गाणं लिहिण्याच्या प्रोसेसबद्दल मागच्या भागात लिहिलं. पण गाणं बेसिक लिहून झालं की मग त्याच्यावर खऱ्या अर्थानं संस्कार व्हायला सुरुवात होते, इथपासून गाणं रेकॉर्ड होऊन ऐकू येईपर्यंतची प्रोसेस ही गीतकारासाठी (त्यात रस घेतला तर) फार रंजक असते. गीतकार म्हणून हा माझा अनुभव. नवीन काम करणाऱ्यांना यातून माहिती कळावी, आणि कुतूहल असणाऱ्या वाचकांना त्यातून मजा यावी यासाठी हा खटाटोप.

गाणं लिहिणं आणि आपल्यालाच ते आवडणं हा गीतकारांमध्ये कॉमनली आढळणारा प्रकार आहे. खरं तर हा प्रकार सगळीकडेच आढळतो. क्रिएटिव्ह काम करणाऱ्या व्यक्तींना एका वेळेला आपण केलेलं काम हे जगातील सर्वोत्तम आहे आणि आता याच्यात काहीही बदल संभवतच नाही असं वाटत असतं. त्या आनंदातच ते झोपी जातात. सकाळी उठतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, खरं तर हे जरा सामान्यच झालंय. हे मान्य करणारे चांगलं काम करतात. किंवा सुधारणा करतात. न मान्य करणारे एखादा भाजीवाला जसं शिळ्या टोमॅटोंना पाणी मारून विकतो तशा गोष्टी विकत राहतात. पण हे करण्यात त्या क्रिएटिव्ह माणसाचं मोठं नुकसान होतं.

‘दगडी चाळ’मधल्या ‘धागा धागा’ या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली, पण जेव्हा याचे पहिले शब्द लिहिले तेव्हा ते

‘मन तुझे माझे भेटते आता,

जरी तुझी माझी भेट होईना,

येई वाऱ्यावर तुझा सांगावा,

त्याचा गंध श्वासातून जाईना!’

असे होते. या माझ्या ओळींवर भलताच खूश होऊन मी संगीतकार अमित राजला फोन केला. त्याला ऐकवलं, त्याने (नेहमीप्रमाणे) अत्यंत सरळ आणि स्पष्टपणे सांगितलं ‘भाई और अच्छा हो सकता है! सिम्पल आणि रिकॉल व्हॅल्यू असलेलं होऊ शकतं.’ याचा अर्थ हेच गाणं मोठय़ाशा स्टेजवर ते छोटय़ाशा मोबाइलवर, गाडीत किंवा घरात कुठेही ऐकू आलं तरी त्याच्या ‘हूकलाईन’मध्ये ही ताकद हवी, ज्यानं ऐकणाऱ्याला ते झटकन हूक होईल. रात्री तोच विचार        करत झोपलो आणि दुसऱ्या दिवशी परत या ओळी वाचल्या. मला गुळगुळीत वाटल्या. जुन्या वाटल्या. विचार करत करत

‘मन धागा धागा जोडते नवा,

मन धागा धागा रेशमी दुवा!’

हे लिहिलं आणि आपण जगावेगळं नाही, पण आपल्यापुरतं काही तरी नवीन लिहिलं याचा आनंद झाला.

गाण लिहून तयार होणं यानंतर त्याचं अ‍ॅक्चुअल रेकॉर्डिग होताना पाहणं यासारखं दुसरं सुख नाही. गीतकाराला ऱ्हस्व, दीर्घ, उच्चार, मीटर हे सगळं सांगण्यासाठी थांबाव लागतं, पण एखादा कसलेला गायक जेव्हा तुमच्या शब्दांना पूर्ण भाव देऊन (दोन्ही अर्थानं!) गातो तेव्हा तो आनंदाचा परमोच्च बिंदू असतो. सोनु निगमसारख्या अतिशय मोठय़ा गायकाबरोबर रेकॉर्डिग करायला गेलो असताना त्यानं सगळ्यांना बसवून मध्ये उभं राहून ते गाणं गायलं. आम्हाला प्रत्येकाला हेडफोन्स दिले आणि त्यात चाळीस मिनिटं सोनु निगमचा आवाज येत होता. तो ताना, हरकती घेत होता, शब्दांचे अर्थ विचारत होता. (सुरुवातीला त्याला पाहूनच मी गार झाल्याने अंतरा सांगायचा विसरलो तेव्हा त्यानं मला झापलंसुद्धा!) मला ते झापणंही गोंजारल्यासारखं वाटलं. असा दैवी अनुभव दहा हजार रुपयांचं कॉन्सर्टचं तिकीट काढूनही मिळाला नसता. तो मिळाला आणि आपण गीतकार आहोत याबद्दल भरून आलं.

