चित्रपटसृष्टीबद्दल वर्षांनुर्वष मनावर मोहिनी टाकणारं, अगम्य असं काहीतरी वलय असल्याचं जाणवतं. म्हणूनच त्यातल्या तारे व तारकांबद्दल प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल लोकांच्या मनात असतं. कुणी टीव्हीमधला ओळखीचा चेहरा दिसला की शेजारपाजारचे लोक हमखास एकमेकांच्यात कुजबुजू लागतात, मग त्याची/तिची सही घेणं, सेल्फी घेणं, कधी नुसतंच बघत बसणं किंवा काही लोकांबाबतीत ‘त्यात काय एवढं’ असं म्हणून खांदे उडवून निघून जाणं मी स्वत:ही अनुभवलं आहे.
अमुक अभिनेत्रीने विमानतळावर कुठले कपडे घातले, तमुक पुरस्कार सोहळ्यात कोणती केशरचना केली, कुठल्या ब्रॅण्डचे बूट, पर्स, दागिने, नेलपॉलिश, लिपस्टिक या विषयांवर भरमसाट चर्चा करणाऱ्या वेबसाइट्स, मासिकं, गप्पा तर असतातच. आता तर ‘फॅशन पोलीस’सुद्धा असतात. कुणी तेच कपडे दोनदा वापरल्यावर का कुणास ठाऊक, पण हे फॅशन पोलीस गुन्हा दाखल करतात. आणि उलट माझ्या प्रोफेशनबद्दल असंच म्हटलं जातं की अॅक्टर्स ही जमातच मुळी स्वत:त रमणारी असते- सेल्फ इण्डलजण्ट. आपल्याला किती फॅन्स आणि फॉलोअर्स आहेत, शरीराची, त्वचेची, केसांची, नखांची काळजी घेणं इत्यादी. सिनेमाच्या प्रमोशनच्या काळात मी कुठला श्ॉम्पू वापरते, सकाळी उठल्यावर काय खाते असेही असंख्य प्रश्न विचारले जातात.
अर्थात या सगळ्यांमुळे अभिनेत्यांचं स्वत:कडे खूप लक्ष केंद्रित होतं असं वरवर वाटू शकतं. मला मात्र वाटतं सगळ्यांनाच स्वत:बद्दलही तितकं कुतूहल असतं. कपडे, केस, नखं, त्वचा यापलीकडे आपले विचार, मत, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, संवेदनक्षम व उत्कटपणे अनुभवलेल्या, जगलेल्या गोष्टी – त्यांना व्यक्त करण्याची इच्छा, समजून घेण्याची इच्छा अगदी पुरातन काळापासून स्पष्टपणे आढळते. म्हणजे माणूस म्हणून आपल्या ‘माणूस’ असल्याचं एक प्रकारचं आश्चर्य आणि ‘म्हणजे नेमकं काय हे’ उमजून घेण्यासाठी अनेकांनी किती प्रयास केला आहे! सूर्यास्त बघून अस्वस्थ झाल्यावर कुणाला कविता सुचली असेल तर, डोळे बंद केल्यावर पापणीवर दिसणाऱ्या प्रतिमेचं कुणा संशोधकाला आकर्षण वाटून त्याने ‘परसिस्टन्स ऑफ इमेजेस’ (ढी१२्र२३ील्लूी ऋ ्रेंॠी२)चा अभ्यास करून सिनेमा या कलेची प्रथम बीजे रोवली आहेत. चांदण्या बघताना आपण आलो तरी कुठून, पृथ्वी गोल का सपाट, सफरचंद वर का उडत गेलं नाही? असे प्रश्न पडले नसते तर आपल्याला स्वत:लाच आपल्या जगाबद्दल आणि त्यात असलेल्या माणूस म्हणून आपल्या स्थानाबद्दल कमीच माहिती मिळाली असती.
