‘‘गायकांप्रमाणेच नटांचीही घराणी असतात. पी.एल., ग.दि.मा. अन् राजा परांजपे हे मास्टर विनायकांच्या घराण्यातले. त्यांच्याकडून माझ्यापर्यंत हे पोहोचलं, त्यामुळे मीही मास्टर विनायकांच्याच घराण्यातला. उत्स्फूर्तता हे या घराण्याचं वैशिष्टय़. भूमिकेत ही मंडळी सहज घुसतात. भूमिका त्यांना सांगोपांग दिसते. दरवेळी फूल नवं येतंच, पण ते तेच ते फूल नसतं. तरीही त्याची एक कंटिन्युइटी असते. ती सापडणं हे नटासाठी महत्त्वाचं. ती सहजता सापडायला हवी. या आवेगातली पी.एल.बरोबरची माझी पन्नास र्वष सुखाची गेली.’’ सांगताहेत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे.
पाखराच्या पंखात बळ आलं हे त्याच्या आई-बाबांना कसं कळतं कुणास ठाऊक? ते त्याला घरटय़ातून बाहेर ढकलून देतात. पिलू धडपडतं. पंख पसरतं. त्याच्या लक्षात येतं, की आपल्याला हवेत तरंगता येतंय. त्याचा अनुभव नेमका कसा असेल, ते सांगता यायचं नाही; पण मी रंगभूमीवर जेव्हा पंख पसरले तेव्हा त्या काही फुटांच्या मर्यादित जागेतही मला अपरिमित अवकाश मिळालं.
जन्मजात नट म्हणजे काय? तर श्रीकांत मोघे नावाच्या माणसाला त्याची व्यक्तिगत सुखदु:खं भिक्षुकाच्या पडशीतल्यासारखी बांधून ठेवता येतात अन् भूमिकेनुसार दुसऱ्याची सुखदु:खं, जी त्याला फक्त संहितेतल्या शब्दांतूनच कळलेली असतात. त्यांच्यात प्राण फुंकणं ही त्याची स्वत:ची नट म्हणून गरज असते. त्याचा त्या सगळय़ाशी संबंध असो वा नसो, पण तो पूर्णाशानं त्यात प्राण फुंकण्याचा प्रयत्न करतो आणि ती भूमिका जिवंत होते. थोडक्यात, नट त्या भूमिकेची प्राणप्रतिष्ठा करतो, या त्याच्या गुणामुळे नटाला प्रतिष्ठा लाभते.
मी जन्मानं नट होतो याचं भान बहुधा मला उशिरा आलं. माझा रंगभूमीवरचा वावर पाहणारे सांगत, की मी अत्यंत सहज असायचो/असतो. काहीजण असं म्हणतात, की रंगभूमीवर एन्ट्री करण्याआधी किंवा कॅमेऱ्याला सामोरं जाण्याआधी त्यांच्या काळजात धडधडतं वगैरे. मला हे माहीत नाही. खासगी जीवनापेक्षाही मी भूमिका साकारताना अधिक सहज असतो.
समर्थ रामदास म्हणतात, ‘रूप-लावण्य अभ्यासिता न ये.’ मला वाटतं, की हे विधान पूर्णत: खरं नाही. कारण रूप-लावण्य ही अत्यंत तौलनिक गोष्ट आहे. उदाहरणार्थ, मी जेव्हा ‘गरुडझेप’ या नाटकात छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारली, तेव्हा त्यांच्या दिसण्या-वावरण्याबाबत जे वाचलेलं होतं, त्यानुसार बाहय़रूप मला परमेश्वरकृपेनं लाभलेलं होतं. धारदार नाक, करारीपणा दर्शवणारी हनुवटी, कपाळ अन् डोळय़ांची ठेवण, त्यातले भाव हे आयतेच उपयोगाला येत होते. नुसती दाढी लावली की पुरेसं ठरणार होतं. हे अर्थातच दिसण्याबाबत.
बाळ कोल्हटकरांच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकात अलेक्झांडर करताना माझं व्यायामानं कसदार झालेलं शरीर अन् कुस्ती, मुष्टियुद्ध, धावण्याच्या शर्यतीत नियमितपणे भाग घेतल्यामुळे मिळालेलं अॅथलिटचं पोश्चर ही जमेची बाजू होती. नटाची शारीरिक गरज ही बाहय़रूपावर अवलंबून असते. मूळचा अलेक्झांडर कदाचित सहा फूट उंचीचा असेल. मी पाच फूट आठ इंच उंच होतो. म्हणजे तसा खूप जास्त फरक नव्हता. सांगायचा मुद्दा असा, की या दोन्ही भूमिकांसाठी बाहय़रूपाची असलेली गरज परमेश्वरकृपेनं आधीच भागलेली होती. ओढूनताणून चंद्रबळ आणायचा प्रश्नच नव्हता.
