10-valsaप्रभा पुरोहित, अलका चाफेकर व सुनीता ओक या तिघी अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेऊन विविध उपक्रमांद्वारे लढू लागल्या. यासाठी शिबिरं घेणं, वर्तमानपत्र-नियतकालिकातून लेख लिहिणं, व्याख्यानं देणं, मोर्चे काढणं अशा विविध माध्यमांतून त्यांचं काम मोठय़ा धडाडीने सुरू आहे.

विद्यार्थी व शिक्षक यांनी खचाखच भरलेलं मुंबईतल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयाचं सभागृह.. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अं.नि.स.) कार्यकर्ते आज कोणते चमत्कार दाखवणार याची प्रत्येक चेहऱ्यावर उत्सुकता.. गेल्या क्षणी आम्ही एक पांढरी चादर पडदा म्हणून स्टेजच्या भिंतीशी बांधली आणि आवश्यक त्या जोडण्या केल्यावर पडद्यावर नाव झळकलं ‘लिंबू’. पुढचं दृश्य.. फूटपाथवरील एका झाडाखाली थकून बसलेला तिशी-पस्तिशीतला तरुण.. फाटके कपडे अन् आशाळभूत भकास नजर.. इतक्यात त्याच्या शेजारी कोणीतरी आपली मोटरबाईक पार्क करतं. त्या बाईकला लटकणाऱ्या लिंबू-मिरचीवर त्याची नजर.. बाजूलाच कोणी तरी पाणी अर्धवट पिऊन फेकून दिलेली बाटली.. त्याचा हात लिंबाकडे.. कोणीसं हटकल्याने पुन्हा मागे.. शेवटी धीर करून इकडे तिकडे बघत तो ते लिंबू तोडतोच.. मग ते लिंबू दातांनी चावून त्याचा रस बाटलीतल्या पाण्यात पिळून, ते लिंबूपाणी घटाघटा प्याल्यावर उजळलेला त्याचा चेहरा.. बास, एवढंच. जेमतेम ५-६ मिनिटांची ती चित्रफीत. एकही संवाद नसलेली. शेवटी एका लिंबू मिरचीच्या झुपक्याशेजारी एकच वाक्य use nature for what it is. (अभिषेक करंगुटकर या तरुण मुलाने केलेली ही फिल्म ‘यू टय़ूब’वरही उपलब्ध आहे) या छोटय़ाशा चित्रफितीचा तात्काळ परिणाम म्हणजे त्यानंतरच्या चर्चासत्रात मुलांकडून आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे ‘यापुढे लिंबू-मिरची विकणारा समोर आला की तो तहानलेला माणूस आमच्या नजरेसमोर येईल..’ आमचा हेतू सफल झाला होता. तिथे जमलेल्या शे-दीडशे जणांपैकी कोणाचाही हात यापुढे लिंबू-मिरचीचा झुपका घेण्यासाठी पुढे येणार नव्हता.. प्रभा पुरोहित, अलका चाफेकर व सुनीता ओक या अं.नि.स.च्या कार्यकर्त्यां आपला अनुभव सांगत होत्या. त्या म्हणाल्या, की बोईसरमधील अण्णा कडलासकर व अनिल करवीर या आमच्या तरुण कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आता त्या शहरातील रिक्षा-चालक संघटनेनेच लिंबू-मिरची न बांधण्याचा निर्धार केलाय.
अंधश्रद्धेचं ग्रहण सुटावं या एकाच ध्यासाने प्रेरित झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तालमीत तयार झालेल्या या तिघी. तिघीही शिक्षकी पेशातल्या, तिघींचंही अवघे पाऊणशे वयमान. निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना त्यांना डॉ. दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून ‘बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया’ ही त्यांची जीवनप्रणाली बनली. म्हणूनच गेली १५ वर्षे त्या आपल्या सहकाऱ्यांसमवेत अंधश्रद्धारूपी मनामनांतील अंधार दूर व्हावा, यासाठी जिवाचं रान करत आहेत. शाळा-कॉलेजातील मुलं व शिक्षक यांच्यासाठी शिबिरं घेणं, वर्तमानपत्र-नियतकालिकातून लेख लिहिणं, व्याख्यानं देणं, मोर्चे काढणं.. अशा विविध माध्यमांतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार करण्याचं त्यांचं काम मोठय़ा धडाडीने सुरू आहे.
