नवोन्मेषाच्या कल्पनेसह स्वत:चा उद्याोग सुरू करणारे तरुण जेथे आहेत, तेथे आपल्या संकल्पनेतून इतरांच्या उद्याोगाची गाडी रुळावर आणणारे सिद्धेश साकोरेसारखे तरुणदेखील आहेत. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील करिअर बाजूला ठेवत सिद्धेशने शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कंबर कसली. मातीची गुणवत्ता सुधारून शेतकऱ्यांना नफा मिळवून देणाऱ्या वनशेतीसंदर्भातील त्याच्या प्रकल्पाविषयी त्याच्याच शब्दांत जाणून घेऊ…

२०१७ साली मी मेकॅनिकल इंजिनीअर झालो. माझे वडील शेतकरी आहेत, पण त्यांची इच्छा होती की मी इंजिनीअर व्हावं. पण पदवीनंतर मला पुण्यात विज्ञानाश्रम या संस्थेत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इंटर्नशिपमध्ये मी पाच हजार शेतकऱ्यांचे शेतीतील माती परीक्षण प्रकल्पाचा भाग म्हणून केले. त्या प्रकल्पातून हे निरीक्षण पुढे आले की ९० टक्के जमिनी नापिक होत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि पर्यायाने उत्पन्न कमी झाले आहे. या कारणामुळे शेतकरी आपल्या पुढील पिढीला शेतीत येऊ देत नाहीत. शेतकऱ्यांसाठी काही करायचे हा विचार छळू लागला आणि मी शेतकऱ्यांसाठीच काम करायचे ठरवले.

मी घेतलेल्या सर्व माती नमुन्यांमध्ये माती खराब होण्याचं कारण रासायनिक खतांचा अतिवापर हे होते. मी शेतीसाठी काही करण्याआधी स्वत: त्यातील प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. सेंद्रीय शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना कळले असले तरी ते खर्चिक असल्याने आणि त्याला पुरेसे मार्केट उपलब्ध नसल्याने शेतकरी त्याकडे वळत नव्हते. मग असे कोणते मॉडेल राबवता येईल त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, शिमला, दक्षिण भारतात प्रशिक्षण घेतले. तेथे कोणत्या पद्धतीने शेती होत आहे ते पाहिले. माझ्या गावापासून सुरुवात करायचे ठरवले. वडिलांचा बिल्कुल पाठिंबा नव्हता. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर हे माझे गाव. आमची तीन साडेतीन एकर शेती आहे. आमचं वार्षिक उत्पन्न ६० ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान होतं. ३०-४० गावं असलेला दुष्काळी भाग आहे. हंगामात कांदा आणि नंतर मका, ज्वारी, बाजरी पिकवतात, जेणेकरून जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटेल. वडिलांना सांगितलं की मला शेती करायची आहे. त्यांनी सांगितले ना घर मिळणार ना शेती.

संस्थेमार्फत शेतकऱ्यांना हातभार

घरापासून ४० कि.मी.वर एक कडूस म्हणून गाव आहे तिथे भाड्यावर शेती घेतली. तिथे शेतीतले १४-१५ मॉडेलचे प्रयोग केले. मल्टीलेअर फार्मिंग, अॅग्रो फॉरेस्ट्री, फूड फॉरेस्ट्री, बांबू हाऊस, पॉली हाऊस, इंग्लिश व्हेजिटेबल असे सर्व प्रकार करून पाहिले. पण वनशेतीचेच मॉडेल योग्य असल्याचे लक्षात आले. या मॉडेलमुळे मातीची गुणवत्ताही पहिल्या तीन वर्षांत १.२ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांवर गेली. पहिल्याच वर्षी अडीच लाखांचे उत्पन्न आले. हे मॉडेल शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेतले. हे मॉडेल प्रत्यक्षात उतरवण्याचा खर्च लाखभर रुपये होता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नच तेवढे होते. शिवाय कर्जे होती. मग २०१९ ला मी हे काम सुरू केलं. अॅग्रो रेंजर्स ही एनजीओ २०२० ला आकाराला आली. या संस्थेच्या माध्यमातून सीएसआर फंडातून ९० टक्के खर्च आम्ही उचलतो. ज्यांची जमीन पाच एकरांहून कमी आणि वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे अशा अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांसाठी आमची संस्था काम करतो. त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून त्यांच्या मातीत कोणत्या पद्धतीची फळबाग लावता येईल, ते आम्ही पाहतो. रोपं, ड्रीप, कंपोस्ट खत, जैविक खत, मार्केट लिंक्स असं सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. आता आमची १५-१६ जणांची टीम आहे. ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत. पुण्यातच ३०-४० गावांमध्ये आमचं काम सुरू आहे.

