संघटनेची रचना चार विभागांमध्ये पुन्हा आखण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी केबिन क्रू, केबिन क्रू, वरिष्ठ केबिन आणि कार्यकारी केबिन असे चार स्तर असणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन आणि अनुभवी केबिन क्रूसाठी प्रशिक्षणार्थी मानधनामध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ केली जाईल.
एअरलाइन देशांतर्गत लेओव्हर (प्रवासाच्या पुढील टप्प्यापूर्वी विश्रांती किंवा प्रतीक्षा कालावधी) भत्ता आणि चेक क्रूसाठी भत्ता दुप्पट करणार आहे.
याशिवाय, केबिन पर्यवेक्षक आणि त्यांच्या ग्रूमिंगसाठी अतिरिक्त भत्तेदेखील सुरू केले आहेत.
फेब्रुवारीमध्ये, एअर इंडियाने ४,२०० हून अधिक केबिन क्रू प्रशिक्षणार्थी आणि ९०० वैमानिक नियुक्तीची घोषणा केली होती. एअरलाइनने बोइंग आणि एअरबससह ४७० विमानांची ऑर्डरही दिली आहे.