आमच्या मैत्रबन नावाच्या वास्तूची, शेतीची देखरेख सुनीता आणि सतीश गेली अनेक वर्षे करीत आहेत. कुठल्या खांडे- कुसुर गावच्या डोंगरात वाढलेली, साप, बेडूक, उंदीर या कुठल्याच गोष्टींना किंचितही न घाबरणारी, अनवाणी शेतात चालणारी आणि सतत काम करू पाहणारी आमची सुनीता. तिच्या पहिल्या मुलाचा जन्म १ जूनला झाला. तीन वर्षांपूर्वी. तिने मलाच त्याचं नाव ठेवायला सांगितलं. १ जून म्हणजे पाऊस सुरू व्हायचे दिवस असल्यामुळे मी त्याचं नाव मल्हार ठेवलं. हा मल्हार आता शाळेतही जाऊ लागलाय. आज मैत्रबनात गेले तेव्हा आमचं भाताचं शेत मस्त वाढलं होतं, पाण्यात चिंब भिजलं होतं. पावसामुळे सगळंच हिरवंगार झालंय पुन्हा. झाडांना नवीन पालवी फुटली आहे, अनेक रंगांचे, आकारांचे, आवाजांचे असंख्य किडे, माश्या, बेडूक बाहेर आले आहेत. आमच्या फणसाच्या पूर्णपणे निष्पर्ण झालेल्या झाडालाही नवीन, सुंदर पानं आली आहेत. खरोखरच सगळं जिवंत आणि नवीन झाल्यासारखं वाटतंय. म्हणूनच श्रावण महिन्यात इतका आनंद, उत्साह आणि सणांची रांग असावी.
या नावीन्यात डुंबत असताना मला एकदम जाणीव झाली ती काळाच्या प्रवाहाची. प्रत्येक पावसाळ्यात झाडं वेगाने वाढताहेत, छोटासा मल्हार शाळेत जाऊ लागलाय आणि इतके दिवस सुंदर, कडकडीत तपकिरी असलेली जमीन पूर्णपणे वेश बदलून हिरवीगार झाली आहे. आपण किती क्षणात पुढे जाऊन श्रावणाची तयारी करायला लागतो. काही तरी संपतं आणि काही तरी सुरू होतं आणि हे चक्र सतत सुरूच. म्हणजे प्रत्येक नवी पालवी फुटत असताना ग्रीष्माचा परिणाम विरत असतो आणि आपण मात्र ग्रीष्माला काय वाटेल याचा विचार न करता श्रावणात किती दंग होतो. अर्थातच यात चूक-बरोबर काहीच नसेल, आपलंही आयुष्य तसंच तर आहे!
मल्हारच्या शाळेला आज सुट्टी मिळाली. का, तर गावच्या सरपंचाचा भाऊ वारला. आणि गावची स्मशानभूमी लहान मुलांच्या शाळेच्या शेजारी! मला या डिझाईनची थोडी गंमत वाटली- लहान मुलांची शाळा, मात्र त्याशेजारी संपलेल्या आयुष्याची स्मशानभूमी.
म्हणजे प्रत्येकच क्षण जगत असताना प्रत्येकच क्षण मरत असतो का खरंच?
शव हे त्याचे जाळू नका हो
जन्मभर तो जळतच होता
फुले त्यावरी उधळू नका
जन्मभर तो फुलतच होता..
या कवितेच्या ओळींची आठवण एकदम झाली.
म्हणजे प्रत्येकच दिवस नवा, प्रत्येक क्षण नवा, साजरं करणं तर मनावर असतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना कुणी काही कारणाने दु:खी असेल तर म्हणायचो, चल यार, आज दु:ख साजरं करू- कॉपर चोक्सचा चॉकलेट केक आणून. मग मनमोकळं दु:खी व्हायचो.
आमच्याकडे रोज कचरा गाडी घेऊन एक मुलगा येतो. त्याच्या सायकलवर आडवी टोपी घालून मस्त शीळ वाजवत, गाणी म्हणत, घंटा वाजवत लोकांचा कचरा घेत त्याची सकाळ घालवतो. मी सतार वाजवत असताना कुतूहलाने डोकावले एकदा. मी म्हणाले, ‘ये की आत.’ तो आला, बसला, ऐकलं आणि म्हणाला, मस्त आहे! दिवस मस्त जाईल. त्याला मी गेटपर्यंत सोडायला गेले आणि विचारलं, कसं वाटतं रे तुला तुझं काम? मग त्याच्या पडक्या दातांनी हसला आणि एकदम गाणंच म्हणू लागला, ‘‘हसते हसते.. कट जाए रस्ते!’’ लोकांचा कचरा घेण्यातसुद्धा त्याने त्याचा आनंद शोधला होता. तो त्याच्या गाण्यांमुळे लोकांनाही उत्साह द्यायचा.
त्याची सायकलवर कचरा गाडी घेऊन जाणारी आकृती आठवली की मला बरं वाटतं. किती सुंदर जगू शकतो आपण, प्रत्येक दिवशी. शिवाय कधी मन खचलं नसतं तर मात्र किती गजला, काव्यं, पुस्तकं, संगीत, चित्रं, पत्रं जन्माला आलीच नसती. म्हणूनच, साजरा करता येण्यासारखा तर प्रत्येक क्षण.. आनंद आणि दु:ख यामधल्या असंख्य छटा, कदाचित यापलीकडच्या अनेक भावना, विचार, अनुभव- अख्खं आयुष्य चाखून चाखून जगता येण्यासारखं आहे. अगदी बोअरडमसारख्या (Boredom) विषयावरसुद्धा किती काव्यात्मक विचार केलेत अनेक तत्त्ववेत्त्यांनी. माणूस शोधत असतो उत्तरं, पण नाहीच मिळाली तर वेळ आहे का पुरेसा रुसून बसायला?
नेहा महाजन – response.lokprabha@expressindia.com