Amina Kadiwala Success Story : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने आज ४ जून २०२४ रोजी नीट यूजी-२०२४ (NEET UG 2024) चा निकाल जाहीर केला. या परीक्षेला २४ लाख विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्रातील सात विद्यार्थी या परीक्षेत अव्वल आले आहेत. त्या सात जणांपैकी एक होती मुंबईची आमिना कादिवाल. आमिनाने ७२० पैकी ७२० गुण मिळवले. कोण आहे आमिना? NEET UG परीक्षेत दोनदा नापास होऊनसुद्धा हार न मानणाऱ्या आमिनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
असे म्हणतात की, तुमच्यात जर असेल जिद्द, तर तुम्ही ते सर्व काही करू शकता साध्य. मुंबईच्या आमिनाने हे सिद्ध करून दाखवले. आमिनाची कहाणी इतरांपेक्षा जरी वेगळी आहे. तिचे वडील शहरातील बेकरीमध्ये काम करतात. आमिना जेव्हा १२ वीत होती तेव्हापासून तिने NEET UG च्या परीक्षेची तयारी सुरू केली. आमिना माध्यमाशी बोलताना सांगते. “जर या NEET UG परीक्षेत मी पास झाली नसते, तर मी पदवीला प्रवेश घेतला असता.” पण या वेळी आमिनाने मेहनतीच्या जोरावर ७२० गुण घेतले आणि त्याचबरोबर देशातून ती अव्वल आली.
दोन वेळा अपयशी ठरूनही मानली नाही हार
आमिनाने यापूर्वी दोन वेळा NEET UG ची परीक्षा दिली होती; पण दोन्ही वेळा तिला अपयश आले. असे होऊनही तिने जिद्द सोडली नाही आणि पुन्हा जोमाने मेहनत घेतली. या वर्षीही ती परीक्षेला बसली आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये घवघवीत यश मिळविले. आमिनाने NEET UG च्या परीक्षेला अभ्यासासाठी दोन वर्षे शिक्षणातून ब्रेक घेतला होता. मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून तिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीला तिला ९५ टक्के गुण होते. अभ्यासात हुशार असलेल्या आमिनाला तिच्या शाळेतील मुख्याध्यापिका आणि आई-वडिलांनी NEET UG च्या परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला होता.
आमिनाने कशी केली अभ्यासाची तयारी ?
आमिना एक विषय सुरुवातीला चांगल्या रीतीने वाचते आणि त्यानंतर चार-पाच दिवस त्याचा पुन्हा अभ्यास करते. त्याशिवाय तिने मॉक टेस्ट्सवरही लक्ष दिले होते. तिने स्वत:च्या नोट्स तयार केल्या होत्या. या नोट्स आणि एनसीईआरटीची पुस्तके यांच्या आधारे तिने अभ्यास केला. त्याचबरोबर ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोचिंग क्लास करायची.
आमिनासारखे असे अनेक विद्यार्थी असतील; जे NEET UG च्या परीक्षेत एकदा किंवा दोनदा नापास झाले असतील; पण, त्यांनीसुद्धा आमिनापासून शिकावे आणि हार न मानण्याची तिची वृत्ती आत्मसात करावी. तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा जोमाने अभ्यास करावा.