या तिघींमधील प्रभा पुरोहित या भवन्स कॉलेजमध्ये ३५ र्वषे गणित शिकवून विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या तर अलका चाफेकर व सुनीता ओक यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यात आयुष्य खर्ची घातलेलं. साहजिकच कोणताही विषय समजून देण्याची हातोटी तिघींकडेही होती आहे. त्याचा उपयोग करत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. शाळा-कॉलेजातील मुलं व शिक्षक यांच्यासाठी शिबिरं घेणं, वर्तमानपत्र-नियतकालिकांतून लेख लिहिणं, व्याख्यानं देणं, मोर्चे काढणं.. अशा विविध माध्यमांतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार करण्याचं त्यांचं काम मोठय़ा धडाडीने सुरू आहे.
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प हा त्यापैकी एक. यामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्वयंअध्ययन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढण्याची जबाबदारी मुंबई शहरात मुख्यत्वे प्रभाताईंच्या खांद्यावर आहे. १०० मार्काच्या बहुतांशी पद्धतीच्या या प्रश्नपत्रिकेचा विशेष म्हणजे ती घरी नेऊन कोणालाही विचारून अथवा संदर्भग्रंथ पडताळून लिहायची असते. जेणेकरून त्यातील विचार सर्वांपर्यंत पोहचावेत. सुनीताताई म्हणाल्या, की होळी, वटपौर्णिमा, गणपती.. आदी सण साजरा करण्याच्या पद्धतीत काही बदल सुचवा, या प्रश्नाच्या उत्तरातून मुलांकडून छान छान कल्पना आल्या. उदा. पानाफुलांचा गणपती, निर्माल्याचं खत आदी. एका मुलाने तर कागदाच्या मधोमध एका झाडाचं चित्र काढलं आणि त्यावर माझ्याऐवजी यांची होळी करा, असं लिहून त्यांच्या चहूबाजूला आळस, व्यसन, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, अंधश्रद्धा.. अशा शत्रूंना अधोरेखित केलं.
त्या विज्ञाननिष्ठ प्रश्नपत्रिका पाहताना मला वाटलं की हे प्रश्न मुलांनीच नव्हे तर तुम्ही-आम्ही सर्वानीच सोडवायला हवेत. सोडवताना स्वत:चे विचार पुन्हा एकदा पडताळून पाहायला हवेत. अलकाताई म्हणाल्या, मुलांना प्रमाणपत्र देताना आम्ही जाहीर कार्यक्रम करतो. त्या वेळी चमत्कारामागचं विज्ञान दाखवणारे प्रयोग करतो. त्यापाठचं विज्ञान समजावून सांगतो. प्रमाणपत्रांवर वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर या शास्त्रज्ञांच्या सहय़ा असतात. आत्तापर्यंत मुंबईतील ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घेतलाय. एवढंच नव्हे तर अं.नि.स.तर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या शिबिरातही हजारो गुरुजनांनी सहभाग दिलाय.
प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान हासुद्धा त्यांचा एक पर्यावरणरक्षक उपक्रम. त्यासाठी शाळाशाळांतून फिरून, विद्यार्थ्यांना फटाक्यामुळे होणारी हानी समजावून त्यांच्याकडून संकल्पपत्र (फटाक्यांच्या पैशात दुसऱ्याला उपयोगी वस्तूची खरेदी करीन किंवा ते पैसे गरजूंना देईन.. अशा अर्थाचं) लिहून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याचं काम या तिघी गेली सात-आठ वर्षे नेटाने करत आहेत. या जनजागरणाचा परिणाम आता उपनगरांमध्ये चांगलाच जाणवू लागला आहे.
