शूचू चेनच्या दातृत्वाचा आलेख विस्मयजनक आहे. वडील निवर्तल्यावर तिनं ‘फो-ग्वांग बुद्धिस्ट अ‍ॅकॅडेमी’ला दहा लाख तैवान-डॉलर्सची देणगी दिली. गरीब मुलांना शिकता यावं, यासाठी तिच्या प्राथमिक शाळेला जेन-आय एलिमेंटरी स्कूलला दहा लाख तैवान डॉलर्स प्रदान केले. आणखी पंचेचाळीस लाख तैवान-डॉलर्सची देणगी देऊन स्वत:चं उत्तम वाचनालय स्थापन करायला सांगितलं. त्याखेरीज तीन अनाथ मुलांसाठी ती दरसाल छत्तीस हजार तैवान डॉलर्स देत असते. एक साधीसुधी भाजी-विक्रेती इतका पैसा कसा शिल्लक राखू शकली, या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणते, ‘‘मला फक्त काम आणि झोपण्यापुरती जागा गरजेची वाटते. त्याखेरीज अन्य सर्व गोष्टी म्हणजे माझ्या लेखी चैनबाजी असते!’’

ही थक्क करणारी सत्य कहाणी आहे. तैतुंग या पूर्व तैवानमधील गावातल्या एका सर्वसामान्य भाजी विक्रेतीची. एकसष्ट वर्षांची ही कष्टाळू स्त्री पहाटे तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भाजी बाजारातील तिच्या भाजीच्या ठेल्यावर राबत असते. अत्यंत साधेपणानं राहून, तिच्या बेताच्या आमदनीतून तिनं खूप पैसा शिल्लक टाकला आणि जवळजवळ सर्व शिल्लक तिनं गरजूंना दान करून टाकली. तिनं आजवर वेगवेगळ्या परोपकारी कार्यांसाठी विविध संस्थांना तीन लाख बावीस हजार अमेरिकी डॉलर्स (सत्तर लाख तैवानीज डॉलर्स) देणगी स्वरूपात दिले आहेत. त्याखेरीज गेल्या दहा वर्षांत तिनं तीन अनाथ मुलांची जबाबदारी उचलली आहे आणि दर वर्षी ती त्यांच्या पालनपोषणासाठी छत्तीस हजार तैवान डॉलर्सची देणगी देत आहे. स्वत: अत्यंत साधेपणानं राहून इतकं दातृत्व करणारी शू चू चेन ही अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख स्त्री आहे.
आजूबाजूला कॅमेरे आणि पत्रकारांचा ताफा असतानाच देणगीचा चेक देऊन प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांच्या तुलनेत, शू चू चेनचं शांत आणि विनम्र दातृत्व तिच्या मनाचा खराखुरा मोठेपणा सिद्ध करतं. परंतु हे सारं तिनं साध्य तरी कसं केलं, असा आपल्याला प्रश्न पडतो. हिचा जन्म झाला १९५१ साली. तिचे वडीलसुद्धा भाजी विक्रेते होते. घरातली आठ माणसं त्यांच्या मोजक्या आमदनीवर अवलंबून होती. तिनं प्राथमिक शाळेतलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच सुमाराला तिची आई डिस्टॉशिआ या आजाराला बळी पडली. प्रसूतीच्या वेळेस मूल आडवं आलेलं असताना आवश्यक त्या शस्त्रक्रियेसाठी अवघे पाच हजार तैवान डॉलर्स (दीडशे अमेरिकी डॉलर्स) या कुटुंबाला उभे करता आले नाहीत आणि त्यामुळे तिच्या आईला मृत्यूला सामोरं जावं लागलं. तिनं भाजीविक्रीची जबाबदारी पेलून वडिलांना हातभार लावण्यासाठी शालेय शिक्षणाला रामराम ठोकला. तिचा सर्वात लहान भाऊ १९६९ साली गंभीर फ्लूला बळी पडला. वैद्यकीय उपचारांसाठी त्याला जेन आय प्राथमिक शाळेनं आर्थिक मदत पुरवली असूनही तो वाचू शकला नाही. शू चू चेननं आर्थिक जबाबदारी पेलली आणि तिच्या मोठय़ा भावाला कॉलेजचं शिक्षण दिलं. कौटुंबिक जबाबदारी स्वीकारून ती आजन्म अविवाहित राहिली. तिच्या पाठचा आणखी एक भाऊ काही दिवसांनी अपघातात निवर्तला. अशा दु:खद घटनांमुळे तिचं मन इतके कडवट बनलं की तिला आयुष्याचाच उबग आला. मानसिक यातना विसरण्यासाठी तिने सारा वेळ कामाला जुंपून घेतलं. समाज अत्यंत क्रूर आणि दुष्ट आहे असं तिला त्या वेळेस वाटत होतं. तिनं बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर तिची ही नकारात्मक मानसिकता बदलली आणि दु:खद भूतकाळ विसरून मन:शांती मिळवण्यात तिला यश लाभलं. अनेक दशकं भाजी विकण्याचं काम केल्यानंतर तिनं स्वत:साठी एक लहानसं घर विकत घेतलं, पण तरीसुद्धा तिची राहणी अत्यंत साधी आहे. तिचा दिवसाचा खर्च शंभर तैवान डॉलर्सपेक्षा (१८० रुपये) कमीच आहे. बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून ती शाकाहारी बनली आहे.
