केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ च्या अभ्यासक्रमात समाजशास्त्राच्या काही घटकांचा  अंतर्भाव केला आहे. ‘भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्य’ हा घटक सारांशरूपाने जाणून घेऊयात-
व्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो. मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी समूहात राहायला सुरुवात केली व त्यातून समाज व सामाजिक जीवन अस्तित्वात आले. व्यक्तींचे वैयक्तिक जीवन व सार्वजनिक जीवन यांच्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रांच्या सीमारेषा पुसट आहेत व त्या तशा असणे स्वाभाविक आहे. कारण मानवी जीवनाचा प्रवाह या सर्व अंगांनी युक्त असतो. त्याची काटेकोर विभागणी करता येत नाही. म्हणूनच समाजशास्त्रामध्ये समाजाचे स्वरूप व स्तरीकरण, व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध (राजकीय- सामाजिक- आíथक), राजकीय संस्था, सामाजिक संस्था, आíथक संस्था, धार्मिक-सांस्कृतिक संस्था, सामाजिक चळवळी, सामाजिक विकास व समस्या इत्यादींचा समावेश होतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील पेपर १ मध्ये इतिहास व भूगोल याबरोबरच समाजशास्त्राच्या काही घटकांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे. भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्ये, स्त्रियांची भूमिका व स्त्री-संघटना, लोकसंख्या व लोकसंख्याविषयक समस्या, दारिद्रय़ व विकासाच्या समस्या, शहरीकरण, शहरीकरणाच्या समस्या व उपाय, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायवाद, प्रदेशवाद व धर्मनिरपेक्षता या घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश होतो. सर्वप्रथम या घटकांच्या अभ्यासासाठी आवश्यक दृष्टिकोनाची चर्चा करू.
मानवी समाज गतिशील, प्रवाही व सतत बदलणारा आहे. याचा अर्थ एखाद्या समाजाचा स्थायिभाव नाकारणे असा होत नाही. अर्थात समाजाचा स्थायिभावसुद्धा गतिशील असू शकतो. थोडक्यात, समाजाच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा, मूल्ये, तत्त्वे (स्थायिभाव; समाजाची स्थितिशीलता) व काळानुरूप समाजामध्ये घडणारे बदल (गतिशीलता) या दोहोंचा वेध घेणे समाजशास्त्रामध्ये क्रमप्राप्त ठरते. कारण, शतकानुशतकांच्या सामाजिक स्थितिशीलता व गतिशीलता यामधील संबंधांचा परिपाक म्हणजे आजचा समाज होय! म्हणूनच आजच्या समाजाच्या आकलनासाठी ‘सामाजिक ऐतिहासिक आढावा’ आवश्यक ठरतो. इतिहासावरील लेखमालेत स्पष्ट केल्याप्रमाणे या आढाव्याचे आकलन इतिहासाच्या अभ्यासातून होणे अपेक्षित आहे. ‘एनसीईआरटी’च्या इतिहास व समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकांचे अध्ययन यासाठी पुरेसे ठरते.
भारतीय समाजाच्या ऐतिहासिक आढाव्यातून तिच्या प्रमुख वैशिष्टय़ांचे व वैविध्याचे आकलन होते. भारतीय उपखंडाच्या वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थानामुळे अनेक प्रकारच्या लोकांनी या भागात स्थलांतर केले. स्थलांतरित लोक भारतीय समाजाचे भाग झाले. आर्य (आर्याच्या स्थलांतराबाबतीत असलेले वाद बाजूला ठेवून, इतिहास व समाजशास्त्रज्ञांच्या मतानुसार), ग्रीक, पíशयन, शक, कुशाण, पहलव, हुण, अरब, मंगोल, तुर्की, युरोपियन इत्यादी लोकसमूह भारतीय उपखंडात स्थलांतरित झाले. अशी स्थलांतरे व भारतीय उपखंडाचा मोठा प्रादेशिक विस्तार या घटकांनी भारतीय समाजाला वैविध्य
प्रदान केले आहे. भारतीय समाजाची विविधता अनेक घटकांवर आधारित आहे. भारतामध्ये वंश, धर्म, जात, पंथ, संस्कृती, प्रदेश, भाषा इत्यादी घटकांवर आधारित विविधता आढळते. भारतीय समाजामध्ये नेग्रीटो, प्रोटो-ऑस्ट्रेलॉइड, मंगोलॉइड, मेडिटेरॅनियन, नॉर्डिक (आर्य) इत्यादी वंशाचे लोक आढळतात. यामधील पहिल्या तीन वंशांचे लोक मूळ भारतीय असल्याचे किंवा त्यांचे अस्तित्व सर्वाधिक जुने असल्याचे मानले जाते. भारतामध्ये िहदू, बौद्ध, जैन या धर्माचा उदय झाला. याव्यतिरिक्त भारतात ख्रिश्चन, शीख, इस्लामिक, झोरास्ट्रियन (पारशी), ज्यू या धर्माचेही अस्तित्व आहे. कबीरपंथी, सत्नामी, िलगायत असे अनेक पंथ भारतीय समाजात निर्माण झाले. अनेक पंथांनी वेगळा धर्म असल्याचे दावे केले असले तरी त्यांचा समावेश िहदू धर्मामध्ये केला जातो. भारतीय समाजातील आदिवासी व भटक्या जमातींना आपापल्या धर्मात समाविष्ट करण्याचा प्रयत्न अनेक धर्मानी केला. असे असले तरी या जमातींनी त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांचे जतन केल्याचे दिसते. भारतामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषा होत्या. त्यानंतर अनेक प्रादेशिक भाषांचा उदय झाला. तामीळ भाषेलासुद्धा प्राचीन भाषा मानले जाते. भारतीय संविधानामध्ये २२ प्रमुख भाषांचा उल्लेख असून इतर अनेक भाषा भारतात बोलल्या जातात.
