Wow! Momo owner Sagar Daryani Success Story: देशात फास्ट फूडचे मार्केट वेगाने वाढत आहे. मॅगी, पिझ्झा, बर्गर, नुडल्स, मंच्युरियन, वडापाव खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गाव असो की शहर, रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला फास्ट फूडचा एक तरी गाडा दिसेल. या फास्ट फूडमध्ये मोमोजने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मोमोज सध्या पिझ्झा बर्गरलाही टक्कर देत आहे.
मोमोजची मागणी देशभरात एवढी वाढली आहे की, प्रत्येक घरात तुम्हाला एक तरी मोमोज लव्हर दिसेल. आज आपण मोमोज विकणाऱ्या Wow Momo या कंपनीच्या मालकाची अनोखी यशोगाथा जाणून घेणार आहोत. Wow Momo या कंपनीचा को फाउंडर असलेल्या सागर दरयानी याने मोमोज विकून दोन हजार कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. सागरचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, जाणून घेऊ या.
२००८ मध्ये Wow Momo कंपनीची स्थापना
प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, पायलट किंवा अधिकारी बनावे आणि चांगला पगार कमवावा; पण गरजेचे नाही की नोकरी करूनच तुम्ही चांगला पैसे कमावू शकता. व्यवसायात उतरूनसुद्धा तुम्ही आर्थिक प्रगती करू शकता. सागर दरयानी याचे उत्तम उदाहण आहे.
सागर दरयानीच्या आई-वडिलांना वाटायचे की, याने चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी, पण सागरचे ध्येय वेगळे होते. कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पदवी घेताना सागरला मोमोज विकण्याची कल्पना सुचली. तेव्हा Momos फक्त चिनी फास्ट फूड म्हणून ओळखले जायचे. जेव्हा त्याने याबाबत त्याच्या घरी सांगितले तेव्हा सर्वांना धक्का बसला होता. मोमोजची ही कल्पना घेऊन सागरने २००८ मध्ये Wow Momo कंपनीची स्थापना केली.
Wow Momo ने मार्केटमध्ये निर्माण केली ओळख
सागरच्या या स्टार्टअपवर त्याचे वडील एकदा त्याला टोमणा मारत म्हणाले होते की, ‘आता माझा मुलगा मोमोज विकणार’; पण आज याच मोमो कंपनीची किंमत दोन हजार कोटी रुपये आहे.
कोलकातामध्ये सागर दरयानीने त्याचा मित्र विनोद कुमारला सोबत घेऊन मोमोजचे लहानसे दुकान उघडले. त्यानंतर प्रत्येकाच्या तोंडावर एकच नाव होतं Wow Momo. या मोमोजची चव लोकांना एवढी आवडली की दुकानावर एकच गर्दी व्हायची. हळूहळू एका लहानशा दुकानाचे एका मोठ्या आउटलेटमध्ये रुपांतर झाले. व्यवसाय वाढत गेला, पण सुरुवातीला फंड आणि वर्कफोर्सच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला, पण दोघांनीही हार मानली नाही. सागरने ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी Wow Momoचे स्लोगन लिहिलेली टी-शर्ट्स प्रिंट केली आणि कर्मचाऱ्यांना घालण्यास सांगितले. तसेच आउटलेट्सच्या बाहेरसुद्धा हे टी शर्ट घालण्याची विनंती केली, यामुळे लोक Wow Momo ला ओळखू लागले.
त्यांनी स्टीम मोमोजबरोबर तंदूरी मोमोज, कॉकटेल मोमोज, फ्राय मोमोज इत्यादी प्रकार विकायला सुरू केले. सागरच्या या ट्रिकने Wow Momo ने मार्केटमध्ये आपली नवी ओळख निर्माण केली.
एका लहानशा दुकानापासून सुरुवात केलेले Wow Momo आज देशभरात लोकप्रिय झालेले आहेत. आज देशभरात २६ राज्यांत याचे ६०० आउटलेट्स आहेत. मॅकडॉनल्डस, केएफसी, डॉमिनोज, पिझ्झा हटसारख्या फास्ट फूड आउटलेट्सला ते टक्कर देत आहे. ते दिवसातून सहा लाखांपेक्षा जास्त मोमोजची विक्री करतात.
सागर आणि त्याच्या मित्राने Wow Momo द्वारे व्यवसायाची एक नवीन संकल्पना सर्वांसमोर आणली. Wow Momo द्वारे आज अनेक लोकांना रोजगार मिळतो. कोणतेही काम लहान नाही, आयुष्यात मेहनत घेतली तर तुम्ही यशाच्या उच्च शिखरावर जाऊ शकता, हे सागरने सिद्ध करून दाखवलं.