How to speak in english like a pro : माणसाच्या आयुष्यात भाषेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. प्रत्येक भाषेला एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे भाषा आत्मसात करणे खूप जास्त गरजेचे आहे. मराठी, हिन्दीबरोबर करिअरच्या दृष्टीकोनातून विचार केला तर इंग्रजी भाषा सुद्धा बोलता येणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकांना इंग्रजी लिहिता येते, वाचता येत पण नीट बोलता येत नाही. पण इंग्रजी ही जागतिक पातळीवर संवाद साधण्यास मदत करणारी भाषा आहे. त्यामुळे ही भाषा प्रत्येकाला येणे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही उत्तम इंग्रजी बोलू शकता.

१. कधीही इंग्रजी बोलण्यास घाबरू नका.

जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलण्यास सुरूवात करता तेव्हा घाबरू नका. लोक तुम्हाला चिडवतील किंवा तुमची मजा घेतील, याचा विचार करू नका. सतत इंग्रजीमध्ये बोलत राहा, एकदिवस तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी भाषा बोलता येईल.

२. खूप जास्त ग्रामरचा अभ्यास करू नका

हे वाचायला तुम्हाला विचित्र वाटेल पण जेव्हा तुम्ही खूप जास्त ग्रामरचा अभ्यास करता तेव्हा तुमची इंग्रजी शिकण्याचा वेग मंदावतो आणि अनेकदा तुमचा गोंधळ उडतो. त्यामुळे खूप बेसिक ग्रामरचा वापर करून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करा.

३. समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकून घ्या.

चांगला संवाद हा समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकल्यानंतर सुरू होतो. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकून घेता तेव्हा तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तुम्हाला जर इंग्रजी भाषा बोलायची असेल तर आधी ती ऐकावी लागेल.

४. फ्री अॅप्स आणि वेबसाइटवरून इंग्रजी शिका

हल्ली अनेक अॅप्स आणि वेबसाइट आहेत ज्या फ्रीमध्ये इंग्रजी भाषा बोलायला शिकवतात. या अॅप्स आणि वेबसाइटचा फायदा घ्या.

५. इंग्रजी गाणे आणि रेडिओ चॅनेल्स ऐका

अनेकांना गाणी ऐकायला आवडतात. तुम्ही तुमची आवड जपत इंग्रजी शिकू शकता. याशिवाय रेडिओ चॅनेल्स ऐकू शकता. त्यावरील इंग्रजी भाषेतील संवाद आणि बातम्या तुम्हाला इंग्रजी बोलायला मदत करतील.

६. सबटायटलसह इंग्रजी चित्रपट आणि टिव्हीवरील कार्यक्रम पाहा

इंग्रजी भाषा शिकण्याची ही खूप मजेशीर टिप आहे. तुम्ही स्वत:चे मनोरंजन करत इंग्रजी चित्रपट आणि टिव्हीवरील कार्यक्रम पाहा. इंग्रजी कार्यक्रम आणि चित्रपट बघताना सबटायटलचे ऑप्शन ऑन करा यामुळे तुम्ही इंग्रजीचे उच्चार, नवनवीन शब्द सहज शिकू शकता.

७. शब्द नाही तर वाक्प्रचार शिका

अनेक लोकांना नवनवीन शब्द माहिती असतात पण वाक्प्रचार माहिती नसल्यामुळे ते नीट वाक्य बनवू शकत नाही पण तुम्ही वाक्प्रचारच्या मदतीने अगदी सोपी पद्धतीने वाक्य बनवू शकता.

८. बोलताना भाषांतर करू नका

अनेक जण इंग्रजी बोलताना सुरुवातीला हिन्दी किंवा मराठीमध्ये वाक्य बनवतात आणि त्यानंतर त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर करतात. यामुळे तुम्ही लवकर इंग्रजी बोलू शकणार नाही. त्यामुळे इंग्रजी बोलताना काय बोलायचं आहे, याचा विचारसुद्धा इंग्रजीमध्ये करा.

९ स्वत:बरोबर बोला.

रात्री किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आरशासमोर उभे राहून स्वत:बरोबर बोला. चेहऱ्यावर हाव भाव आणत मोठ्या आवाजाने बोला. यामुळे तुम्ही सार्वजानिक ठिकाणी इंग्रजी बोलताना घाबरणार नाही. एखादा विषय निवडा आणि त्यावर इंग्रजीमध्ये बोला.