मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे. पण मला डॉक्टर व्हायचे आहे. हे ऐकल्यावर प्रत्येक जण सांगतो की, डॉक्टर होण्यासाठी तर खूप पैसे लागतील. मला यातील काहीच माहिती नाही. तुम्ही याची माहिती सांगाल का?
– राहुल बनसोडे
हलाखीच्या परिस्थितीतही तू शिकत आहेस, तसेच मोठे ध्येय ठेवले आहेस याविषयी सर्वप्रथम तुझे अभिनंदन. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क निश्चितच खूप जास्त आहे. पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारे आहे. शिवाय संबंधित उमेदवार हा अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त व भटक्या जाती, नॉन क्रिमीलेअर, इतर मागास वर्ग या संवर्गातील असल्यास त्याला शुल्कात संवर्गनिहाय निर्धारित सूटही दिले जाते. खुल्या संवर्गासाठी वार्षिक शुल्क आहे ७८ हजार रुपये, तर राखीव संवर्गासाठी तेच शुल्क आहे केवळ तेरा हजार सातशे साठ रुपये. केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेतील एमबीबीएस अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क ५ हजार रुपयांच्या आसपास आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित असणाऱ्या जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेतील एमबीबीएस अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क दहा हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून तुला डॉक्टर होता येऊ शकते. परंतु इथे नंबर लागण्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड असल्याने अगदी अल्प गुणांच्या संख्येने नंबरची चढाओढ असते. त्यामुळे ते लक्षात घेऊन आत्तापासूनच बारावीचा आणि पुढे प्रवेश परीक्षेचा अभ्यास जोमाने सुरू कर.
करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com