विज्ञान, निर्भयता व नीती यावर आधारलेली त्यांच्या कार्याची चतु:सूत्री प्रभाताईंनी सांगितली ती अशी- यातील पहिलं कलम म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. यात स्वयंअध्यापन प्रकल्प व चमत्कारापाठचं विज्ञान हे भाग येतात. दुसरं सूत्र म्हणजे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांविरुद्ध लढा. यात बुवाबाजी, भानामती, करणी, चेटूक, जटा निर्मूलन याविरुद्धची लढाई तर आहेच, शिवाय देवळापर्यंत अनवाणी चालणं, विशिष्ट देवाच्या दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभं राहणं, संगणक वापरण्याआधी त्याच्यासमोर नारळ फोडणं या शहरी भागातील वेगळय़ा प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सुसंवादाच्या मार्गाने प्रयत्न करत राहणंही आहे. धर्माची विधायक चिकित्सा या तिसऱ्या सूत्रामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, होळीत टाकल्या जाणाऱ्या पोळय़ा गोळा करून गरिबांना वाटणं इत्यादींचा समावेश होतो. ‘होळी लहान करा व पुरणपोळी दान करा’ ही यांची या वेळची घोषणा. परिवर्तनाच्या इतर चळवळी या शेवटच्या कलमांतर्गत संविधान बांधीलकी महोत्सव हा २६ जानेवारीला ठिकठिकाणी वेगळेपणाने साजरा केला जाणारा अं.नि.स.चा एक अभिनय उपक्रम. अलकाताई म्हणाल्या, ‘या दिवशी एखाद्या गावात सभा भरवून नव्या दृष्टिकोनातून घटनेचा अर्थ सांगायचा व त्यानंतर एका वृद्ध दलित स्त्रीच्या हस्ते झेडावंदन करायचं, हा आमचा गेल्या १०-१२ वर्षांचा शिरस्ता. याशिवाय १ डिसेंबरला आंतरजातीय/ आंतरधर्मीय जोडप्यांचा व अल्पसंख्याक शिक्षित महिलांचा अनुभवकथनाचा कार्यक्रम व त्यांचे सत्कार तसंच ३१ डिसेंबरच्या रात्री, ‘खाणार नाही गुटखा, पिणार नाही बीअर, हॅपी न्यू इयर’ अशा घोषणा देत काढली जाणारी मशाल यात्रा या उपक्रमात आमच्याबरोबर अनेक कार्यकर्ते व जागरूक नागरिकही उत्साहाने सहभागी होतात. त्यांनी या वेळी असंही सांगितलं की लातूरला राहणारे त्यांचे राज्य संघटन समितीचे कार्यवाह माधव बागवे यांनी तर जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक विवाहप्रणालीनुसार जातीबाहेरील तरुण-तरुणींची अनेक लग्नं, मंत्रौच्चारणाशिवाय लावून दिली आहेत. कमीत कमी पैशात रीतसर नोंदणी करून संपन्न होणाऱ्या या विवाहानंतर त्यांनी ‘सौख्य भरे नांदावे’ यासाठी पाठपुरावाही केला जातो. प्रभाताई म्हणाल्या की, दर गुरुवारी गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे आमच्या केंद्राची बैठक होते तर राज्य कार्यकारिणीची मीटिंग दर ३ महिन्यांनी असते. मीटिंग कशी घ्यावी याचा एक ढाचाच डॉ. दाभोलकरांनी ठरवून दिलाय. चळवळीच्या गीताने सुरुवात.. एक तरी नवा चमत्कार तो देखील वेगवेगळय़ा कार्यकर्त्यांनी सादर करायचा.. विचार करायला भाग पाडणारा किमान एक तरी मुद्दा मांडायचा.. वृत्तपत्रांमधील अंधश्रद्धाविषयक बातमीवर चर्चा आणि पुढील कामांची आखणी.. प्रभाताईंनी सांगितलं की त्यांच्या अघोषित हेल्पलाइनचं काम एवढं वाढलंय की महिन्यातूनच एक तरी केस त्यांना शोधत बैठकीच्या जागेवर पोहचते. वानगीदाखल दोन उदाहरणंही त्यांनी दिली ती अशी..
