विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांत आपण सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीनही परीक्षांसाठी समान असणाऱ्या घटकांपैकी मराठी, इंग्रजी, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास या विषयांच्या अभ्यासाची रणनीती पाहिली. आज आपण भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन या विषयांच्या अभ्यासाची रणनीती पाहू या.
अभ्यासक्रम व अभ्यासस्रोत
१. भारतीय राज्यघटना – या विभागात घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल
कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल,मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ- विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या या प्रमुख घटकांवर प्रश्न विचारले जातात.
अभ्यासस्रोत – सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्राची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके, अकरावी व बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके, एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे पुस्तक.
२. माहिती अधिकार अधिनियम- २००५ – या घटकावरील प्रश्न सामान्यत: या अधिनियमातील तरतुदी, विविध घटकांसाठी असणाऱ्या विशेष सवलती, कायद्याची अंमलबजावणी, अंमलबजावणी न झाल्यास होणारी शिक्षा या संदर्भात असतात.
अभ्यासस्रोत – यशदामार्फत प्रकाशित माहिती अधिकार अधिनियम या विषयाची पुस्तिका.
३. संगणक व माहिती तंत्रज्ञान – या घटकांतर्गत आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवìकग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा-सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य अशा प्रमुख घटकांवर प्रश्न विचारले जातात.
अभ्यासस्रोत – एम.एस.सी.आय.टी.चे पुस्तक, संगणक व माहिती तंत्रज्ञान हे अरिहंत प्रकाशनाचे पुस्तक.
४. बुद्धिमत्ता चाचणी – या विषयामध्ये अंकमाला, अक्षरमाला, संख्यामाला, चिन्हमाला, सांकेतिक शब्द, अंकांची कोडी, आरशातील प्रतिमा, नातेसंबंध, तर्क-अनुमान, आकृत्यांमधील विसंगती, घनाकृती, कालमापन, माहितीचे आकलन, बैठक व्यवस्था, अशा घटकांचा समावेश होतो. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व ताíकक क्षमतेच्या कसोटीबरोबरच त्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते. एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडविता येऊ शकतो. त्यामुळे या पद्धतींचा विचार करून त्यातील खाचाखोचा लक्षात ठेवून प्रश्न सोडविण्याचा सराव केल्यास परीक्षेच्या वेळी कमीत कमी वेळात प्रश्न सोडविता येऊ शकतात. हे प्रश्न ठरावीक वेळेत सुटण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता असते. यासाठी कोणताही शॉर्टकट वापरता येत नाही. तुमचा जेव्हा जास्तीत जास्त सराव होतो तेव्हाच तुम्हाला शॉर्टकट्स जमू शकतात. त्यामुळे या विषयाची तयारी करताना तुम्हाला महत्त्वाची सूत्रे, पाढे, वर्ग, वर्गमुळे, घन, घनफळे तोंडपाठ असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा या घटकांची विद्यार्थी दहशत घेतात आणि या दहशतीपोटी या विभागाकडे पूर्वग्रहदूषित भीतीनेच पाहतात आणि याच्या तयारीसाठी ठोस मार्ग स्वीकारण्याऐवजी सपशेल शरणागती पत्करतात. परंतु या विभागात जर चेंडू तडीपार करून अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर अभ्यासाचे घटक ठरवून घेऊन त्यांचा अधिकाधिक सराव आणि सराव याच सूत्राने चौफेर तयारी करावी.
अभ्यासस्रोत – यासाठी चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञाशोध परीक्षेची गाइड्स तसेच आर. एस. आगरवाल यांच्या पुस्तकातील वरील घटकांचा सरावासाठी वापर करता येईल.
विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेखामध्ये आपण सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तीनही परीक्षांसाठी असमान असणाऱ्या उर्वरित घटकांच्या अभ्यासाविषयी वेगवेगळी माहिती घेऊ या.