अमृता सुभाष
सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नुकतेच (१९ एप्रिल) निधन झाले. समाजभान आणि माणसाच्या मनोव्यापाराबद्दल वाटणाऱ्या प्रचंड कुतुहलातून त्यांनी वेगळ्या वाटेवरचे चित्रपट दिले. त्यांच्या नायिकांनी त्यांना वाहिलेली ही आदरांजली..
एकाच वेळी पूर्ण उद्ध्वस्त आणि पूर्ण ताकदवान असं दोन्ही वाटू शकतं का.. हो शकतं. कारण आताच्या घडीला मला तसं वाटतं आहे. सुमित्रा मावशी गेली. खूप जवळचं माणूस जातं तेव्हा ती बातमी माझ्या मेंदूपर्यंत लवकर पोहोचतच नाही. बाबा गेले तेव्हाही असंच झालं होतं. आताही परस्परविरोधी असं किती काय काय आत चालू आहे. तिच्या व्यक्तिरेखांसारखं..
तिनं लिहिलेल्या. काही मी केलेल्या, काही इतर कुणी.. पण तिनं लिहिलेल्या व्यक्तिरेखा साकारताना ती एक करायची नेहमी. शॉट चालू असताना माईकवरून सूचना देत असायची. काही वेळा ती व्यक्तिरेखा इतक्या कशा कशामधून जात असायची, की ती या प्रसंगामध्ये नेमकं कसं वागेल याविषयी माझ्या मनात अनेक प्रश्न उभे असायचे. काही वेळा मी न सांगताच तिच्या बरोबरीनं दिग्दर्शन करणाऱ्या सुनील सुकथनकरला माझे प्रश्नांकित डोळे दिसायचे. मग तो हळूच जवळ येऊन विचारायचा, ‘घेऊ या नं शॉट?’ मग मी माझी शंका त्याला विचारताच कधी तो उत्तर द्यायचा किंवा कधी मावशीला विचारायचा. कधी कधी प्रसंग चित्रित व्हायला लागायचा आणि एखाद्या ठिकाणी मला दिग्मूढ व्हायला झालं, तर माईकवर मावशीचा शांत आवाज यायला लागायचा. ती अचानक एखादी अनोखी सूचना देऊन जायची आणि त्यानं ती व्यक्तिरेखा वेगळीच होऊन जायची. मला आठवतं, ‘अस्तु’चं चित्रीकरण चालू होतं. मोहन आगाशे त्यात अल्झायमर झालेल्या अप्पांची भूमिका साकारत होते. ते वाट चुकतात आणि माझ्या- म्हणजे चन्नम्माच्या घरी येऊन पोहोचतात. चन्नम्मा ही एका माहुताची बायको. अशिक्षित. कन्नड. तिला अल्झायमर म्हणजे काय ते माहीत नाही. पण या माणसाचं पोर झालं आहे एवढं तिला समजतं. पण तीसुद्धा गरीब आहे. त्यामुळे सुरुवातीला अप्पांना बघून तिच्या मनात संमिश्र भावना आहेत. शंका, काळजी, यांची सरमिसळ. तरी ती त्यांचं ताट वाढते. त्यांच्यासमोर ठेवते आणि कुतूहलानं त्यांच्याकडे पाहात राहाते या प्रसंगाचं चित्रीकरण चालू होतं. मी कुतूहलानं त्यांच्याकडे पाहात होते तरी मावशी शॉट कट करेना. मी अप्पांकडे पाहातच राहिले. ते स्वत:शी काही तरी बोलत होते. मला त्यांची ती अवस्था पाहून भरून यायला लागलं. ते पाहून सुमित्रा मावशी एकदम माईकवर म्हणाली, ‘‘आता नाक वाकडं करून सुर्रकन वर ओढ आणि फ्रेमबाहेर जा झटकन. मी तसं केलं आणि चन्नम्मा काही तरी वेगळीच होऊन गेली त्यामुळे. तिला भरून आलं, पण तिनं पटकन रडू नाही दिलं स्वत:ला.. मावशी सांगायची, ‘‘या बायकांचं जगणं इतकं अवघड असतं, की त्यांच्यामध्ये एक खंबीरपणा जात्याच असतो. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी भिडल्या तरी लगेच त्या रडत नाहीत, कित्येकदा त्यांचे चेहरेपण आतली आंदोलनं चेहऱ्यावर पूर्ण दाखवत नाहीत. कधी कधी तर अजिबात दाखवत नाहीत, ढिम्म राहातात. त्यामुळे चन्नम्माचा चेहरा तू शक्यतो ढिम्म ठेव..’’ रडणं आवरताना बायका बऱ्याचदा नाक सुर्रकन वर ओढतात. त्यामुळे मावशीनं सांगितलेल्या त्या नाक ओढण्यानं तिचं रडणं आवरणं दिसतं आणि तिच्या झटकन फ्रेमबाहेर जाण्यानं ‘मी स्वत:ला रडू देणार नाही’ हा तिचा निर्णय अजूनच ठामपणे दिसल्यासारखा होतो. त्या थोडय़ाशा फणकाऱ्यानं चन्नम्मा एका वेगळ्या तऱ्हेनं खंबीर वाटून जाते.