याउलट ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकातली माझी भूमिका अत्यंत हलकीफुलकी, मोह वाटावा अशी होती. त्यासाठी आवश्यक असणारा प्रसन्नपणा हा माझा अंगभूत गुणच होता. हे सारं लक्षात घेता, ‘मृत्युंजय’ नाटकातली दुर्योधनाची भूमिका करताना मात्र मला तिचा सूर हुडकावा लागला. विद्वेषाचा महामेरू असलेल्या दुर्योधनाच्या मानसिकतेचा शोध घ्यावा लागला. तो दाखवावा कसा, याचं मनन करावं लागलं. कधीकधी असंही होऊ शकतं, की एखादी भूमिका नटाला जशी दिसते/ भासते तशी लेखकाकडून प्रत्यक्षात कागदावर मात्र ती उतरलेली नसते. काहीतरी वेगळीच होऊन आलेली असते.
या संदर्भात मी ‘गरुडझेप’मधल्या भूमिकेचं उदाहरण आवर्जून देऊ इच्छितो. आई जिजाऊशी बोलताना शिवाजीराजांच्या तोंडी एक वाक्य येतं. ‘‘मिर्झाराजांच्या निर्घृण, अमानुष मोगली आक्रमणामुळे जगावं की मरावं, याचाच आम्ही विचार करतो आहोत.’’ शिवाजीराजांच्या कणखर प्रतिमेला तडा जाईल, ती प्रतिमा मुळापासून हादरेल असंच हे वाक्य होतं. शिवाजीराजांच्या भूमिकेसंबंधात माझी धारणा अशी होती, की सर्व दिशा अंधारून आलेल्या असतानाही, आशेचा एखादाही किरण कुठूनही नजरेस येत नाही अशी परिस्थिती असतानाही ज्याचं निडर मन त्या प्रचंड भाराखाली दबत तर नाहीच, उलट उसळी घेऊन उठतं, अशा लोकविलक्षण अन् कणखर राजाच्या तोंडी हे वाक्य येणारच कसं? हे तर हॅम्लेटचं वाक्य.
अत्यंत दारुण परिस्थितीतही ज्यानं आजच्या भाषेत आपण ‘पॉझिटिव्ह अॅप्रोच’ म्हणतो, तो आयुष्यभर जोपासला त्याचं नाव शिवाजीराजा. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही घटना. शिवाजीराजे केवळ ६०० सैनिकांनिशी शत्रूच्या प्रदेशात जवळजवळ दीड हजार मैल आतपर्यंत पोहोचले आहेत. सोबत नऊ वर्षांचा एकुलता एक युवराज. त्याच्यासह ते शत्रूच्या पंज्यात अडकले आहेत. पंचवीस हजार सैनिकांचा वेढा पडलेला. चाळीस तोफा कायम राजांच्या निवासस्थानावर रोखलेल्या. पहारेकरी अक्षरश: पशुतुल्य. अशा विपरीत परिस्थितीत राजांनी औरंगजेबाकडे अर्ज करून सोबतची ६०० माणसं महाराष्ट्राच्या दिशेनं परत पाठवली. मला वाटतं, की औरंगजेब इथंच फसला. शेलक्या माणसांनिशी आग्य्रात राहिलेल्या शिवाजीराजांना चिरडून टाकणं हा त्याला भलताच सोपा खेळ वाटला. पण ती ६०० माणसं राजांनी बहुधा परतीच्या वाटेवर पेरली असावीत. जेमतेम ३६ र्वष वयाचा तो धीरोदात्त पुरुष. त्या परिस्थितीतल्या भयानकतेला पुरून उरत शिवाजीराजांनी औरंगजेबाला गुंगारा दिला. वाटेत घोडे बदलले, पण हा स्वार अखंड प्रवास करत राहिला. पंचविसाव्या दिवशी महाराज राजगडाला पोहोचले. हे सारं त्या लिखाणात येत नव्हतं. त्यामुळे शिवाजीराजांवरचं नाटक हिंदीत मी वसंत देवांकडून लिहून घेतलं. या ‘शेर शिवाजी’चं प्रक्षेपण दूरदर्शनवरून भारतभर झालं. ‘मेकअपला बसल्यावर समोर दिसलं, हे प्रतिबिंब कुणाचं? लोक त्याला नावानं ओळखतात. मीही त्याला ओळखतो, नावापुरताच. आठवायला गेलो तर आठवतच नाही, ‘हा कोण?’ आणि ‘हा कोण’ हे जाणून घेणारा मी कोणता?’ हे सारं सोसणं असतं. हेच कलावंताला बहुतेक काही देऊन जात असतं.