खाप पंचायत आणि त्यांचे अजब किस्से ही फक्त उत्तर भारताची मक्तेदारी राहिलेली नाही. मुंबईतील जोगश्वरी परिसरात राहणाऱ्या वैदू समाजातील दुर्गा व गोविंदी या दोन बहिणीही या पंचायतीची शिकार होता होता वाचल्या. या कार्यकर्त्यां पाठीशी उभ्या राहिल्याने न केलेल्या चुकीच्या शिक्षेविरुद्ध त्या लढू शकल्या. मुलींचं धैर्य पाहून खाप पंचायतही नेमली आणि त्यांनी स्वत:मध्ये बदल करायचं ठरवून आपल्या वैदू खाप पंचायतचं नामकरण वैदू विकास परिषद असं केलं. त्याबद्दल अं.नि.स.च्या व्यासपीठावर पंचायतीच्या मुखियांचा सत्कारही करण्यात आला.
दुसरी हकिगत पाल्र्याच्या एका सुशिक्षित घरातली. या घरातील अनेक वस्तूंना अचानक मानवी विष्ठा लागलेली दिसू लागल्यावर हा भानामतीचा तर प्रकार नव्हे, या विचाराने गर्भगळित झालेल्या त्या कुटुंबातील आजी कुणीसं सुचवलं म्हणून प्रभाताईंकडे आल्या. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादातून प्रभाताईंनी अंदाज बांधला की काही प्रासंगिक कारणाने दुर्लक्षिले गेलेल्या त्यांच्या नऊ-दहा वर्षांच्या नातवाने लक्ष वेधून घेण्यासाठी केलेलं हे कृत्य असणार आणि पुढे तीच गोष्ट खरी निघाली. नंतर त्या मुलाला मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरजही प्रभाताईंनी त्याच्या आजीला पटवून दिली. ‘वेदना जाणवायला वाढवू संवेदना,’ हा कवी वसंत बापटांचा मंत्र या महिलांनी कृतीत उतरवलाय.
अंधश्रद्धांवर आघात करताना डॉ. दाभोलकर कायम संतांनी, समाजसुधारकांनी त्या त्या अंधश्रद्धेवर चढवलेले हल्ले आधी सांगत आणि मगच आपले विचार मांडत. सुनीताताई भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात निवेदन करताना हाच मार्ग खुबीने अवलंबतात. किंबहुना संधी मिळेल तिथे अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रसार हेच त्याचं ध्येय बनलंय. रिक्षात बसलं की त्याच्या तोंडातील गुटखा, तंबाखूपासून होणाऱ्या दुष्परिणामांची टेप लावायची.. पोटाला चिमटा काढून नवस फेडणाऱ्या कामवालीला तिच्या पोटात शिरून समजवायचं.. असा त्यांचा ज्ञानयोग २४ तास सुरू असतो. नाटय़रूपात सादरीकरण केलं की मात्रा अचूक लागू पडते म्हणून स्त्रीभ्रूण हत्या, कळतंय पण वळत नाही.. निर्णय तिचा स्वत:चा असे स्वलिखित प्रयोगही त्या जागोजाग करत असतात.
या तिघी स्वत: देवपूजा करत नाहीत पण पूजा करू नका, असं कोणालाही सांगत नाहीत. उपासनेचं स्वातंत्र्य त्यांना मान्य आहे. समतेचा मार्ग ममतेच्या वाटेने जातो यावर त्यांचा विश्वास आहे. पांढऱ्या केसांच्या पण हिरव्या मनांच्या बंधूभगिनींना या ज्येष्ठ महिलांचं सांगणं आहे की विद्यार्थी व तरुणांमध्ये काम करताना खूप समाधान व आनंद मिळते. एक वेगळंच समाजभान येतं. रिकामपण, एकटेपण दूर दूर पळतं. तेव्हा तुम्हीही पुढे या. आपण सगळे मिळून हा जगन्नाथाचा रथ ओढूया. चळवळ जोमाने पुढे नेऊया.

Story img Loader