तशीच अजून एक प्रतिक्रिया आठवते चन्नम्माची. शेवटी वाट चुकलेल्या अप्पांची मुलगी त्यांना न्यायला येते आणि अप्पा तिच्याबरोबर परत त्यांच्या घरी जायला निघतात, तेव्हा चन्नम्मा त्यांच्या रोगाचं, ‘अल्झायमर’चं वर्णन तिच्या शब्दात करते, ‘‘द्येव झालाय त्येंचा.. सगळं सार्कच (सारखंच) दिसतंय त्येन्ला.’’ आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून ती त्यांचा निरोप घेते. जी त्यांच्यासाठी इतकं करते ती निघताना त्यांच्या पायावर डोकं ठेवते. हे मला कधीच सुचलं नसतं. हे मावशीचं. तिचं पाया पडणं मला समजावताना ती म्हणाली होती, ‘‘अप्पांसारखा विद्वान माणूस काही दिवस चन्नम्माच्या घरी राहिला याचं तिला अप्रूप वाटतं. ती त्यांच्याकडे पेशंट म्हणून पाहातच नाही..’’ हे सगळं मावशीला आपसूक सुचायचं याचं कारण तिची जगण्याकडे पाहाण्याची दृष्टी. ती या क्षेत्रात येण्याआधी तिनं सामाजिक क्षेत्रात फार मोलाचं काम केलं होतं आणि त्या वेळी तिनं अशा अनेक जणींना फार जवळून पाहिलं होतं. त्यामुळे त्या सगळ्या जणी तिला खोलवर माहीत होत्या. तिच्या आत एक फार ताकदवान स्त्री होती. त्यामुळे तिला इतर अनेक जणींमधली ताकद पाहाता आणि मांडता आली. तिनं ती तिच्या व्यक्तिरेखांमधून मांडल्यानं माझ्यासारख्या अनेक अभिनेत्रींना ती अनुभवता आली आणि प्रेक्षकांमधल्या लाखो जणींना ती आपलीशी करता आली.
मावशीची ही शांत ताकद ती आपल्या सर्वाना भरभरून देऊन गेली आहे. आम्ही गावामधून चित्रीकरण करत असताना अचानक समोर एखादं संकट उभं ठाकायचं आणि वाटायचं, संपलं सारं. थांबली ही फिल्म. पण जितकं मोठं संकट, तितका शांत आणि ठाम आवाज लावून मावशी बोलायची आणि मार्ग काढायची. सगळं काही उद्ध्वस्त होत आहे असं वाटत असताना तिची ती शांत शक्ती पाहून मी कित्येकदा स्तिमित झाली आहे. मी फार लहान असताना ती माझ्या आयुष्यात आली. माझं या क्षेत्रातलं पदार्पण तिच्या आणि सुनीलच्या ‘चाकोरी’ या लघुपटातनं झालं. त्यामुळे त्या नकळत्या वयापासून ऐकलेला तिचा तो शांत आवाज माझ्या आत जाऊन बसला आहे जणू. आणि आता सगळं संपलं, असं वाटत असताना ती माईकवरून द्यायची तशा शांत आवाजात तिच्या सूचना माझ्या आतून ऐकू आल्यासारख्या ऐकू येत आहेत मला. आणि त्या सूचना ऐकून, तिच्या व्यक्तिरेखेसारखी, उद्ध्वस्त वाटत असतानाही मी ताकदवान उभी आहे!