‘अश्वमेध’ नाटकातला गिरीश हा इंग्लिशचा प्राध्यापक. औद्योगिकीकरणाची लाट येते. हाही त्यात सामील होतो. संप होतो. संप मिटवण्यासाठी ज्या ट्रिक्स वापरल्या जातात, त्यात एका तरुणाचा बळी दिला जातो. आदर्श, महत्त्वाकांक्षा अन् निष्पापांचा बळी असं वेधक नाटय़ गुंफलेलं होतं. त्या तरुणाचं काम लक्ष्मीकांत बेर्डेनं अतिशय अप्रतिम केलं होतं. आदर्शवाद जपणाऱ्या माणसाला परिस्थितिवश भोगावे लागणारे विरोधाभासाचे चटके या भूमिकेनं मला दाखवून दिले.
जगभर गाजलेल्या ‘फिडलर ऑन द रूफ’चं व्यंकटेश माडगूळकरांनी केलेलं ‘बिकट वाट वहिवाट’ हे नाटक मुंबईच्या ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेनं रंगभूमीवर आणलं. लंडनच्या रंगभूमीवर अॅल्फी बास यांनी आणि न्यूयॉर्कच्या रंगभूमीवर झोरो मोस्टॅल्लो हीच भूमिका चित्रपटात टोपॉल यांनी केलेली मी पाहिली होती.त्याने प्रभावित झालो होतो. ती मला इथं सई परांजपेंच्या दिग्दर्शनात करायला मिळाली. पंडित जितेंद्र अभिषेकींचं संगीत होतं. ही भूमिकाही वेळोवेळी आठवत असते. ती करता न आल्याची कळ खूपदा दाटून येते.
एका अर्थानं माझ्या व्यावसायिक करीअरच्या सुरुवातीआधीच मला माझा सूर सापडला होता. मुक्त आकाश मिळालं होतं. १९५२ मध्ये पु. ल. देशपांडे यांचं ‘अंमलदार’ रंगभूमीवर आलं. ‘इन्स्पेक्टर जनरल’ या रशियन नाटकाचं ते रूपांतर होतं. माणूस विविध मनोवस्थांमधून जात असतो. सुखाच्या, उद्ध्वस्ततेच्या, स्वत:चा शोध घेण्याच्या, स्वत:ला समजून घेण्याच्या वगैरे निरनिराळय़ा प्रक्रिया मनात चाललेल्या असतात. त्या रंगभूमीवर जगाव्यात, अशी एकाहून एक नाटकं मला मिळत गेली. त्यातलं ‘अंमलदार’ हे पहिलं. कोल्हापूरच्या इनामदाराचा हुशार पोरगा कुस्थितीमुळे, करीअर हरवल्यानं तसेच सूर न सापडल्यानं वाया गेलेला. या नाटकामुळे पी. एल.ला अॅडॉप्टेशनचा सूर सापडला अन् मला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत वाळवेकर ट्रॉफी मिळाली.
नाटकाचा ‘व्यवसाय’ न करण्याच्या त्या अद्भुत दिवसांमध्ये पी.एल.ची तशीच माझीही वाटचाल सुरू झाली. त्यानंतर सुमारे दहा र्वष मध्ये गेली. मग पी.एल.चंच ‘वाऱ्यावरची वरात’ आलं. दरम्यानच्या काळात मी दिल्लीत होतो. तो मुंबईत आलो. ‘पु. ल. देशपांडे सहकुटुंब, सहपरिवार सादर करीत आहे, ‘वाऱ्यावरची वरात.’ अशी अनाउन्समेंट व्हायची. या वेळपर्यंत माझी मात्र वाऱ्यावरची फरफट झालेली होती. ‘वरात’मध्ये मी वेगवेगळय़ा भूमिका केल्या. बदलत चाललेल्या खेडय़ाचं प्रतिनिधित्व करणारा मराठमोळा तरुण साकारत असताना अस्सल ग्रामीण बोली माझ्या तोंडी असायची. दमदारपणे ती उच्चारताना जोरदार टाळय़ांनी रंगमंदिर दणाणून जायचं. यात ‘चाचाचा’ या पाश्चात्त्य नृत्यप्रकाराचा धेडगुजरी आविष्कार मी जोरकसपणे सादर करायचो. ‘‘बाम् ऽऽऽबे’’ या माझ्या शैलीतल्या उच्चाराची नक्कल तरुणांमध्ये अहमहमिकेनं चालायची. यातलंच दुसरं पात्र मी रंगवायचो ते गाण्याचा शौकीन असलेल्या, पण बायकोच्या मुठीत सापडलेल्या नवऱ्याचं. सुनीता देशपांडे बायकोच्या भूमिकेत कानडीमिश्रित उच्चारत माझ्यावर कडाडत अन् मी काकुळतीला आल्याचं अवघ्या देहातनं दाखवायचो. धमाल यायची!
