सोहमचे नुकत्याच एका नावाजलेल्या कंपनीमध्ये सिलेक्शन झाले होते. त्याला अपेक्षित असे पॅकेजही मिळाले आणि महत्त्वाचा रोल देखील त्याला मिळाला त्यामुळे सोहम अतिशय खुशीत होता. कंपनीने त्याला लगेचच जॉईन होण्याविषयी सांगितले. त्यामुळे सोहम अतिशय उत्साहात होता. इतके वर्ष ज्या दिवसाची वाट आपण बघत होतो तो दिवस आपल्या आयुष्यात उजाडला असे त्याला मनोमन वाटत होते. आयुष्यामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या अनेक मुला मुलींना सुरुवातीच्या काळामध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. या प्रश्नांना किंवा अडचणींना कसे सामोरे जायचे आणि त्यावर कसा विजय मिळवायचा याची पूर्वतयारी बहुतेकांनी केलेली नसते.
बऱ्याच जणांनी त्यांची मते आपल्या ओळखीतील इतरांना नोकरी करताना काय काय अनुभव आले हे ऐकून बनवलेली असतात. सोहमही त्याला अपवाद नव्हता. वास्तविक कुठल्याही नव्या गोष्टीची सुरुवात करताना आपली पाटी कोरी असणे अत्यंत आवश्यक आहे परंतु ऐकलेल्या माहितीच्या आधारावर बरेच जण अनेक अनावश्यक गोष्टी व मतप्रवाह आपल्या मेंदूमध्ये भरून ठेवतात. कुठल्याही कंपनीमध्ये कुठलाही रोल निभावताना किंवा कुठलेही काम करताना आपला प्रवास मीकडून आपण असा होणे अपेक्षित असते कारण आपल्या वैयक्तिक माहितीला, मूल्यांना, ठाम अशा मनोधारणांना काही काळ बाजूला ठेवणे अत्यंत आवश्यक असते. परंतु ही जाणीव बऱ्याच जणांना नसते. सोहमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते.
त्याच्या पदासाठी आवश्यक असलेली अनेक कौशल्य देखील त्यांनी आत्मसात केलेली होती तरी देखील कंपनीमध्ये आपली भूमिका निभवताना व इतर सहकाऱ्यांबरोबर टीममध्ये काम करताना थोड्याच दिवसात त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आपले म्हणणे दुसऱ्याने ऐकून घ्यावे आणि त्याची लगेच अंमलबजावणी करावी असे सोहमला वाटत होते परंतु कुठलाही निर्णय राबवताना दुसऱ्याची मते त्याची काम करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असू शकते हे सोहमला पटत नव्हते.
नोकरीच्या ठिकाणी टीममध्ये काम करताना आपल्या व्यक्तिगत गोष्टी ,आपल्या स्वत:ची आयुष्यात असलेली मूल्ये, आपले मतप्रवाह बाजूला ठेवून कंपनीतील वरिष्ठांनी सांगितलेल्या गोष्टींचे तंतोतंत पालन करावे लागते हे सोहमला हळूहळू शिकावे लागले. प्रत्येक गोष्ट बरोबर आहे का चूक आहे असा विचार करायची सोहमला आधीपासूनच सवय होती. त्यामुळे स्वत:च्या मूल्यांवर सोहम खूपच ठाम होता. परंतु हा ठामपणा नकळत हट्टीपणामध्ये परावर्तित होतो हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. आग्रही असणं आणि हट्टी असणं यामध्ये खूपच फरक आहे. आग्रही असलेली व्यक्ती वेळ काळ प्रसंगानुसार स्वत:मध्ये बदल करू शकते तर हट्टी असलेल्या व्यक्तीला माझं कायमच बरोबर आणि समोरच्याने माझा ऐकलेच पाहिजे असे सतत वाटत असते. सोहमला समोरच्या व्यक्तीकडून नाही ऐकण्याची सवय नसल्यामुळे टीम मधील इतर सहकाऱ्यांशी जमवून घेताना त्याला सुरुवातीला पुष्कळच त्रास झाला. परंतु समुपदेशनाच्या काही सेशन्स नंतर सोहमच्या विचार भावना आणि वर्तन या तिन्ही स्तरांवर हळूहळू बदल होताना मला दिसू लागला. त्याचा प्रवास मी कडून आपण असा होऊ लागला.
आपल्या विचारांना आणि मनोधारणांना लवचिकपणाची सवय जाणीवपूर्वक लावावी लागते. वेळ, काळ, प्रसंग आणि परिस्थितीची गरज ओळखून वागण्याची सवय त्यामुळे हळूहळू आपल्याला होऊ लागते. सुरुवातीचे काही महिने तणावात गेल्यानंतर सोहम आता एक चांगला टीम मेंबर म्हणून काम करू लागला होता. स्वत:ला काय वाटते यापेक्षा कंपनीची ध्येय आणि उद्दिष्ट कोणती आहेत आपल्या बॉसने आपल्याला नक्की कुठली भूमिका पार पडायला सांगितली आहे या सर्व गोष्टींचा विचार आता तो करू लागला. कुठलीही नोकरी स्वीकारल्यानंतर कंपनीतील इतर सहकाऱ्यांबरोबर जुळवून घेणे हे एक शास्त्र, कला आणि कौशल्य देखील आहे असे मला वाटते.
drmakarandthombare@gmail. com