२१६ शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेतो आम्ही. त्यांना मोफत माती परीक्षण करून देतो. कोणती झाडे लावू शकतात, ते सांगतो. २२० एकरावर २१६ शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत केली आहे. अर्धा एकरापासून दोन एकरापर्यंत शेतीवर एक लाख १५ हजारांच्या आसपास झाडे लावली आहेत. ३० प्रकारची झाडे आणि ८० प्रकारची आंतरपिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. दोन हजार शेतकऱ्यांचे आम्ही प्रशिक्षण घेतले आहे.

वनशेतीतून नियमित उत्पन्न

उदाहरणार्थ, एक शेतकरी कांद्याचं पिक घेत असेल तर ते आंतरपिक आणि अन्य आंबा, लिंबसारखी फळझाडं, शेवगा, पपई अशी झाडं लावली जातात. आत्यामुळे पहिल्या वर्षीपासूनच चार मुख्य झाडांपासून त्याचं उत्पन्न सुरू होतं आणि आंतरपिकांपासूनही तो नियमित उत्पन्न घेतो. आणि या विविध प्रकारच्या पिकांमुळे आणि झाडांच्या संयोगामुळे मातीच्या सेंद्रीय कर्बाचीही वाढ होते.

संयुक्त राष्ट्रांकडून गौरव

या कामाची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेत मला पुरस्कार दिला. युनायटेड नेशन्स कन्वेंशन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनने ‘लँड हिरो’ पुरस्कार देत गौरव केला. जून २०२४ च्या जूनमध्ये मी हा पुरस्कार घेण्यासाठी जर्मनीत गेलो होतो. जगभरातून या विभागात पुरस्कारप्राप्त केवळ दहा जण होते आणि भारतातून मी एकमेव होतो. संयुक्त राष्ट्रांची ही एजन्सी जमिनीच्या धूप होण्याच्या प्रक्रियेवर काम करते. याशिवाय पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वैज्ञानिक सल्लागार विभागासोबत ग्रामीण तंत्रज्ञानावर आमची संस्था काम करत आहे. त्यांचे तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. त्यांच्यामाध्यमातून एक फ्रेंच शिष्टमंडळही आमचं काम पाहायला आले होते.

उद्योगाकडे वाटचाल

याच माध्यमातून आता आम्ही उद्याोगाची बाजूही विकसित करत आहोत. शेतकऱ्यांना बाजारपेठा मिळवून देत आहोत. उत्पादनांच्या व्हॅल्यू अॅडिशनवर काम करत आहोत. उदाहरणार्थ, शेवग्याचं पिक भरपूर घेत आहोत, तर त्यापासून मोरिंगा पावडर बनवत आहोत, फळांवर प्रक्रिया करून उत्पादने बनवले आहेत. पुण्यात कृषी प्रदर्शनही आयोजित करतो. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव आणि ग्राहकांना उत्तम प्रतिचं अन्नधान्य हे समीकरण जुळविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. उद्याोग वाढवत गेला तर तिथे शेतकऱ्यांनाच भावाची तडजोड करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमचे मॉडेल पुढील तीन-चार वर्षात इतरत्र पोहोचवण्याचाही प्रयत्न करणार आहोत.

सध्याच्या शेतकऱ्याचे सरासरी वय ५२ वर्षे आहे. शेतीकडे नकारात्मक पद्धतीने पाहिले जात आहे. शेतकऱ्यांच्या अल्पउत्पन्नामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात आधी अडचण येते, शिवाय मुलांनीही शेती करायचे ठरवले तर त्यांनी लग्नं अडतात. शेतकरी मुलाला मुलगी देण्यास कोणी तयार नसते. म्हणूनच शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल आणि प्रतिष्ठा मिळवून देणे हेच माझे उद्दिष्ट आहे.

(शब्दांकन : मनीषा देवणे)