गायकांप्रमाणेच नटांचीही घराणी असतात. पी.एल., ग.दि.मा. अन् राजा परांजपे हे मास्टर विनायकांच्या घराण्यातले. त्यांच्याकडून माझ्यापर्यंत हे पोहोचलं, त्यामुळे मीही मास्टर विनायकांच्याच घराण्यातला. उत्स्फूर्तता हे या घराण्याचं वैशिष्टय़. भूमिकेत ही मंडळी सहज घुसतात. भूमिका त्यांना सांगोपांग दिसते. दरवेळी फूल नवं येतंच, पण ते तेच ते फूल नसतं. तरीही त्याची एक कंटिन्युइटी असते. ती सापडणं हे नटासाठी महत्त्वाचं. ती सहजता सापडायला हवी. या आवेगातली पी.एल.बरोबरची माझी पन्नास र्वष सुखाची गेली.
त्याच्याच ‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकात मी आधी श्याम, नंतर सतीश आणि त्यानंतर काकाजीही केला. त्याच्या इतर रूपांतरित नाटकापेक्षा हे नाटक त्याचं स्वत:चं, या अर्थानं वेगळं होतं. लेखकाचा जगाकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यातनं व्यक्त होतो. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या तेव्हाच्या कूपमंडूक वृत्तीवर बोट ठेवणारं हे नाटक होतं. फक्त स्वत:पुरतं पाहणं, खत्रूडपणा यांसारख्या गोष्टी नकळतपणे या माणसाकडून घडत होत्या. पी.एल.नं यासंबंधीची एक नवी दृष्टी हसतखेळत मराठी माणसाला दिली. यातल्या तिन्ही भूमिका मला पुरेपूर आनंद देऊन गेल्या. विजया मेहतांसोबतचं ‘एका घरात होती’ या नाटकाप्रमाणेच ‘गारंबीचा बापू’नंही मला वारंवार अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. ‘संकेत मिलनाचा’ या नाटकाचा वेगळा बाज माझ्यातल्या नटाला भरपूर आव्हान देणारा ठरला. दरवर्षी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी भेटणारे नायक-नायिका, भेटीदरम्यानच्या वर्षभरातले बदल काया-वाचेतनं दाखवणं हे सारंच माझ्यातल्या नटाला खूप खुलवणारं होतं.
चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांचं माध्यम काही वेगळं मागणारं असतं. ‘स्वामी’ ही मालिका केली तेव्हा संध्याकाळी ती प्रसारित होत असताना घरोघरी प्रेक्षक काम बाजूला ठेवून आवर्जून थांबत. ही लोकप्रियता अत्यंत सुखद वाटायची. रवींद्र मंकणी (माधवराव पेशवे), मृणाल कुलकर्णी (रमा) यांच्या सोबतीनं दया डोंगरे, चारुशीला पटवर्धन, सुधीर दळवी, बाळ कर्वे असे ताकदीचे कलावंत होते. मी राघोबादादाची भूमिका करताना ‘रिअॅक्शन’च्या तंत्राचा मनसोक्त आनंद घ्यायचो. या मालिकेचा मी सहनिर्माताही होतो.
रंगभूमीवर अजिबात करायला न मिळणारी एक गोष्ट कॅमेऱ्यासमोरच करता येते, ती म्हणजे डोळय़ांमधलं भावदर्शन. दुर्गुणांचा महामेरू, पण विलक्षण लोभसवाणा, अत्यंत पराक्रमी, प्रसंगी भावनांच्या आहारी जाणारा राघोबादादा हे पात्र प्रेक्षकांचा तिरस्कार व प्रेमही मिळवणारं. ते कॅमेऱ्यामुळे डोळय़ांमधून तऱ्हेतऱ्हेनं दाखवता आलं. थिएटरचं वैशिष्टय़ म्हणजे त्या त्या भूमिकेचं सबंध आयुष्य सलग जगायला मिळतं. याउलट चित्रपटात ते जगणं तुकडय़ातुकडय़ानं येतं. मालिकेत तर अधिकच तुकडय़ांमधून, त्यामुळे या प्रत्येक माध्यमासाठी नटाचा अगदी वेगळय़ा पद्धतीचा कस लागतो. ही सारी आव्हानं मी मनापासून घेतली आणि अक्षरश: मनमुराद ती जगलो.
(शब्दांकन : नीला शर्मा)
neela5sharma@gmail.com
‘चतुरंग मैफल’ मध्ये
पुढील शनिवारी (१४ सप्टेंबर)
सुप्रसिद्ध लेखिका-दिग्दर्शिका
प्रतिमा कुलकर्णी
रंगभूमीचं अपरिमित अवकाश
पाखराच्या पंखात बळ आलं हे त्याच्या आई-बाबांना कसं कळतं कुणास ठाऊक? ते त्याला घरटय़ातून बाहेर ढकलून देतात.
आणखी वाचा
First published on: 07-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shrikant moghe