भारतीय समाजामध्ये वैशिष्टय़पूर्ण स्तरीकरण आढळते. या स्तरीकरणाची सुरुवात प्राचीन वर्णव्यवस्थेमध्ये झाल्याचे मानले जाते. आर्यानी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णामध्ये स्तरीकरण केले. इतर वंशांच्या लोकांना दास, दस्यू असे संबोधण्यात आले. यांना वर्णव्यवस्थेमध्ये स्थान नाकारण्यात आले. व्यवसायावर आधारित श्रेणींमधून तसेच भटक्या व इतर जमातींना धर्मात स्थान देण्याच्या (धर्मप्रसारचा उद्देश) प्रयत्नांतून जाती निर्माण झाल्याचे मानले जाते. भारतीय समाजामध्ये वर्णाच्या ढोबळ स्तरीकरणाच्या आराखडय़ामध्ये जातींचे स्तरीकरण (उतरंड) झाल्याचे दिसते. याव्यतिरिक्त (तत्कालीन सामाजिक दृष्टिकोनावर आधारित) हलकी कामे करणाऱ्या गटांना अस्पृश्य मानण्यात आले. याच जातिव्यवस्थेचा परिणाम भारतात प्रवेश करणाऱ्या इतर धर्मावरही झाल्याचे दिसते. ख्रिश्चन धर्माला भारतात जातिव्यवस्थेला तोंड द्यावे लागले, तर इस्लाम धर्मातील शिया, सुन्नी पंथांव्यतिरिक्त स्तरीकरण भारतात झाल्याचे दिसते. भारतातील सामाजिक स्तरीकरणाची अनेक वैशिष्टय़े आहेत. रोटी-बेटी व्यवहारांवरील बंधने, जातीवर आधारित वस्त्या, जातीवर आधारित प्रतिष्ठेच्या संकल्पना यांचा यात समावेश होतो. भारतीय समाज नेहमीच पुरुषप्रधान राहिला आहे. प्राचीन काळात स्त्रियांना अनेक अधिकार होते. कालांतराने स्त्रियांचे अधिकार काढून घेण्यात आले व त्यांना स्तरीकरणातील शूद्रांचे स्थान प्रदान केले गेले. भारतीय समाजातील स्तरीकरणामध्ये प्रदेशानुरूप बदलसुद्धा आढळतात. काही जातींचे प्रदेशामध्ये अस्तित्व असले तरी त्यांना प्रादेशिक आयामाद्वारे वेगळी ओळख दिली जाते. तद्वतच, काही जाती विशिष्ट प्रदेशाशी निगडित असल्याचे दिसते.
या लेखात ‘भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्टय़े व वैविध्य’ या घटकावर सारांशरूपी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील लेखांमध्ये अभ्यासक्रमातील इतर घटकांवर चर्चा करू या. अभ्यासक्रमातील घटकांच्या आकलनासाठी भारतीय समाजाच्या पाश्र्वभूमीचा अभ्यास आवश्यक ठरतो. भारतीय समाजाच्या समस्या व उपाय, भारतीय समाजावर परिणाम करणारे अंतर्गत व बाह्य (उदा. जागतिकीकरण) घटक, सामाजिक सक्षमीकरणासारख्या संकल्पना यांचा सर्वागीण अभ्यास आवश्यक ठरतो. ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचे आकलन, निवडक संदर्भग्रंथ व वर्तमानपत्रांचे वाचन यासाठी पुरेसे ठरावे.