 ती वीस वर्षांची होती, तेव्हा एका ज्योतिष्यानं भविष्य वर्तवलं होतं की, विवाहानंतर तिला तीन पुत्रांची प्राप्ती होईल. गाठीशी थोडा पैसा आल्यावर तिनं जेव्हा घर विकत घेतलं, तेव्हा तिनं त्यातल्या तीन खोल्या मुलांच्या खोल्याप्रमाणे सजवल्या, कारण आनंदी प्रेमळ कुटुंब असावं असं तिचं स्वप्न होतं. ती या तीन खोल्यांमध्ये कुणालाही प्रवेश करू देत नव्हती. ती म्हणत असे. त्या खोल्यांमध्ये माझ्या भंगलेल्या स्वप्नांचे तुटके अवशेष आहेत. परंतु या विषादातून ती आता बाहेर पडू शकलीय. इतर गरजूंना मदत करून तिनं आनंद आणि मन:शांती मिळवली आहे. तीन अनाथ मुलांची पालनपोषणाची जबाबदारी उचलून तिनं मातृत्वाचं समाधानसुद्धा मिळवलंय.
 तिच्या दातृत्वाचा आलेख विस्मयजनक आहे. १९९३ साली तिचे वडील निवर्तल्यावर तिनं ‘फो-ग्वांग बुद्धिस्ट अ‍ॅकॅडेमी’ला दहा लाख तैवान डॉलर्सची देणगी दिली. १९९७ साली तिनं तिच्या प्राथमिक शाळेला जेन-आय एलिमेंटरी स्कूलला दहा लक्ष तैवान डॉलर्स प्रदान केले. गरीब मुलांना शिकता यावं, हा तिचा या देणगीमागचा हेतू होता. गरिबीमुळे तिला बालपणी शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे शक्य तेवढय़ा मुलांना उत्तम शिक्षण घेता यावं अशी तिची प्रांजळ इच्छा आहे. त्यासाठी तिनं जेन-आय एलिमेंटरी स्कूलला पंचेचाळीस लाख तैवान डॉलर्सची देणगी देऊन स्वत:चं उत्तम वाचनालय स्थापन करायला सांगितलं आहे. त्याखेरीज तीन अनाथ मुलांसाठी ती दरसाल छत्तीस हजार तैवान डॉलर्स देत आहेच. ‘‘गरजूंवर खर्च केला, तरच पैसा सत्कारणी लागतो आणि इतरांना मदत करता आली, तरच मला खराखुरा आनंद लाभतो,’’ असं ती म्हणते. २०१० साली, ‘टाइम’ नियतकालिकानं त्या वर्षीच्या शंभर असाधारण महिलांमध्ये तिचा गौरवपूर्ण समावेश केला. त्यानिमित्ताने अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभात सहभाग घेण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. परंतु तैवानचे अध्यक्ष, मा थिंग जेऊ यांनी तिला या समारंभात उपस्थित राहण्याचा आग्रह केला आणि सरकार तिला हा प्रवासखर्च देईल, असं जाहीर केलं. ‘‘तू अमेरिकेला जाऊन आपलं पारितोषिक स्वत: स्वीकारलं पाहिजेस आणि तैवान देशाची कीर्ती वाढवली पाहिजेस,’’ असा त्यांनी आग्रह धरला. तैवानचे अध्यक्ष पत्रकारांपुढे म्हणाले, ‘‘शू-चू चेनची कहाणी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. पूर्ण तैवान देश तिचा अभिमान बाळगतोय. तैवानचे लोक विशाल हृदयी असतात, हे तिनं संपूर्ण जगाला दाखवून दिलंय.’’
या आग्रहाने ती ५ एप्रिल २०१२ रोजी अमेरिकेत पोचली आणि तिनं मॅनहॅटनमधील टाइम वॉर्नर सेंटरमध्ये समारंभाला उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला. ३१ ऑगस्ट २०१२ रोजी तिला रॅमोन मॅगसेसे पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्या पुरस्कारात मिळालेली पन्नास हजार अमेरिकी डॉलर्सची संपूर्ण रक्कम तिनं तैतुंग गावातील मा-जी रुग्णालयाला दान करून टाकली.
या अत्यंत निलरेभी, दातृत्ववान आणि साध्या स्त्रीच्या अलौकिक परोपकाराचा जगाला परिचय करून देण्यासाठी, युंग ची लिऊ या मुक्त लेखकानं तिचं चरित्र शब्दबद्ध केलं आहे. लेखकानं जवळजवळ सहा महिने तिची कसून मुलाखत घेतली. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला तैवानचे अध्यक्ष मा, तिच्या परगण्याचे न्यायाधीश आणि अनेक अन्य मान्यवरांनी आणि पंडितांनी उपस्थिती लावली. लेखकानं या चरित्रात म्हटलंय, ‘‘ती अत्यंत साधेपणानं जगते आणि दिवसातून फक्त एकदाच जेवते. इतरांना मदत केल्यामुळेच तिला खरंखुरं आंतरिक समाधान लाभतं. त्या दृष्टीनं ती अत्यंत तृप्त आणि समाधानी आहे.’’
एक साधीसुधी भाजी विक्रेती इतका पैसा कसा शिल्लक राखू शकली, या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणते, ‘‘फक्त गरजेपुरताच खर्च करा, म्हणजे तुम्ही खूप पैसे शिल्लक टाकू शकाल. मला फक्त काम आणि झोपायपुरती जागा गरजेची वाटते. त्याखेरीज अन्य सर्व गोष्टी म्हणजे माझ्या लेखी चैनबाजी असते!’’
संपूर्ण आशिया खंडात तिचं दातृत्व आख्यायिका रूपात पसरलं आहे. तिनं स्वत:च्या उदाहरणानं घालून दिलेला धडा इतका विस्मयकारक आहे, की तिच्यापासून प्रेरणा घेऊन इतर अनेक लोक गरिबांना जमेल तेवढी मदत अत्यंत मूकपणे, कोणताही गाजावाजा न करता करू लागले आहेत! एका ज्योतीमुळे अनेक ज्योती उजळल्या आहेत!   

Story img Loader