मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. ९० च्या दशकातील रिपोर्टर, दामिनी सारख्या हिंदी मराठी मालिकांमधून पाहिलेले शोध पत्रकारितेचे जग वास्तवात बरेच वेगळेे आहे. त्यातही अजून स्त्रियांचा दबदबा कमीच म्हणावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तशी मी मूळची सातारची, पण सांगण्यापुरतीच. कारण माझा जन्म सातारला झाला असं माझी आजी सांगते. मी प्राथमिक शाळेत दोन वर्षे काढेपर्यंत वडिलांचा सातारला वकिली व्यवसाय होता. गावचे प्रख्यात फौजदारी वकील म्हणून त्यांचे नाव आजही काढले जाते. आजी सांगते, एक दिवशी ते कोर्टातून घरी आले. ती केस जिंकण्याचे खूप मोठे टेन्शन होते. आधीचे पंधरा दिवस ते खूप अस्वस्थही होते आणि त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. मला यातलं फारसं काही आठवत नाही. पण एक ठळक गोष्ट डोळ्यासमोर कधीही येते ती म्हणजे मी शाळेतून आल्यावर माणसांनी घर भरून गेले होते आणि आई मला जवळ घेऊन धाय मोकलून रडतीय हे आठवत राहते. जेमतेम तीन महिन्यांनी आम्ही आजीकडे दादरला राहायला आलो. आजोबा देवाघरी जाऊन पंचवीस वर्षे झाली होती आणि मामा अमेरिकेला जाऊन दहा. माझ्या साऱ्या आठवणी दादरच्या घरातल्या आजीबरोबरच्या. कारण जेमतेम वर्षभरातच आईने दुसरे लग्न केले व ती ऑस्ट्रेलियाला कायमची स्थायिक झाली. सातारची मराठी शाळा लवकरच विसरली व दादरच्या एका प्रख्यात इंग्रजी शाळेत माझी सुरुवात झाली. वडिलांची एकमेव वारस म्हणून सगळी मोठी प्रॉपर्टी माझ्या नावावरच आली होती. पण मी मोठी कधी होते याची आजीला कायम काळजी पडलेली असायची. ‘एकदाची सज्ञान हो म्हणजे माझी काळजी मिटली’, हे दर पंधरा दिवसांनी मी लहानपणी ऐकलेले वाक्य. माझी शाळा संपून नुकताच मुंबईच्या झेवियर्स कॉलेजात आर्ट्सला मी प्रवेश घेतला होता. वडिलांची वकिली थोडीशी डोक्यात असल्याचाही हा परिणाम होता. अभ्यास बरा चालला होता वाचनही भरपूर होते. त्याचवेळी दिल्लीतील आरुषी प्रकरण घडले व सारा देश ढवळून निघाला. त्या बातम्या वाचतानाच वकिलीला प्रवेश घेण्याचे मी नक्की केले. पाच वर्षांचा खडतर वकिलीचा अभ्यासक्रम संपवला तरी नेमके काय करावे याचा उलगडा होत नव्हता. पण काही वेळा मनात विचारांचे वादळ उठत असे. वडील अचानक केसच्या टेन्शनमुळे गेले का काही इतर कारणे होती? आरुषीच्या आई-वडिलांना एकदा दोषी तर एकदा निर्दोषी कसे काय ठरवले जाते? निर्भया केस मधील अल्पवयीन आरोपी सुटतो कसा? अशा प्रश्नांच्या जोडीला कोळशाच्या काळ्या भ्रष्टाचारातील आणि टू जी स्पेक्ट्रम मधील घोटाळ्यांनी सारे राजकीय वातावरण भारले होते.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील संधी

त्याच वेळी मामा आजीला भेटायला आला. सारे तडकाफडकीच ठरले अन् आजी व मी दोघी अमेरिकेत दाखल झालो. पुढे कायद्याचे शिक्षण घ्यायचे का अन्य काही हा विचार चालू असताना मला ‘इन्वेस्टीगेटिव्ह जर्नालिझम’ हा एक वेगळाच अभ्यासक्रम सापडला. मी वकिलीचा अभ्यासक्रम शिकत असताना शोध पत्रकारिता हा प्रकार उदयाला येऊ लागला होता. खरे तर बोफोर्स प्रकरणापासून या शब्दाचा बोलबाला असला तरी भारतात या पद्धतीत काम करणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच होती. त्याचे खरे कारण वेगळेच होते अनेक महिने शोध घेऊन एखादी गोष्ट सापडली तरी त्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी देणारी माध्यमे अस्तित्वात नव्हती.

भविष्य अंधुकच

त्या कोर्सला मी प्रवेश घेतला, पण मी पुन्हा भारतात गेले तर काय करणार याचा मला कसलाच अंदाज नव्हता. किंबहुना यानंतर कोणत्या स्वरूपाची नोकरी मिळेल याची खात्री नव्हती. आजी यानंतर बहुदा मामाकडेच राहील हे मात्र नक्की झाले होते. अभ्यासक्रमात अनेक जागतिक प्रसंगामागील कोडी कशी व कोणामुळे उलगडत गेली याचा रोड मॅप शिकायला मिळत होता. त्याच काळात भारतात डिजिटल मीडिया नावाचा प्रकार उदयाला आला होता. त्यातीलच एकाकरता मी सहा महिने शिकताना इंटर्नशिप म्हणजे उमेदवारी मिळवली. माझ्या रिपोर्टिंगवर ती कंपनी खुश होती. दर आठवड्याला एक नवीन विषय घेऊन त्यावर संशोधित स्वरूपात १००० शब्दांचा माझा लेख स्वीकारला जायला सुरुवात झाली. भारतातील सोशल मीडियामध्ये माझे नाव जाणकारांमध्ये चर्चिले जायलाही सुरुवात झाली होती. ही नीना पाटील पत्रकार कोण? या प्रश्नाचे उत्तर काही महिन्यातच नीना पाटील ही पत्रकार काय म्हणते? इथपर्यंत जाऊन पोहोचले.

पहिली कायद्याची पदवी, नंतर ही दुसरी अमेरिकेतील शोध पत्रकारितेची पदवी हाती घेऊन मी पुन्हा मुंबईतच अवतरले. साताऱ्याचे लहानपणाचे मराठी, दादरचे बोली मराठीचा उपयोग सामान्य माणसाशी संवाद साधताना मला कायम होतो. त्यांना जशी मी त्यांच्यातली वाटते तशी अमेरिकन एक्सेंट असलेल्या इंग्रजी मुळे इंग्रजी पत्रकारितेतही माझा दबदबा आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी तीनही प्रकारच्या चॅनलवरील एखादी गंभीर विषयावरची चर्चा असेल तर साऱ्यांना आता माझी आवर्जून आठवण येऊ लागली आहे. एक गोष्ट मात्र नक्की, मी आधी वकील न बनता थेट पत्रकारिता शिकले असते तर इथे पोचले असते का? याचे उत्तर मात्र अजून मला सापडत नाही. कदाचित मला न आठवणाऱ्या माझ्या फौजदारी वकिली करणाऱ्या वडिलांची गुणसूत्रे माझ्यात उतरली असावीत. स्त्री पत्रकार असल्याचे अनेक फायदे सहज सांगता येतात, मात्र तोट्यांचा उघड उल्लेख करणे भारतात योग्य ठरत नाही हे नक्कीच कळले आहे. (क्रमश:)

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women in media women still underrepresented in investigative journalism zws