अनेक मोठमोठय़ा चित्रकारांनी मान्य केले आहे की स्वचित्रे (सेल्फ पोट्रेट्स) हे त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड जाते. असं का असावं? असा विचार केल्यावर वाटतं खरंच ‘मी कोण आहे’ असं स्वच्छ, स्वतंत्र नजरेनं पारखणं किती दुर्मिळ असतं – किंवा कदाचित खूप अवघड. कारण अमुक एक माझ्याबद्दल काय म्हणतो, लिहितो किंवा मी कपडे, लिपस्टिक कुठली लावली आहे यापलीकडे मी खरंच व्यक्ती म्हणून कोण आहे- माझी मतं, माझ्या भावना, माझ्यातून येणारी कधी कधी आश्चर्यकारक वाटणारी भीती, तसंच माझ्यातून येणारं असहाय प्रेम करण्याची क्षमता, कधी राग, कधी दु:ख, कधी बेदरकार आनंद हे सगळं एकत्रितपणे मला गुंडाळून कुठल्या प्रतिमेत कोंबता येईल हे अवघडच म्हणावं लागेल.
आपल्या सगळ्यांनाच ‘सेल्फी’ किती आवडते. कित्येकांनी प्राण धोक्यात टाकून सेल्फी काढण्याचे प्रयत्न केले आहेत. मला वाटतं या ‘मी’च्या शोधात अथवा आकर्षणाचाच भाग आहे. जसं काही लोक स्वत:बरोबर इन्फॅच्युएटेड असतात. काही स्वत:च्या प्रेमात मात्र काही स्वत:वर प्रेम करणारी. मला वाटतं स्वत:च्या प्रेमात असणं वेगळं आणि स्वत:वर खरंखुरं प्रेम करणं वेगळं कारण प्रेम आंधळं नसतंच! असं आपल्यावर का बिंबवलंय कुणास ठाऊक – प्रेम तर डोळे स्वच्छ उघडणारं असतं – स्वत:वर केलेलं प्रेम आपला स्वत:चा दृष्टिकोन घडवतं.
आई-बाबांनी सांगितलं म्हणून, धर्म-परंपरा आहे म्हणून केलेली गोष्ट आणि स्वत:च्या रॅशनल विचाराने स्वतंत्रपणे दुनिया पडताळून आपला मार्ग शोधणं यात वेगळा स्वत:चा आनंद असावा.
‘सेल्फीज’मधल्या आनंदातून स्व-चित्राची ओढसुद्धा जपली गेली तर स्वत:बद्दलच कुतूहल वाटत राहील आणि पर्यायाने जगाबद्दल. कारण जगाला सामोरं जाण्याचं ‘मी’ हे माध्यम नेमकं कोण आहे, कसं आहे? ‘मी’ न कुणी छोटा न मोठा. ‘मी’ अनुभवणारा.
‘लोकप्रभा’मुळे मलाही माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच असं डेडलाईन असलेलं लिखाण करण्याची वेळ माझ्यावर आली. माझी तळेगावची शाळा इंग्रजी माध्यमाची होती. खरंतर आसपास सगळेच जण मराठी बोलणारे असले, तरी आमच्या शिक्षकांना मनापासून वाटे की आमचं इंग्रजी सुधारावं. भूत मॅडम मुख्याध्यापिका झाल्या तेव्हा मराठीतून बोलणाऱ्याला पाच रुपयांचा दंड होईल अशी बहुधा अफवा पसरवली होती, कारण खरंच कुणी पाच रुपये दिल्याचं मला कधीच आठवत नाही- आणि आम्हीही थोडंफार मराठी बोलायचोच. मात्र इंग्रजीतून लिहिणं, विचार करणं, बोलणं माझ्या खूपच अंगवळणी पडून गेलं. पुढे अमेरिकेत एक वर्ष राहिल्यामुळे ते आणखी अधोरेखित झालं. ‘लोकप्रभा’मुळे मी प्रथमच माझे विचार मराठीतून मांडण्याचा प्रयत्न केला. तो करताना एक वेगळं शिक्षण आणि आनंद मिळाला. आजचा हा शेवटचा लेख. जून ते ऑगस्ट हा सुंदर पावसाळी काळ लेखन करण्यात गेला. माझ्या स्वचित्राच्या शोधावर ‘लोकप्रभा’चा खूप प्रभाव नक्की पडला. त्याबद्दल आभार!
नेहा महाजन – response.lokprabha@expressindia.com