श्रेया घोषाल, शेखर रावजी आणि शंकर महादेवन यांच्यासारख्या जुन्या जाणत्यांपासून आजच्या आघाडीच्या जसराज, आदर्श, हर्षवर्धन, आनंदी यांच्यापर्यंत प्रत्येक जणाने माझ्यातल्या गीतकाराला आणखी समृद्ध केलंय. एखाद्या कसलेल्या गायकाला तल्लीन होऊन गाताना पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. आनंद शिंदेसारख्या गायकाला ज्यानं गाताना पाहिलं तो उत्साहानं भारला गेला नाही तरच नवल. त्यांचं सगळं शरीर गाणं गात असतं! चांगला गायक हा गाण्यात अक्षरश: प्राण ओतत असतो. एखाद्या हरकतीने, एखाद्या साध्याशा पॉझने किंवा सुरावटीत केलेल्या किंचितशा बदलाने अख्ख्या गाण्याचा अर्थ आणखी चांगला झालाय याचाही अनुभव मी वारंवार घेतलाय. गीतकार होण्याचे तोटेही खूप आहेत. चोवीस तास ऑन डय़ुटीवाला जॉब आहे तो. व्यक्तिगत आयुष्याचं खोबरं होतं त्यात बऱ्याचदा. चांगली टय़ून ऐकली की आपल्याच कोशात जायला होतं आणि समोर काय चाललंय याचं भान निसटतं.

‘अरे, आजच फायनल झालं, उद्या सकाळी गाणं हवंय’ किंवा ‘आधीच्या ज्याने कुणी करीन म्हणलं त्याने ते महिनाभर केलंच नाहीये.’ या तत्त्वावर माझ्याकडे खूप सारी कामं आलीयेत आणि अ‍ॅडव्हर्टायझिंगच्या डेडलाइनची शिस्त असल्यानं मी ती सगळी वेळेत दिलीयेत. एकदा तर मला डेडलाइनमुळे काम जमणार नाही असं मी सांगितलं आणि दुसऱ्या गीतकाराचं नाव सजेस्ट केलं तेव्हा त्याने ते काम केलं नसल्यानेच माझ्याकडे आलं हे कळालं आणि मी धन्य झालो.

गीतकार असल्याचा सगळ्यात मोठा तोटा बाहेर जाणवतो. ‘आमच्या ससुल्याचं बारसं आहे, त्यासाठी छान चार ओळी लिहून दे’, इथपासून ‘दे की उखाणे लिहून तू तर लिरिसिस्ट आहेस’ (त्यातही प्रेमाने लिहून दिल्यावर अजून एखादा ऑप्शन नाही का? असंही विचारणारे असतात.) अशा असंख्य मागण्यांना मी बळी पडलो आहे. काव्यमय लग्न-मुंजपत्रिका, एकसे एक उखाणे, कवितांचे मेसेजेस या सगळ्या ऑफर्सचे आघात गीतकाराला कधीच चुकत नाहीत. पण ते सगळं अनुभवताना त्यात मजाही तितकीच येते. गीतकार म्हणून इतकंच वाटतं, मराठी संगीत गेल्या दशकात घराघरात पोचवण्यात संगीतकारांचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा गीतकारांचाही आहे. आजवरच्या सगळ्या गाजलेल्या चालीतले शब्द बदलून पाहिले तर त्या चालीचा तो इम्पॅक्ट येत नाही हे जाणवतं. ‘अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’च्या ऐवेजी ‘तुम कही भी जाओ ना, वक्त है तो बोलो ना’ असं लिहिलं असतं किंवा ‘मन उधाण वाऱ्याचे’च्या ऐवजी ‘क्षण उनाड झाले रे’ हे जर लिहिणाऱ्याने लिहिलं असतं तर गाणं तितकं चांगलं झालं असतं का? याचा विचार सगळ्यांनी करून गीतकारांना त्यांचा मान आणि धन दोन्ही वेळेवर आणि चांगलं देणं नितांत गरजेचं आहे. आज मराठीमध्ये गुरू, वैभव, अश्विनी, समीर, मंदार, मंगेश आणि असे अनेक नवे जुने गीतकार उत्तमोत्तम गाणी लिहितायत, ती गाणी लोकांना आवडतायत, त्यांचा विचार, शब्दांची निवड लोकांना आवडतीये हे खूप चांगलं चिन्ह आहे!

माझ्यासारखंच गाण्यात इमान असणाऱ्या प्रत्येकाच्या आजूबाजूला चांगले संगीतकार, गायक, गीतकार आणि गाण्यातल्या शब्दांना किंमत देणारे श्रोते आहेत याहून आणखी काय हवं? शब्दांवरचं तुमचं हेच प्रेम आमचं इमान आणखी बळकट करणार आहे हे नक्की!

(उत्तरार्ध)
क्षितिज पटवर्धन – response.lokprabha@expressindia.com